पाकिस्तानच्या नॅशनल असेम्बलीत शहबाज शरीफ सरकारची चिंता वाढली आहे. शहबाज यांचा पक्ष PML-N आणि बिलावल भुट्टो झरदारी यांचा पक्ष PPP ने 2 वेगवेगळ्या प्रांताची मागणी केली. भुट्टो यांच्या पक्षाच्या खासदाराने पंजाब तर शहबाज सरकारमधील मंत्र्याने खैबर-पख्तूनख्वा हा प्रांत विभाजीत करण्याची मागणी केली. डॉन या वृत्तपत्रानुसार, नॅशनल असम्बलीत अर्थसंकल्पावर बोलताना सरकारमधील धार्मिक खात्याचे केंद्रीय मंत्री सरदार मुहम्मद युसूफ यांनी खैबर पख्तूनख्वामध्ये हजारा राज्य तयार करण्याची मागणी केली. खैबर या प्रांताला इमरान खान यांचा गड मानण्यात येतो. एका मंत्र्याने मागणी केल्यावर पीपीपीचे सय्यद मुर्तजा महमूद यांनी पंजाबच्या विभाजनाची मागणी केली. दक्षिण पंजाब हे स्वतंत्र राज्य करण्याची मागणी त्यांनी केली.
पाकिस्तानचे किती राज्य?
सध्या अधिकृतपणे पाकिस्तानमध्ये पंजाब, सिंध, खैबर-पख्तूनख्वा, बलूचिस्तान आणि गिलिगिट-बालिस्टान हे प्रांत आहेत. पीओके आणि इस्लामाबादला केंद्राच्या अखत्यारीत ठेवण्यात आले आहे. पंजाब पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत आहे. तर सिंध हा आर्थिकदृष्ट्या सर्वात सक्षम प्रांत मानण्यात येतो. बलूचिस्तान आण खैबर हे दोन प्रांत पाकिस्तानातील सर्वात अशांत राज्य मानण्यात येतात. बलूचिस्तान आणि खैबर या दोन्ही राज्यात स्वातंत्र्य चळवळीने उग्र रुप धारण केले आहे. खैबर प्रांताला विभाजीत करून हाजरा हा भाग वेगळा करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारमध्ये चिंता वाढली आहे.
का होत आहे अशी मागणी?
1. पाकिस्तान सरकारचे मंत्री युसूफ यांच्या मते, लहान लहान राज्यात पायाभूत सोयीसुविधा आणि विकासाची कामे सहज करता येतील. छोट्या छोट्या कामासाठी लोकांना दूरवर जाण्याची गरज नाही.
2. यूसुफ यांच्या मते, खैबर सरकार हाजरामधील नागरिकाविषयी दुटप्पी भूमिका घेते. हाजरामधील लोक आजही शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. पण सरकार सातत्याने दुर्लक्ष करत आहे.
3. महमूद यांच्या मते, पाकिस्तानमधील 60 टक्के क्षेत्रफळ पंजाबमध्ये आहे. जर प्रांतवार विभाग रचना केली नाही तर लोक बंड करतील. सध्या पंजाबविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलक रस्त्यावर उतरल्याची आठवण त्यांनी सरकारला करून दिली.
स्थानिक राजकारण पण कारण
पंजाब राज्यात पीएमएल-एन चे सरकार आहे. येथे अनेक प्रयत्नानंतर सुद्धा पीपीपी या पक्षाला जनमत मिळवण्यात यश आलेले नाही. तर दुसरीकडे खैबर राज्यात सुद्धा पीएमएल-एन या पक्षाला सत्ता मिळू शकली नाही. त्यामुळे दोन्ही भागात हे दोन्ही पक्ष विभाजनाला खतपाणी घालत आहेत. पंजाबी, सिंधी, पख्तूनी बोलणाऱ्यांची अस्मिता समोर येत आहे. 6 कालवे योजनेला प्रखर विरोध, राज्याच्या गृहमंत्र्याच्या घरावर हल्ले हा त्याचाच भाग मानण्यात येत आहे.