वृत्तसंस्था/ बुलंदशहर
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला. वेगाने येणारी स्विफ्ट कार कल्व्हर्ट तोडून रस्त्याच्या कडेला 5 फूट खाली पडली. ती पडताच कारमध्ये भीषण आग लागली. कारमध्ये बसलेल्या 6 पैकी 5 जण जिवंत जळाले. कारमधील फक्त एक महिला वाचली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील लोक घटनास्थळी धावले. त्यांनी कारच्या काचा फोडून एका महिलेला बाहेर काढले. तोपर्यंत आगीने भयानक रूप धारण केल्यामुळे इतर लोकांना वाचवता आले नाही. मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांचा मुलगा यांचा समावेश आहे. तसेच, अपघातात पत्नीचा भाऊ आणि त्याची पत्नी यांचाही मृत्यू झाला. बुधवारी पहाटे 5:30 वाजता जहांगीराबाद पोलीस स्टेशन परिसरातील जानीपूर-चांदौस चौकात हा अपघात घडला. अपघातग्रस्त कुटुंब बदायूंमधील चमनपुरा येथील रहिवासी होते. हे सर्वजण पहाटे 3.30 वाजता स्विफ्ट कारने दिल्लीला निघाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.