संजय शिझिस: सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या मुलाने छत्रपती संभाजीनगरमधील व्हिट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतल्याच्या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात चांगलाच गदारोळ माजला आहे. या हॉटेलची बाजारभावानुसार किंमत 110 कोटी रुपये असतानाही, केवळ 67 कोटी रुपयांत ते शिरसाट यांच्या मुलाने विकत घेतल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावर प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत, “मी माझ्या मुलाला या लिलावातून माघार घेण्यास सांगत आहे,” असे वक्तव्य केले. मात्र, जर त्यांनी लिलावातून माघार घेतली, तर लिलावाच्या नियमांनुसार त्यांना थेट 20 लाख रुपयांचा आर्थिक दंड बसू शकतो.
संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, गेल्या 10 दिवसांपासून एक विषय चर्चेला येत आहे. माझ्या मुलाने संभाजीनगरमध्ये एक हॉटेल विकत घेतले आहे. त्या हॅाटेलचे प्रकरण कोर्टात गेले आहे. यात सात वेळा लिलावाची प्रक्रिया पार पडली आहे. त्यावेळी कोणी हॉटेल घेतलं नाही. आठव्या वेळी माझ्या मुलाने आणि त्याच्या मित्राने टेंडर भरले. त्यासाठी आवश्यक रक्कम देखील भरण्यात आली. आता हे केल्यानंतर मूर्खासारखे काही जण स्टेटमेंट करू लागले आहेत. मुळात ज्यावेळी हॉटेल खरेदी होईल, त्यावेळी सगळा व्यवहार हा व्हाइटमध्ये दिसेल. 110 कोटी रक्कम त्यांनी कुठून आणली? 58 कोटी रुपयांचा विषय आहे. आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थिती समजून घ्या. संजय राऊत यांना एकाने चुकीचं ब्रिफिंग केलं, त्यांना लक्षात आलं की, चुकीचे आरोप केले आहेत. मी तुम्हाला आव्हान देतो की, 100 कोटी रुपयांचे हॉटेल आहे ना. मी 68 कोटी रुपयांना विकत घेणार होतो. मी आज माझ्या मुलाला सांगतो त्यातून बाहेर पडा. आता पुन्हा नवीन टेंडर निघत आहे. 100 किंवा 90 कोटी रुपयांना भरा तुम्ही, 100 कोटी रुपयांचे हॉटेल असेल तर तुम्हालाच फायदा होईल ना, असेही त्यांनी म्हटले होते.
आता संजय शिरसाट यांच्या दाव्यानुसार ते आता हे हॉटेलच्या लिलावातून बाहेर पडणार आहेत. जर त्यांनी माघार घेतली तर तर त्यांना तब्बल 20 लाखांचा भुर्दंड बसेल. कारण या हॉटेलच्या लिलावाच्या वेळी सहभागी होण्याआधीची अट अशी होती की, हे हॉटेल खरेदी करणाऱ्यांनी 25 टक्के रक्कम लिलावाच्या एक महिन्यात आणि 75 टक्के रक्कम लिलावानंतर तीन महिन्यात देणं बंधनकारक होतं. जर असं केलं नाही तर अनामत रक्कम जप्त करण्यात येईल, असा नियम आहे, अशी माहिती छत्रपती संभाजीनगरचे एसटीएम व्यंकट राठोड यांनी दिली आहे. आता संजय शिरसाट नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
अधिक पाहा..