राजेश पाटील
ढेबेवाडी : माणूस आयुष्यभर विद्यार्थी बनून काही ना काही शिकतच असतो. त्यासाठी त्याला वयाचेही बंधनही असतं नाही. याचीच जणू प्रचिती मंद्रुळकोळे खुर्द (ता. पाटण) या गावात आली. तेथील एका आईने वयाच्या चाळिशीत दहावीत शिकणाऱ्या आपल्या मुलासमवेत बोर्डाची परीक्षा दिली आणि दोघेही मायलेकरं चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाले. सुनीता शरद लोहार आणि त्यांचा मुलगा चैतन्य अशी त्यांची नावे आहेत. सुनीताताईंच्या जिद्दीचे आणि त्यांना घरी अभ्यासात मदत करणाऱ्या चैतन्यचे परिसरातून कौतुक होत आहे.
मंद्रुळकोळे खुर्द येथील सुनीता लोहार यांचे माहेर कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. त्यावेळच्या परिस्थितीमुळे त्यांना नववीनंतर शिक्षण अर्ध्यात सोडावे लागले. विवाहानंतर त्या गृहिणी बनून संसारात रमल्या. पती शरद लोहार घोगाव येथील संतकृपा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नोकरीस आहेत. कन्या साक्षीचे इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू आहे. सुनीता गावातील बचत गटांचेही काम पाहतात. संसार आणि गटांची जबाबदारी नेटकेपणाने पार पाडत असतानाच अलीकडेच शिक्षण पूर्ण करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. त्याबाबत घरी सांगितल्यावर सर्वांनी कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात मुलगा चैतन्य दहावीच्या वर्गात शिकत असल्याने अभ्यासात त्यांना त्याची मदत झाली. कामाचा व्याप असल्याने सुनीता यांनी परीक्षेच्या आधी काही महिने अभ्यासाचा जोर वाढविला. जिद्द व आत्मविश्वासाने त्या परीक्षेला सामोरे गेल्या. दहावीचा निकाल लागला. सुनीता यांना ५८.२० टक्के, तर चैतन्यला ७२.६० टक्के गुण मिळाले. याबद्दल समजताच लोहार कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केलाच, शिवाय ग्रामस्थांनीही दोघांचे कौतुक करून त्यांच्या जिद्दीला सलाम केला. प्राचार्य एम. एस. पाटील व शिक्षकांचे सहकार्य, प्रोत्साहन लाभल्याचेही सुनीता यांनी सांगितले.