दबावाचे तंत्र सगळीकडे रात्रंदिवस चालूच असते. दाब आणण्याने काम होते किंवा बिघडते पण. सर्वप्रथम आपण अनुभवतो तो हवेचा दाब! डोंगरमाथ्यावर हवेचा दाब कमी झाला की श्र्वासाची फास-फूस सुरू! व्यवहारात, धंद्यात दाब देऊन कामे होतात व बिघडतातही. राजकारणात तर केवळ दबावाचेच राजकारण चालते. जीवनऊर्जा आणि रक्तप्रवाह व्यवस्थित चालण्यासाठी रक्तदाबाचे तंत्र महत्त्वाचे ठरते. दाब कमीही चालत नाही व जास्तही चालत नाही. एकूण या दाबाचे संतुलन म्हणजेच जीवनाचे संतुलन व आत्मसंतुलन!
रक्त जरी सर्व शरीराला व्यापून असले व रात्रंदिवस गतिशील असले तरी ते रक्तवाहिन्यांमध्ये बंदिस्त असते. मेंदू, हृदय, मूत्रपिंड वगैरे मोठे अवयव असोत किंवा करंगळीचे टोक असो, सर्व दूर रक्तवाहिन्यांमधून रक्त फिरत असते. यालाच रक्ताभिसरण क्रिया म्हणतात व त्यातूनच रक्तदाब तयार होत असतो.
आम्ही जेव्हा गुजरातमध्ये बडोद्याला राहात होतो, त्यावेळी ‘नळाचे पाणी’हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय असे. प्रत्येक घरी-दारी सर्व जण पाण्याबाबत अत्यंत जागरूक असत. घरातील नळाला बहुतेक वेळा पाणी येत नसे. बाहेर रस्त्यावर भिंतीच्या आत कोनाडा खोदून तेथे एक नळ घेतलेला असे. घागर किंवा बादली भरायला लावली की तासन् तास बाजूला उभे राहावे लागे.
कारण बादली भरत असताना मध्येच येऊन गायीने बादलीत तोंड घालू नये व बादली भरल्यावर पाण्याचा एक थेंबही वाया जाऊ नये यासाठी दक्ष राहावे लागे. एकूणच पाण्याचे दुर्भिक्ष्य! आणि त्यातून पाण्याला दाब नसल्याने नळातून थेंब थेंब झिरपणाऱ्या पाण्यावर चालवून घ्यावे लागत असे. ज्या ज्या ठिकाणी पाणी कमी व तेही कमी दाबाने येते तेथे सर्वच ठिकाणी हीच तऱ्हा असते.
शरीरात खेळणारे रक्त मात्र पूर्ण पुरवठा व संतुलित दाबाने न झाल्यास चालवून घेण्याची काहीच सोय नाही. शरीराला अपुरा रक्तपुरवठा झाल्यास लगेच हातापायांना झिणझिण्या, मुंग्या किंवा डोळ्यापुढे अंधारी येण्याचा व जास्त दाबाने रक्तपुरवठा झाल्याने मेंदू रागावल्यास एखादी नस तडकून फाटण्याचाही संभव असतो.
जसे पाणी फिल्टर केले तरी पाण्याला प्रेशर नसल्याने त्यातील सूक्ष्म कचरा व विरघळलेली द्रव्ये नळात साठून नंतर वाहत्या पाण्याला अडथळा येतो तसेच रक्तातील अशुद्धतेमुळे म्हणजेच आहारातून आलेल्या चुकीच्या द्रव्यांमुळे व पचन नीट न झाल्यामुळे राहिलेल्या मलामुळे शरीरातील रक्तवाहिन्या कडक तर होतातच पण आत थर साठल्यामुळे त्यांची रक्त वाहून नेण्याची क्षमता पण कमी होते.
अशा परिस्थितीतही मनुष्य सर्व तऱ्हेचे काम वाढवून करतच राहतो तेव्हा अशा खराब रक्तवाहिन्या असूनही रक्तपुरवठा व्यवस्थित व्हावा अशा उद्देशाने हृदयाचा पंप अधिकाधिक दाब वाढवण्याचा प्रयत्न करतो. हाच तो नको असलेला आणि इतर अनेक त्रास वाढवणारा रक्तदाब! अर्थात याउलट कधी कधी एकदम दाब कमीही होऊ शकतो, व तोही त्रास देतो.
हृदय मुख्य पंपाचे काम करतो. या पंपाला मिळणारी प्राण व अग्नीची ठिणगी प्रत्यक्ष परमेश्र्वराकडूनच मिळते. जीवनाच्या गरजांशी ह्या पंपाचा संबंध जोडणारे मन पण येथे असते. हा भेद सोडला तर हृदय हा विहिरीवर बसवलेल्या पंपासारखा पंपच आहे. पाण्याच्या पंपाची एक गंमत सर्वांनाच माहिती आहे की त्याचे सक्शन म्हणजेच पाणी खेचण्याची क्षमता मर्यादित असते तर डिलिव्हरी म्हणजे पाणी चढवण्याची क्षमता खूप असू शकते.
हृदयाची कार्यकारणक्षमता कमी झाली, प्रेशर व वाढलेला रक्तदाब औषधांनी नियंत्रित केला तरी रक्तातील शक्ति वापरल्यानंतर उरलेले पाणी शरीरात व विशेषतः पायात साठत जाते आणि या पायावरील सूजेचा परिणाम पुन्हा रक्तदाब वाढण्यास कारणीभूत होतो.
एकूणच रक्ताच्या अभिसरणावर रक्तदाब अवलंबून असल्याने पंप म्हणजे हृदयातच बिघाड झाला तर रक्तदाब असंतुलित होईल यात काही नवल नाही. मूत्रपिंड हा अवयवही रक्ताभिसरण व्यवस्थेत काम करत असल्याने असंतुलित रक्तदाबाने मूत्रपिंड बिघडू शकते किंवा मूत्रपिंडात काही दोष उत्पन्न झाल्यास रक्तदाब वाढू शकतो. अन्न न पचल्यामुळे व पित्तदोष वाढेल अशा वागण्याने वाढलेले पित्त रक्तात मिसळल्यामुळेसुद्धा रक्तदाब वाढू शकतो.
मानसिक ताण व मेंदूवर आलेला ताण या दोन्हीमुळेही रक्तदाब वाढू शकतो. पण तरीही मानसिक ताण हे सर्वांत मोठे कारण ठरू शकते. म्हणून रक्तदाबाचा विकार होऊ नये किंवा झालेल्या रक्तदाबावर कमीत कमी औषधे घेऊन किंवा औषधे न घेता इलाज करता यावा अशी योजना करणे आवश्यक आहे.
या योजनेत व्यायाम, योग, प्राणायाम, चालणे, स्वतःच्या प्रकृतीचा म्हणजेच वात-पित्त-कफ यांचा अभ्यास करून पचेल असा नियमित आहार, पोट व लघवी साफ होईल यावर कडक लक्ष, जीवन पद्धतीत बदल म्हणजेच स्वतःस सुधारण्याचा प्रयत्न, सर्वांबरोबर मैत्री, सर्वांना मदत करण्याची प्रवृत्ती, रोज नियमाने स्वास्थ्यसंगीत व ध्यान म्हणजे ‘स्व’ चा अभ्यास व बाह्यजगताशी असलेला संबंध शोधणे या सर्व गोष्टींचा समावेश असावा.
वरील यादी फार मोठी वाटली तरी या सर्व गोष्टीं आपण रोज करतोच. रक्तदाब, हृदयविकार वगैरे त्रास होऊ नये असे वाटत असेल तर या सर्व गोष्टींचे विज्ञान समजून घेऊन थोडेसे अनुशासन करावे लागेल एवढेच.
प्रत्येक माणसाच्या शरीर रचनेचे मॉडेल वेगळे असते. तेव्हा मुळातील संतुलित रक्तदाब सुद्धा कमी अधिक फरकाने वेगवेगळा असतो. तसेच सांसारिक चढउतारात, कामाच्या ताणात जरासा रक्तदाब वाढला तर मुळीच घाबरून जाऊ नये.
पण तसेच हा रक्तदाब रोगाच्या स्वरूपात शरीरात ठाण मांडत नाही ना, यावरही लक्ष ठेवावे. किंबहुना रक्तदाबाच्या विकारामुळे दुसरे अनेक त्रास होऊ शकतात हे लक्षात ठेवून रक्तदाबाचा विकार होणार नाही यासाठी शांत मनाने विचारपूर्वक प्रयत्न करावेत.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)