No VIP Darshan at Pandharpur : अवघ्या तासाभरात होतेय श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, व्हीआयपी दर्शन बंदचा चांगला परिणाम
esakal June 13, 2025 08:45 PM

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंदी बरोबरच इतर काही उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. १२) दर्शन रांगेतील भाविकांना अवघ्या तासाभरात देवाचे पदस्पर्श दर्शन मिळाले. लवकर दर्शन मिळाल्याने भाविकांनी व्हीआयपी दर्शन बंदीचे स्वागत केले.

श्री विठ्ठल दर्शनासाठी राज्यभरातून दररोज हजारो भाविक पंढरपुरात येतात. आषाढी वारीच्या निमित्ताने तर भाविकांची संख्या अधिक वाढली आहे. दर्शन रांगेतून येणाऱ्या भाविकांचे जलद व सुलभपणे दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीने काही उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यामध्ये व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तर दर्शन रांगेतून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी दर्शन बारीला जाळीचे गार्ड बसविले आहेत. ऑनलाइन दर्शन सुविधा देखील बंद केली आहे. त्याचा एकत्रित चांगला परिणाम दिसून येऊ लागला आहे. गुरुवारी दर्शन रांगेत उभारलेल्या भाविकांना अवघ्या एक तास ते दीड तासांमध्ये जलद व सुलभपणे दर्शन झाले. लवकर दर्शन होत असल्याने अनेक भाविकांनी मंदिर समितीच्या या निर्णयाचे स्वागतही केले.

या विषयी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले, भाविकांच्या दर्शनाला प्राधान्य दिले आहे. दर्शन रांगेतील भाविकांचे देवाचे पदस्पर्श जलद व सुलभ व्हावे यासाठी व्हीआयपी दर्शन बंद केले आहे. शिवाय दर्शन बारीतील घुसखोरी रोखण्यासाठी जाळी गार्ड बसवले आहे. त्यामुळे भाविकांना आता अवघ्या तासाभरात दर्शन मिळत आहे. आषाढी यात्रेत देखील भाविकांना वेळेत दर्शन मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

सहा तासांचा अवधी फक्त एक तासांवर

श्री विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनासाठी इतर वेळी पाच ते सहा तासांचा अवधी लागत होता. त्यामुळे भाविकांना तासनतास दर्शन रांगेत उभे राहावे लागत होते. दर्शन रांगेतील भाविकांचे दर्शन वेळेत व्हावे यासाठी समितीने काही प्रभावी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी लागणारा वेळ आता अवघ्या एक ते दीड तासावर आला आहे. मंदिर समितीने हाती घेतलेल्या उपाययोजनांमुळे हे शक्य झाल्याचे भाविकांनी सांगितले.

दरवर्षी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आम्ही येतो. आज मात्र आमचे अवघ्या एक तासामध्ये श्री पदस्पर्श दर्शन झाले. व्हीआयपी दर्शन बंद केल्यामुळेच आम्हाला लवकर दर्शन मिळाले. मंदिर समितीने कायमस्वरूपी व्हीआयपी दर्शन बंद ठेवून रांगेतील भाविकांना लवकर दर्शन द्यावे.

- आशा क्षीरसागर, भाविक, छत्रपती संभाजीनगर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.