- अश्विनी आपटे- खुर्जेकर
आज जेवायला काय करायचं, नवऱ्याला आणि मुलांना डब्यामध्ये काय द्यायचं, मुलांना कुठल्या शाळा कॉलेजमध्ये घालायचं, लग्नकार्यामध्ये काय भेट द्यायची, घरातली एखादी वस्तू खराब झाली आहे तर ती कधी आणायची, अशा एक ना अनेक छोट्या मोठ्या निर्णयांवर आपलं संपूर्ण आयुष्य उभं असतं आणि आपण कुठला मार्ग निवडतो, कुठल्या गोष्टी स्वीकारतो अथवा नाकारतो, हे सगळं आपल्या निर्णयक्षमतेवर अवलंबून असतं. कुठलाही निर्णय छोटा असो वा मोठा - तो योग्य आणि वेळेत घेणं गरजेचं असतं.
मैत्रिणींनो, महिलांच्या, विशेषतः गृहिणींच्या बाबतीत निर्णय घेणं हे एक उपेक्षित; पण अत्यंत महत्त्वाचं कौशल्य आहे. घर, नोकरी अशा अनेक गोष्टी यशस्वीरित्या सांभाळत असतानाही बऱ्याचदा, ‘तुला काय कळतंय? तुला कुठे निर्णय घ्यायला लागतात? तुला कोणी विचारलं आहे का?’ असे अप्रत्यक्ष किंवा काही वेळेला अगदी स्पष्ट, अपमानजनक दृष्टी बघायला मिळते. याचा आपल्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो. आपण हळूहळू निर्णय घेण्यापासून दूर जायला लागतो.
निर्णय घेणं म्हणजे पर्याय समजून घेऊन, त्याचे फायदे-तोटे विचारात घेऊन, योग्य पर्याय निवडणं. यासाठी स्पष्ट विचार, आत्मविश्वास, अनुभव आणि स्थितीचं भान असणं आवश्यक आहे.
निर्णय घेणं का महत्त्वाचं आहे?
स्वातंत्र्य टिकवण्यासाठी : जेव्हा एखादी स्त्री निर्णयक्षम बनते, तेव्हा ती इतरांवर कमी अवलंबून असेल, तिचं स्वातंत्र्य टिकवलं जाईल.
घराच्या योग्य व्यवस्थापनेसाठी : निर्णय छोटा असो अथवा मोठा- योग्य वेळेवर घेतला गेला तरच घराची व्यवस्था टिकून राहील आणि गोंधळ टाळता येईल.
आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी : फक्त घरातले छोटे-मोठे निर्णयच नाही, तर शिक्षण, आरोग्य, गुंतवणूक यांसारख्या क्षेत्रांमध्येही आपण योग्य निर्णय घ्यायला शिकलो, तर आपणच नाही, तर आपलं घरसुद्धा पुढे जात राहील.
आत्मविश्वास वाढवण्यासाठी : घेतलेला प्रत्येक निर्णय आपल्याला काहीतरी अनुभव देतो. चुकीचा निर्णयसुद्धा आपल्याला काहीतरी शिकवून जातो आणि पुढे योग्य निर्णय घेण्याची क्षमता देतो.
मैत्रिणींनो निर्णय घेण्याच्या अक्षमतेचे अनेक दुष्परिणाम आहेत. सतत निर्णय टाळणं किंवा दुसऱ्यावर सोपवणं, यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो.
अनेकदा अनेक चांगल्या संधी गमावतो. स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करतो. निर्णय घेण्यात उशीर झाला, की पर्याय बदलतात. गोंधळ, अनिश्चितता आणि त्यातून ताण निर्माण होऊ शकतो आणि याचा परिणाम आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक नात्यांवर होऊ शकतो. त्यामुळे योग्य आणि वेळेवर निर्णय घेणं अतिशय महत्त्वाचं आहे.
योग्य आणि वेळेवर निर्णय घेण्यासाठी काही टिप्स
सर्व माहिती गोळा करा : कुठलाही निर्णय घेण्याआधी सर्व पर्याय आणि त्या पर्यायांबद्दल माहिती मिळवा. स्वतःच्या भावना ओळखा. निर्णय घेताना तुमचं मन आणि शरीर अनेकदा तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतं. ते समजून घ्यायचा प्रयत्न कराशेवटचा निर्णय स्वतःचा ठेवा : निर्णय घेताना आजूबाजूच्या लोकांचा सल्ला घेणं जरी चांगलं असलं, तरीसुद्धा शेवटचा निर्णय मात्र तुमच्या गरजांचा, तुमच्या परिस्थितीचा आणि तुमच्या मनाचा आणि बुद्धीचा विचार करूनच घ्या.
सुरुवात करा : निर्णय घेणं तुमच्यासाठी नवीन असेल, तर छोट्या छोट्या निर्णयांपासून सुरुवात करा आणि हळूहळू मोठे मोठे निर्णय घेण्याची सवय करा.
एकदा निर्णय घेतला की त्यावर ठाम राहा
मैत्रिणींनो, स्त्रिया निर्णय घ्यायला लागतात, तेव्हा त्यांच्यात आत्मविश्वासाची बीज रोवली जातात, त्या स्वतःच्या गरजांकडे लक्ष द्यायला लागतात. समाज आणि कामाच्या ठिकाणी आपला ठसा उमटवायला लागतात.
मात्र, केवळ स्वतःचे निर्णय घेणं महत्त्वाचं नाही, तर इतरांच्या निर्णयांचा आदर करणंही तितकंच गरजेचं आहे. प्रत्येकाची विचारसरणी, अनुभव आणि गरजा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे आपले निर्णय कोणावरही लादण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःच्या निर्णयांचा आदर करा आणि दुसऱ्यांच्या सुद्धा.
मैत्रिणींनो, मला खात्री आहे, तुमच्यातल्या अनेक जणींना निर्णय घ्यायची सवय नसल्यामुळे भीती वाटू शकते. अशा वेळेला छोट्याछोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. अगदी आज काय खायचं, कुठे जायचं, काय कपडे घालायचे अशा स्वतःशी संबंधित गोष्टींबद्दल निर्णय घ्यायला लागा आणि हळूहळू मोठे निर्णय घेण्याची सुद्धा सवय करा. निर्णय घेण्याची कला तुम्ही विकसित केल्यावर तुमचं आत्मभान वाढेल, तुम्हाला आत्मविश्वास मिळेल आणि तुमचं आयुष्य अधिक स्पष्ट संयमित आणि समाधानी बनेल.
एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा. स्वतःच्या निर्णयांना मान्यता द्या आणि इतरांच्या निर्णयाचाही आदर करा. कारण हीच खरी निर्णयक्षमतेची सुरुवात असेल.