वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी विजयी टक्केवारी चांगली असणं गरजेचं आहे. त्यामुळे शर्यतीत असलेले 9 संघ यासाठी प्रयत्नशील आहेत. इंग्लंडने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. तिसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर विजयी टक्केवारी वाढली. पण अवघ्या दोन दिवसातच त्यात घट झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. सामना जिंकूनही इंग्लंडचे दोन अंक कापण्यात आले आहेत. इतकंच काय बेन स्टोक्स अँड कंपनीवर सामना मानधनाच्या 10 टक्के दंड लावण्यात आला आहे. यामुळे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन संतापला आहे. त्याने आयसीसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इतकंच काय तर चूक ही दोन्ही संघांची होती तर दंड फक्त इंग्लंड संघालाच का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
मायक वॉन याने ट्वीट करत लिहिलं की, ‘खरं सांगायचं तर दोन्ही संघांनी लॉर्ड्सवर धीम्या गतीने गोलंदाजी केली होती. पण एकाच संघाला याची शिक्षा मिळाली. हे माझ्या समजण्यापलीकडे आहे.’ मागच्या पर्वातही इंग्लंडला गुणतालिकेत स्लो ओव्हर रेटचा फटका बसला होता. इंग्लंडचे 22 गुण कापले होते. त्यामुळे विजयी टक्केवारीत घसरण झाली होती. तेव्हा इंग्लंडची विजयी टटक्कावीरी 43.18 वर राहिली. त्यामुळे पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे यंदाही जर स्लो ओव्हर रेटचा फटका बसला तर अंतिम फेरी गाठणं कठीण होईल.
आयसीसीने सांगितलं की, इंग्लंडवर आचार संहितेच्या कलम 2.22 च्या अंतर्गत दंड ठोठावला आहे. नियमानुसार, जर संघ ठरलेल्या वेळात गोलंदाजी पूर्ण करत नसेल तर प्रत्येक षटकात 5 टक्के दंड लागतो. दुसरीकड, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने संथ गतीने गोलंदाजी केल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे याबाबत सुनावणी करण्याची गरजच भासली नाही.