Global Education : मायानगरीत आणखी एक 'फिल्मसिटी' 'वेव्हज्'मध्ये आठ हजार कोटींचे करार; एज्यु सिटी'त परदेशी विद्यापीठांचा समावेश
esakal May 03, 2025 11:45 AM

मुंबई : ‘सर्वोत्तम संस्थांच्या माध्यमातून सर्वोत्तम समुदाय निर्माण होतो आणि त्या समुदायांतून सर्वोत्तम राष्ट्रांची उभारणी होते. विकसित भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या एज्यु सिटी’ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न आता येथेच पूर्ण होईल,’’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याशिवाय, ‘‘चित्रपट उद्योग क्षेत्रात झालेले करार चित्रपट निर्मिती क्षेत्राला अधिक उंचीवर नेतील,’’ असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘वेव्हज् २०२५’ परिषदेमध्ये आज आठ हजार कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी सिडकोमार्फत युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर प्रत्येकी १५०० कोटी रुपयांचा करार करण्यात आला. तसेच राज्याच्या उद्योग विभागामार्फत प्राइम फोकस कंपनी सोबत तीन हजार कोटी रुपयांचा आणि गोदरेज सोबत दोन हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन, सिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह,आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘जगातील दोन सर्वोत्तम विद्यापीठांसोबत आज सामंजस्य करार होत आहे. नवी मुंबईत सुरू होत असलेल्या एज्यु सिटी’ मध्ये जगभरातील सर्वोत्तम विद्यापीठे एकाच ठिकाणी येतील. नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांत शिकण्याचे येथील युवकांचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे.’’

परदेशी विद्यापीठांशी करार

सिडकोमार्फत नवी मुंबई येथे एज्युसिटी प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क यांचे कॅंपस स्थापन करण्याच्या उद्देशाने दोन्ही संस्थांशी स्वतंत्रपणे प्रत्येकी १५०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

सिडकोच्या वतीने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल, ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’च्या वतीने कुलगुरू डॉ. डायने स्मिथ-गॅंडर आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’च्या वतीने कुलगुरू व अध्यक्ष चार्ली जेफ्री यांनी करारावर स्वाक्षरी केली.

‘फिल्म सिटी’साठी ३,००० कोटींचा करार

करमणुकीची सर्वंकष यंत्रणा असलेली ‘फिल्म सिटी’ उभारण्यासाठी प्राइम फोकस या कंपनीने राज्य सरकारशी करार केला आहे. कंपनीने तीन हजार कोटी रुपयांची घोषणा केली असून, वेव्हज् परिषदेच्या पार्श्वभूमीवर या करारावर शुक्रवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या प्रकल्पांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विकास होईल, असे ते म्हणाले. २०० एकरवर उभ्या राहणाऱ्या या प्रकल्पातून अडीच हजारांवर रोजगार निर्माण होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

प्राइम फोकस या कंपनीच्या संस्थापक नमिता मल्होत्रा म्हणाल्या, की फिल्मसिटीच्या उभारणीसाठी मुंबईत दोनशे एकर जागा राज्य सरकारकडून उपलब्ध करण्यात येणार आहे. ही फिल्मसिटी नेमकी कुठे उभारली जाईल, याविषयी त्यांनी माहिती दिली नाही. यासाठी सरकारपुढे दोन ते तीन जागांचे पर्याय असल्याचे त्या म्हणाल्या.

गोरेगावच्या पूर्वेला यापूर्वीच सरकारतर्फे चालवली जात असलेली एक फिल्मसिटी आहे. त्यात चित्रपटांच्या निर्मितीसाठी तसेच निर्मितीनंतरच्या प्रक्रियेसाठी अनेक स्टुडिओ असून तेथे अभिनयाचे प्रशिक्षणही दिले जाते. नव्या फिल्मसिटीमध्ये रामायण संकल्पनेवर आधारित मनोरंजन उद्यान, हॉटेल तसेच संबंधित कलाकार-तंत्रज्ञांच्या कुटुंबीयांना राहण्यासाठी निवासी सुविधादेखील असतील. यासाठी वर्षभरात जागा मिळाल्यावर अन्य सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून भूमिपूजन केले जाईल. त्यानंतर निधी संकलनासाठी कंपनीतर्फे गुंतवणूकदारांशी बैठका घेतल्या जातील.

‘एए स्टुडिओ’

‘गोदरेज’ सोबत पनवेल येथे एए स्टुडिओ स्थापन करण्याबाबत करार झाला. या कराराचा पहिला टप्पा ५०० कोटी रुपये गुंतवणुकीचा असून याद्वारे (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष) ६०० रोजगार निर्मिती होईल. हा प्रकल्प २०२७ मध्ये सुरू होईल. पुढील टप्प्यात १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून यामध्ये १९०० रोजगार निर्मिती होईल तर हा टप्पा २०३० पर्यंत सुरू होईल. या माध्यमातून एकूण २००० कोटी रुपयांची गुंतवणूक तर २५०० रोजगार निर्मिती होईल. महाराष्ट्र शासनाच्या वतीने उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन यांनी, प्राइम फोकस’च्या वतीने संचालक नमित मल्होत्रा यांनी तर गोदरेज च्या वतीने महाव्यवस्थापक हरसिमरनसिंग यांनी करारावर स्वाक्षरी केली.

‘निफ्टी वेव्हज् इंडेक्स’चा प्रारंभ

‘एनएसई इंडायसेस लिमिटेड’ने मुंबईत आयोजित ‘वेव्हज् २०२५’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हर्च्युअल बेल वाजवून ‘निफ्टी वेव्हज् इंडेक्स’चा प्रारंभ केला. ‘निफ्टी वेव्हज् इंडेक्स’मध्ये मीडिया, मनोरंजन आणि गेमिंग क्षेत्रातील ४३ सूचीबद्ध कंपन्यांचा समावेश आहे. ‘‘क्रिएटिव्ह इकॉनॉमीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य ‘निफ्टी वेव्हज्’च्या माध्यमातून झाल्याचा अभिमान वाटत आहे,’’ असे एनएससीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.