पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्रात ‘पर्यटन सुरक्षा बल’, जाणून घ्या फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!
GH News May 06, 2025 05:08 PM

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि पर्यटन क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा बल’ (MTSF) नावाच्या या नव्या पथकाची सुरूवात १ मे २०२५ पासून महाबळेश्वर महोत्सवात प्रायोगिक तत्वावर होणार आहे. सरकारच्या ‘पर्यटन धोरण २०२४’ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून, या योजनेला ‘पर्यटन मित्र’ असे स्नेही नाव देण्यात आले आहे.

‘पर्यटन मित्र’चा दुहेरी उद्देश

या विशेष पथकाचा उद्देश केवळ पर्यटकांची सुरक्षा यापुरता मर्यादित नाही. या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती, वारसा आणि पर्यटक स्थळांची माहितीही दिली जाणार आहे. पर्यटकांचा अनुभव दर्जेदार करण्यासोबतच सरकारने १८ लाख रोजगार निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. शिवाय, १ लाख कोटी रुपयांची खासगी गुंतवणूक आकर्षित करण्याचा मानस आहे.

पर्यटन सुरक्षा बलाची गरज का?

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात पर्यटकांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली होती. महाराष्ट्रातील गड-किल्ले, समुद्रकिनारे आणि नैसर्गिक स्थळे पर्यटकांनी फुलून जात असतानाच अशा घटनेचा परिणाम इथंही जाणवत होता. त्यामुळे सरकारला एक सुरक्षित आणि सकारात्मक पर्यटन वातावरण निर्माण करण्यासाठी नवा दृष्टिकोन घ्यावा लागला.

प्रायोगिक सुरुवात महाबळेश्वर महोत्सवात

सातारा जिल्ह्यात १ ते ४ मे २०२५ दरम्यान होणाऱ्या महाबळेश्वर महोत्सवात २५ प्रशिक्षित जवानांचा एक पथक तैनात केला जाणार आहे. हे जवान राज्य सुरक्षा महामंडळ आणि जिल्हा पोलिसांमार्फत निवडले जातील. यंत्रणेत आधुनिक सुविधांमध्ये सीसीटीव्ही, हेल्पलाइन, आणि इमर्जन्सी प्रतिसाद तंत्र सामील असणार आहे. २५ एप्रिल ते ३१ ऑगस्ट या कालावधीत हे बल कार्यरत असेल.

पर्यटनमंत्री काय म्हणाले?

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, या बलामुळे पर्यटकांना सुरक्षित वाटेल. त्यांना राज्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची माहिती मिळेल. हा उपक्रम पर्यटनाला चालना देईल आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. “पर्यटकांना सुरक्षित आणि आनंददायी अनुभव देणे हा आमचा उद्देश आहे. यामुळे महाराष्ट्र पर्यटनाच्या जागतिक नकाशावर अधिक मजबूत होईल,” असे देसाई म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.