Future of Shiv Sena Under Uddhav’s Leadership : मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने कंबर कसली आहे. शिंदेंकडून ठाकरेंना सातत्याने झटके दिले जात आहेत. मागील काही दिवसांत अनेक माजी नगरसेवकांनी शिंदेंना साथ दिली आहे. आता गुरूवारी वर्धापनदिनीच दोन माजी नगरसेवकांसह एक शाखा प्रमुख ठाकरेंची साथ सोडणार आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेला सुरू असलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही. माजी नगरसेवक अजित भंडारी आणि विजेंद्र शिंदे यांच्यासह शाखा प्रमुख संजय जंगम हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाकरे यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही माजी नगरसेवक मातोश्रीवर बुधवारी झालेल्या माजी नगरसेवकांच्या बैठकीला उपस्थित होते.
विजेंद्र शिंदे यांनी मीडियाशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या मतदारसंघात नव्याने झालेल्या नियुक्त्यांमुळे ते नाराज होते. नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये आपल्याला आणि शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. याची माहिती वरिष्ठांच्या कानावरही घातली होती. पण त्याची दखल घेण्यात आली नाही, अशी नारीज शिंदे यांनी व्यक्त केली.
मातोश्रीवरील काल झालेल्या बैठकीलाही आपण गेलो होते. आपल्या एकट्याला बाजूला घेऊन माझे म्हणणे वरिष्ठ नेते ऐकून घेतील, असे मला वाटले होते. पण तसे झाले नाही. आपली पक्षाला गरज नाही, अशी भावना झाल्यामुळे पक्ष सोडत असल्याचे विजेंद्र शिंदे यांनी स्पष्ट केले. भंडारी यांनी मात्र पक्षप्रवेशाबाबत मीडियाशी बोलण्यास नकार दिला.
दरम्यान, मुंबई महापालिकेची निवडणूक दोन्ही शिवसेनेसाठी महत्वाची आहे. प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांना मुंबईत ठाकरे ब्रँडची ताकद दाखवून देण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. दोन तपांहून अधिक काळ ठाकरेंचीची मुंबई पालिकेत सत्ता आहे. त्याला सुरूंग लावण्यासाठी महायुतीनेही जोरदार तयारी चालवली आहे.