९ महिन्यांपूर्वी पंतप्रधानांनी केले उद्घाटन, तरी सोलापूरची विमानसेवा सुरू होईना! गोव्याच्या कंपनीने केले हात वर; विकास मंच पुन्हा मैदानात, गुरुवारी बैठक
esakal May 14, 2025 12:45 PM

सोलापूर : सोलापूर- गोवा मार्गावर २६ मेपासून विमानसेवा सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. मात्र फ्लाय ९१ या कंपनीने हात वर केल्याने विमानसेवेचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर पडणार असल्याचा दाखा सोलापूर विकास मंचाने केला आहे. दरम्यान, विमानसेवेची मागणी पुन्हा तीव्र करण्यासाठी विकास मंचाने गुरुवारी (ता.१५) बैठकीचे आयेाजन केले आहे.

नऊ महिन्यापूर्वी दस्तुरखुद्द पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्यात पुन्हा एकदा विघ्न आले आहे. सोलापूरला विमानसेवेची खरी गरज मुंबई व तिरुपती मार्गावर असताना सोलापूर - गोवा या मार्गाला प्राधान्य देण्यात आले होते. सोलापूर- गोवा मार्गावर एकही रेल्वे सुरू नसल्याचे कारण या मागे देण्यात आले होते. मात्र, सोलापूरहून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची पसंती चारचाकी वाहनांना अधिक आहे. यामुळे या मार्गावर विमानसेवेला किती प्रतिसाद मिळेल याबाबत साशंकताच होती. विमानसेवेचा मुहूर्त निकट येऊनही कंपनीकडून तिकीट बुकिंगबाबत कोणतीही तयारी करण्यात आलेले नाही. विमान कंपनीच्या वेबसाइटवर याबाबत अद्यापही उद्घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे या विमानसेवेबाबत मागील काही दिवसांपासून संशकताच होती.

...ते कलेक्टर साहेबांना विचारा

२६ मे रेाजी विमानसेवा सुरू होण्याबाबत सोलापूर विमानतळाचे सरव्यवस्थापक चंद्रेश वंझारा यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, याबाबत आपल्याकडे कोणतीही माहिती नाही. त्याबाबतची माहिती आपण जिल्हाधिकाऱ्यांना विचारावे.

‘ए- आय’ म्हणते नवे वेळापत्रक येणार...

फ्लाय ९१ या कंपनीच्या ए आय (कृत्रिम बुद्धीमत्ता) यंत्रणेद्वारे सोलापूरच्या तिकीट बुकिंगची चौकशी केली असता या यंत्रणेकडून या मार्गावरील वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. सध्या या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद कमी असून नवीन वेळापत्र लवकरच जाहीर होईल, अशी माहिती मिळते.

गुरूवारी शासकीय विश्रामगृहात बैठक

विमानसेवा सुरू होण्यात आता तांत्रिकदृष्ट्या कोणतीही अडचण नसताना सोलापूरची विमानसेवा लांबणीवर पडत आहे. सोलापूर विमानतळ फक्त व्हीआयपींसाठीच ठेवण्याचा प्रशासनाचा विचार दिसतोय. यासाठी सोलापूरकरांनी पेटून उठले पाहिजे. यासाठी आता पुन्हा लढा सुरू करण्यात येत असून याची दिशा ठरविण्यासाठी गुरुवारी सांयकाळी ६ वाजता शासकीय विश्रामगृहात बैठक बोलविली आहे.

- मिलिंद भोसले, सदस्य, सोलापूर विकास मंच

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.