Car Accident : छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनगरमध्ये कारचा दरवाजा उघडल्यानं ज्येष्ठाचा अपघात, उपचारादरम्यान मृत्यू
esakal May 23, 2025 05:45 PM

समर्थनगर : परिसरातील सावरकर चौकाजवळ एका कारचालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाला. त्यांचा बुधवारी (ता. २१) सायंकाळी साडेपाचला उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी साडेबाराला घडला. याप्रकरणी निष्काळजीपणे कार थांबवणाऱ्या कारचालकाविरोधात गुन्हा नोंद झाला.

अशोक लक्ष्मीनारायण अमृते (वय ६८, रा. एन-११, नवजीवन कॉलनी) हे वरद गणेश मंदिराकडे दुचाकीवर (एमएच १४ डीयू १३३८) जात असताना (एमएच २० सीएच ३४२३) क्रमांकाची पांढऱ्या रंगाची कार अचानक थांबवून चालकाने दरवाजा उघडला.

त्या दरवाजाला धडकून अमृते यांच्या दुचाकीचा तोल जाऊन ते रस्त्यावर पडले. त्यांच्या कानातून आणि नाकातून रक्तस्राव होऊन गंभीर दुखापत झाली. त्यांना नागरिकांनी तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले.

मात्र बुधवारी सकाळी साडेपाचला उपचारादरम्यान ट्रॉमा केअर येथे त्यांचा मृत्यूझाला. याप्रकरणी पुतण्या प्रा. मनीष अनिल अमृते (वय ३६, रा. नवजीवन कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात कारचालकाविरोधात वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.