भारतीय क्रिकेट संघाने गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनात आणि रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 9 मार्च रोजी न्यूझीलंडला अंतिम सामन्यात 4 विकेट्सने पराभूत केलं. टीम इंडियाने यासह आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (CT 2025) जिंकली. टीम इंडियाच्या खेळाडूंनी या संपूर्ण स्पर्धेत अंतिम फेरीसह एकूण 5 सामने खेळले आणि ते जिंकलेही. थोडक्यात सांगायचं तर टीम इंडिया या स्पर्धेत अजिंक्य राहिली. भारतासाठी प्रत्येक सामन्यात वेगवेगळ्या खेळाडूंनी निर्णायक भूमिका बजावली. स्पर्धेतील 5 सामन्यांमध्ये 4 वेगवेगळे खेळाडू हे ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरले. विराट कोहली याने 2, तर रोहित, उपकर्णधार शुबमन गिल आणि वरुण चक्रवर्ती या तिघांनी प्रत्येकी 1-1 वेळेस हा पुरस्कार जिंकला.
टीम इंडियाच्या खेळाडूंनी बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगसह योगदान दिलं. या स्पर्धेसाठी एकूण 15 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. मात्र त्यापैकी ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर आणि अर्शदीप सिंह या तिघांचा अपवाद वगळता इतर सर्व खेळाडूंना प्लेइंग ईलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली. टीम इंडियाच्या या 12 खेळाडूंनी स्पर्धेत कशी कामगिरी? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. तसेच त्याआधी भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासह काही विक्रम केलेत. तसेच काही वर्ल्ड रेकॉर्डही केले. रोहितसेनेने नक्की काय काय केलं? हे सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडियाने साखळी फेरीत अनुक्रमे बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला पराभूत करत विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. त्यानंतर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलचा वचपा काढला. त्यानंतर भारत-न्यूझीलंड साखळी फेरीनंतर अंतिम सामन्यात भिडले. भारताने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये 252 धावांचं आव्हान 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. भारताने अशाप्रकारे एकूण आणि सलग 5 सामने जिंकत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
भारताने यासह 9 महिन्यांत रोहित शर्मा याच्या नेतृत्वात दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. रोहितसेनेने चॅम्पियन्स ट्रॉफीआधी 29 जून 2024 रोजी दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी 20i वर्ल्ड कप जिंकला होता. तसेच भारताने 12 वर्षांची प्रतिक्षाही संपवली. टीम इंडियाने याआधी 23 जून 2013 रोजी महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात इंग्लंडला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
भारताची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची ही तिसरी वेळ ठरली. टीम इंडियाने या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयासह वर्ल्ड रेकॉर्ड केला. सर्वाधिक 3 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारी इंडिया पहिलीच टीम ठरली. तसेच न्यूझीलंडचा हिशोबही चुकता केला. टीम इंडियाने 2002 साली श्रीलंकेविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी शेअर केली होती. अर्थात श्रीलंका आणि भारत संयुक्त विजेते ठरले होते. तर त्याआधी 2000 साली न्यूझीलंडने भारताला आयसीसी नॉकआऊट फायनलमध्ये पराभूत केलं होतं. भारताने त्या पराभवाची 25 वर्षांनंतर परतफेड केली.
दरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीची चौथी तर रवींद्र जडेजाची ही तिसरी आयसीसी ट्रॉफी ठरली. रोहित याआधी टी 20 वर्ल्ड कप (2007 आणि 2024) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 विजयी संघातील सदस्य होता. तर विराट वनडे वर्ल्ड कप 2011, चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 आणि टी 20 वर्ल्ड कप 2024 विजेता संघात होता. तर रवींद्र जडेजाची तिसरी ट्रॉफी ठरली. जडेजा याआधी टी 20 वर्ल्ड कप 2024 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 विजेता संघाचा भाग होता.
कॅप्टन रोहित शर्मा
रोहितने कर्णधार म्हणून त्याची भूमिका चोखपणे पार पाडली. रोहितला फलंदाज म्हणून काही खास करता आलं नाही. मात्र रोहितने अंतिम फेरीत सर्व भरपाई केली. रोहितने अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 252 धावांचा पाठलाग करताना 76 धावांची झंझावाती खेळी करुन टीम इंडियाला स्फोटक सुरुवात करुन दिली. रोहितला या खेळीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. रोहितने संपूर्ण स्पर्धेत 5 सामन्यांमध्ये 180 धावा केल्या. तसेच 1 कॅचही घेतली.
उपकर्णधार शुबमन गिल
उपकर्णधार शुबमन गिल याने चॅम्पियन्स ट्रॉफीत शतकाने सुरुवात केली. शुबमनला त्यासाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ घोषित करण्यात आलं. गिलने एकूण 5 सामन्यांमध्ये 188 धावा केल्या. तसेच 5 कॅचेसही घेतल्या.
अनुभवी विराट कोहली
रनमशीन, चेजमास्टर, किंग कोहली अशी अनेक बिरुदावली मिरवणाऱ्या विराटने धमाकेदार कामगिरी केली. विराटने 5 सामन्यांमध्ये 1 शतकासह 218 धावा केल्या. तसेच 7 कॅचेस घेतल्या आणि 1 रन आऊट केला. विराट एकूण 2 वेळा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
मिडल ऑर्डरचा कणा श्रेयस अय्यर
श्रेयस अय्यर याने संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या. श्रेयसने 5 सामन्यांमध्ये 243 धावा केल्या. श्रेयसने मिडल ऑर्डरमध्ये चौथ्या स्थानी निर्णायक भूमिका बजावली. तसेच श्रेयसने टीम इंडिया अडचणीत असताना तारणहाराची भूमिका बजावली. तसेच श्रेयसने 2 कॅच घेण्यासाठी 1 रन आऊटही केला.
विकेटकीपर केएल राहुल
विकेटकीपर म्हणून केएल राहुल याने चांगली कामगिरी केली. तसेच केएलने बाद फेरीतील सामन्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. केएलने 140 धावाच केल्या. मात्र त्याने ज्या क्षणी या धावा केल्या ती वेळ फार अटीतटीची होती. केएलने या धावांसह स्टंपमागून 5 कॅचेस घेतल्या. तसेच 1 रन आऊटमध्ये योगदान दिलं.
ऑलराउंडर अक्षर पटेल
अक्षर पटेल याने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर निर्णायक भूमिका बजावली. अक्षरने पाचव्या आणि त्या खालील स्थानी येत बॅटिंग केली. अक्षरने एकूण 109 धावा केल्या. तसेच 5 विकेट्सही घेतल्या. सोबतच 2 रन आऊट आणि 2 कॅचेसही घेतल्या.
हार्दिक पंड्या
ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने 99 धावा केल्या आणि 4 विकेट्स घेतल्या. हार्दिकने मोक्याच्या क्षणी छोटेखानी पण महत्त्वाची खेळी केली. तसेच 2 कॅचेसही घेतल्या.
‘सर’ रवींद्र जडेजा
ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने 5 विकेट्स घेतल्या. तसेच 27 धावा केल्या. सोबत 1 कॅचही घेतली. मात्र जडेजाने नेहमीप्रमाणे अप्रतिम फिल्डिंग केली. तसेच जडेजाने फिल्डिंगद्वारे कितीतरी धावा रोखल्या.
कुलदीप यादव
फिरकीपटू कुलदीप यादव याने एकूण 7 विकेट्स घेतल्या. मात्र अंतिम सामन्यात 2 विकेट्स घेत कुलदीपने सामन्यात टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणून ठेवण्यात मदत केली. तसेच कुलदीपने 1 कॅचही घेतली.
‘मिस्टर आयसीसी’ मोहम्मद शमी
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने या स्पर्धेत एकूण 9 विकेट्स घेतल्या. शमीने बांगलादेशविरुद्ध 5 विकेट्सही घेतल्या. अंतिम फेरीत 1 विकेट मिळवली. तर स्पर्धेत एकमेव कॅच घेतली.
‘मिस्ट्री स्पिनर’ वरुण चक्रवर्ती
वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा या दोघांची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अखेरच्या क्षणी निवड करण्यात आली. कॅप्टन रोहितने हर्षितच्या जागी वरुणला संधी दिली. वरुणने कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला. वरुणने 3 सामन्यांमध्ये 9 विकेट्स घेतल्या. वरुणने न्यूझीलंडविरुद्ध त्याच्या पहिल्या सामन्यात 5 विकेट्स घेतल्या. त्यासाठी वरुणला ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आलं. त्यानंतर वरुणने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमी फायनल आणि अंतिम फेरीत प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
हर्षित राणा
हर्षित राणा याला फक्त 2 सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली. हर्षितने एकूण 4 विकेट्स घेतल्या. हर्षितने बांगलादेशविरुद्ध 3 आणि पाकिस्तानविरुद्ध 1 विकेट घेतली.
तसेच अर्शदीप सिंह, वॉशिंग्टन सुंदर आणि ऋषभ पंत या तिघांना प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकदाही संधी मिळाली नाही. मात्र या तिघांनी एनर्जी ड्रिंकसह ड्रेसिंग रुम ते ऑन फिल्ड खास मेसेज पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली. त्यामुळे यांचंही योगदान विसरुन चालणार नाही. तसेच हेड कोच गौतम गंभीर, बॉलिंग कोच मॉर्ने मोर्कल, फिल्डिंग कोच टी दिलीप, असिस्टंट कोच अभिषेक नायर आणि रेयान टेन डेस्काटे आणि इतर सपोर्ट स्टाफनेही पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली.