फसवणुकीसाठी 'रोजची कमाई'चे प्रलोभन
esakal May 06, 2025 04:45 AM

नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. ५ : घरबसल्या मोबाईलवरून दिवसाला हजारो कमवा. अशा भुरळ घालणाऱ्या जाहिरातींमागे लपलेल्या सायबर गुन्ह्यांचे जाळे पुन्हा एकदा समोर आले आहे. उल्हासनगरातील एका ५३ वर्षीय व्यक्तीला ‘रोजची कमाई’च्या प्रलोभनाने सायबर भामट्यांनी तब्बल २४ लाख ६१ हजार रुपयांनी गंडवले. समाज माध्यमावरून सुरू झालेला हा सायबर सापळा पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. अशा प्रकरणामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे.
समाज माध्यमांवर फिरणाऱ्या ‘घरबसल्या मोबाईलवर काम करा आणि दिवसाला कमवा हजारो रुपये’ अशा जाहिराती केवळ आकर्षक नाहीत, तर धोकादायकही ठरू शकतात. अशाच एका भुरळ घालणाऱ्या फसवणूक प्रकारात उल्हासनगरातील एका नागरिकाला तब्बल २४ लाख ६१ हजार ८३६ रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराला ९०३१९२०५१७ या क्रमांकावरून फोन आला होता. ‘व्हिलियम सोनोमा’ नावाच्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगण्यात आले. या बनावट कंपनीच्या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाइन ‘लिलाव’मध्ये भाग घेण्यास सांगितले. दररोज हजार-दीड हजार कमावण्याचे प्रलोभन दाखवून सुरुवातीला काही रक्कम परत करण्यात आली. ज्यामुळे विश्वास निर्माण झाला. पुढील टप्प्यावर ‘टास्क पूर्ण करण्यासाठी’, ‘अॅक्टिवेशन फी’, ‘अनामत रक्कम’, अशा विविध कारणांनी तक्रारदाराकडून सतत वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. अखेर एकूण २४ लाख ६१ हजार ८३६ रुपये भामट्यांनी हडप केले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेला संदेश, लिंक किंवा मोबाईल अॅप यांच्यावर क्लिक करण्यापूर्वी नीट खात्री करा. गरज असल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधा. थोडीशी सतर्कता लाखोंचा फटका वाचवू शकते, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सायबर गुन्ह्यांचा नवा चेहरा
या आधी फेसबुक, इन्स्टाग्रामवर ‘लाईक-शेअर-कमेंट’ करून पैसे मिळवण्याच्या प्रलोभनात अनेकांची फसवणूक झाली होती. आता हे गुन्हेगार अधिक ‘प्रोफेशनल’ पद्धतीने काम करत आहेत. बनावट आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या नावाने संकेतस्थळ तयार करून नागरिकांना विश्वासात घेत आहेत.

शिक्षितही बनताहेत शिकार
सायबर गुन्हेगारांचा शिकार होणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षित, प्रतिष्ठित आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर नागरिकांची संख्याही लक्षणीय आहे. सुरुवातीला थोडे पैसे परत मिळाल्यामुळे लोकांना या कामाचा खरा अनुभव मिळतो. पण, लवकरच गुंतवणूक वाढवण्याच्या मागण्या सुरू होतात आणि शेवटी आर्थिक फसवणुकीचा फास घट्ट होतो.

पोलिसांचा इशारा : सावध राहा!
विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी समाज माध्यमांवर किंवा संदेशाद्वारे मिळणाऱ्या ‘घरबसल्या कमाई''च्या प्रलोभनाला बळी न पडता कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी त्या कंपनीची, संकेतस्थळाची आणि त्या मागच्या व्यक्तींची पूर्ण पार्श्वभूमी तपासावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.