Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आपल्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात भाजपावर सडकून टीका केली. त्यांनी ऑपरेशन सिंदूरवरून भाजावर चांगलाच हल्लाबोल केला. भाजपाच्या हर घर सिंदूर या मोहिमेवर त्यांनी शेलक्या शब्दांत टीका केली.
आम्ही इंडियन मुजाहिद्दीन असल्याचं ते सांगतायत. मग तुम्ही कोण? तुम्ही जगभर फिरले. पण कठीण काळात एकही देश तुमच्या बाजूने उभा राहिला नाही. पण आम्ही उभे राहिलो. तुम्ही देशाचे मित्र तोडून टाकत आहात. संकट आल्यावर आमचे खासदार जगभरात पाठवत आहात. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा डोकलामची घटना घडली. तेव्हा आमची हीच भूमिका होती की पंतप्रधान तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. आताही आमची तीच भूमिका होती. पक्ष, मतभेद राहतील, पण देश म्हणून आपण एकत्र आहोत. ते करण्याचा प्रयत्न आम्ही केला, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला.
यांना ऑपरेशन सिंदूरसारखी नावं बरीच सूचतात. घरोघरी जाऊन हे सिंदूर वाटणार होते. कोण वाटणार तर भ्रष्ट लोक. ज्यांना जोड्याने हाणलं पाहिजे हे लोक आमच्या माता भगिनींना सिंदूर वाटत होते. आमच्या भगिनी त्यांच्याकडून सिंदूर घेणार असं वाटलं होतं त्यांना. हिंदुत्वाची व्याख्या करताना शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं होतं की माझं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आम्ही राष्ट्रधर्म पाळणारे हिंदुत्ववादी आहोत. हा देश आपला मानतो तो आमचा आहे. देशासाठी कुर्बानी देणारा कोणी असो तो आमचा आहे, असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला.
तसेच, मध्येच भाजपाच्या डोक्यात काहीतरी येतं. घराघरात जाऊन सिंदूर वाटण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हा शेंदूर कोण वाटणार तर तो नालायक मंत्री विजय शाहा. त्या मंत्र्याला खरं तर भर रस्त्यात चाबकाने फोडला पाहिजे. त्याच्यावर भाजपा अजूनही काही कारवाई करत नाही. लष्करातील सोफिया कुरेशी या आपल्या भगिनी आहेत. आपल्याला त्यांचा गर्व वाटला. त्यांनी बाणेदारपणाने आपली भारताची बाजू मांडली. त्याच सोफिया कुरेशी यांना हा विजय शाहा पाकिस्तानकी म्हणतो, दहशतवाद्यांची बहीण म्हणतो. अशी नालायक औलाद भाजपामध्ये आहे. याच भाजपाकडून आपण देश सुधारण्याची आशा करत आहोत. हे देशात सुधारणा करणार का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.