सोलापूर : कार जाण्यासाठी वाट न सोडणाऱ्या तरुणांसमोर हॉर्न वाजविणाऱ्या चालकास बाजूने जायला सांगितले. त्यावेळी एकमेकांना शिवीगाळ झाली आणि काही वेळाने दोन गटात दगडफेक सुरू झाली. त्यात अल्पवयीन मुले देखील सहभागी असल्याचे व्हिडिओत दिसतात. रविवारी (ता. २२) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना भवानी पेठेतील घोंगडे वस्ती परिसरात घडली आहे. दगडफेकीत दुचाकीसह अन्य वाहनांचे नुकसान झाले आहे. तिघेजण जखमी झाले आहेत.
गटागटाने थांबून महिलांकडे पाहणे, रस्त्यावर थांबून रस्ता अडविणे, मुलींकडे वाईट हेतूने पाहणे, वाहने भरधाव चालविणे, दुसऱ्या परिसरातील तरुणांना त्या भागात बोलावण्याचे प्रकार सतत सुरू होते. त्यामुळे दोन गटात काही दिवसांपासून तणावाचे वातावरण होते, त्याचा उद्रेक रविवारी झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. दगडफेकीची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिस त्याठिकाणी दाखल झाले. सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज मुलाणी हेही तेथे उपस्थित होते. त्यावेळी दंगा नियंत्रण पथक, शीघ्र प्रतिसाद दलाचे अंमलदारही बोलावण्यात आले होते. पोलिसांनी परिसरात गस्त सुरू केली होती.
माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या घराजवळच हा प्रकार घडला असून दगडफेकीत त्यांचा मुलगा बिपिन पाटील याच्या डोक्याला एक दगड लागून तो जखमी झाला. सुरेश पाटील यांच्या घरासमोर राजकुमार पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी गर्दी पांगवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पाटील हे फिर्याद देण्यासाठी पोलिसांत गेले होते, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सरू होते. सध्या या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
३० दिवसांतील दुसरी घटना
२५ मे २०२५ रोजी सोलापूर शहरातील बाबा कादरी मशिदीजवळून जाणाऱ्या वाहनाला रस्ता न दिल्याच्या कारणातून दोन गटात दगडफेक झाली होती. त्यानंतर २२ जून रोजी पुन्हा सोलापूर शहरातील घोंगडे वस्ती परिसरात दोन गटात दगडफेकीची घटना घडली आहे. रात्री जेवणानंतर रस्त्यावर थांबलेल्या तरूणांनी एका गाडीला रस्ता दिला नाही आणि त्याने मोठमोठ्याने हॉर्न वाजविल्याच्या कारणातून सुरवातीला शाब्दिक चकमक झाली आणि त्यानंतर दगडफेक झाल्याचे काहींनी सांगितले. भविष्यातील अशा दुर्घटना टाळण्यासाठी पोलिस रात्री दहानंतर सण-उत्सव काळात ज्या पद्धतीने गस्त घालतात, तसा प्रकार पुन्हा सुरू करावा लागणार आहे. त्यावर पोलिस आयुक्त एम. राज कुमार त्यासंदर्भात काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात
माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या घरावर काहींनी दगडफेक केली आहे. घोंगडे वस्तीतील या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता फुटेजची पडताळणी करून जोडभावी पेठ पोलिस संबंधितांवर कारवाई करतील.