इस्लामाबाद : पाकिस्तानने भारताच्या १५ हून अधिक शहरांवर हल्ले केल्याचे व भारताने हे हल्ले निष्प्रभ केल्यानंतर आज मात्र पाकिस्तानने ‘आम्ही हल्ले केलेच नाहीत’ असा कांगावा केला आहे. तसेच, भारताच्या दाव्याला कोणताही आधार नसून ते पाकिस्तानविरोधी मोहीम राबवित असल्याची टीकाही केली आहे.
पाकिस्तानने गुरुवारी अमृतसरसह, जम्मू, जालंधर, भुज, जैसलमेरसह १५ हून अधिक शहरांवर रॉकेट, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले केल्याचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केले होते. तसेच, भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले ‘एस-४००’ यंत्रणेच्या मदतीने फोल ठरविल्याचेही स्पष्ट करण्यात आले. पाकिस्तानच्या पाडलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे तुकडेही ठिकठिकाणी मिळाले आहेत. पाकिस्तानने मात्र, असे हल्ले झाल्याचा भारतीय माध्यमांनी केलेला दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारच्या कृतीमुळे प्रादेशिक शांततेला धोका निर्माण होत असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज पहाटे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
‘‘पाकिस्तानने हल्ले केल्याचे भारतीय माध्यमांनी केलेले दावे पूर्णपणे आधारहिन, राजकीय हेतूंनी प्रेरित असून पाकिस्तानची बदनामी करण्याचा त्यामागे हेतू आहे. आम्ही हे दावे पूर्णपणे नाकारत आहोत,’’ असे निवेदनात म्हटले आहे. तसेच, कोणताही तपास न करता पाकिस्तानवर आरोप करायचे आणि प्रादेशिक शांतता भंग करायची, असा डावच आहे, असा कांगावाही पाकिस्तानने केला आहे. भारताच्या या धोकादायक धोरणाची जागतिक समुदायानेही नोंद घ्यावी, असे आवाहन पाकिस्तानने केले आहे.
‘एक्स’ खाते हॅक...इस्लामाबाद : पाकिस्तानच्या वित्त खात्याच्या ‘एक्स’ या सोशल मीडियावरील खात्यावर आज आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मदतीची याचना करणारी पोस्ट प्रसिद्ध झाली. शत्रूच्या हल्ल्यात प्रचंड मोठी हानी झाल्याने अधिक प्रमाणात कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती या पोस्टद्वारे करण्यात आली. मात्र, सायबर हल्ला होऊन अर्थखात्याचे ‘एक्स’ खाते हॅक झाल्याचा आणि त्यावरून खोटी माहिती प्रसारित केल्याचा दावा पाकिस्तानच्या माहिती व प्रसारण खात्याने केला आहे. इंग्रजी भाषेत केलेल्या या पोस्टमधील शब्दांचे स्पेलिंग चुकले असल्यानेही अनेकांनी या पोस्टच्या वैधतेबद्दल शंका व्यक्त केली होती.