अरविंद रेणापूरकर - arvind.renapurkar@esakal.com
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वाहन क्षेत्रात सातत्याने प्रयोग होतात. काही वेळा लूक बदलणे, अतिरिक्त फीचर जोडणे, इंटीरियरमध्ये आधुनिकता आणणे यासारख्या माध्यमातून ग्राहकांना चारचाकी वाहनांकडे आणण्याचा प्रयत्न असतो. मात्र यात सर्वात कळीचा मुद्दा असतो तो मायलेजचा. म्हणून कंपन्यादेखील वाहनांच्या जाहिरातींत मायलेजचा ठळक उल्लेख करतात. अशावेळी वैशिष्ट्येपूर्ण हायब्रीड मोटार ही अन्य श्रेणीतील वाहनांच्या तुलनेत उजवी ठरू शकते. परिस्थितीनुसार इंधन स्रोतांत बदल करणाऱ्या हायब्रीड मोटारीची संकल्पना अजूनही आपल्याकडे रुजलेली नाही. प्रसंगी इलेक्ट्रिक तर प्रसंगी इंधनावर धावणाऱ्या हायब्रीड मोटारीची संस्कृती रुळण्यासाठी वेळ लागेल, असे म्हटले जाते. भारतात हायब्रीड मोटार किंवा एसयूव्हीची किंमत सुमारे दहा ते बारा लाख रुपयांपासून सुरू होते.
सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला असताना दुसरीकडे अनेक वाहन कंपन्यांनी हायब्रीड श्रेणीतील मोटारी आणत ग्राहकांना वैशिष्ट्यपूर्ण पर्याय उपलब्ध करून दिला आहे. हायब्रीड मोटारींना इलेक्ट्रिक वाहनांएवढीच मागणी असल्याचे चित्र आहे. आजमितीस बाजारात तीन प्रकारची वाहने आहेत. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी. दुसरे म्हणजे इलेक्ट्रिक मोटार आणि तिसरे म्हणजे हायब्रीड. हायब्रीड श्रेणी इंधन व इलेक्ट्रिकचे कॉम्बिनेशन. हायब्रीड वाहन धावत असताना इलेक्ट्रिक मोटार आणि बॅटरीचादेखील वापर होतो.
हायब्रीड श्रेणीत तीन प्रकारहायब्रीड श्रेणीत तीन प्रकारच्या मोटार आहेत. या मोटारींचा प्रमुख उद्देश इंधनाचा वापर कमी करणे. यात माइल्ड हायब्रीड, स्ट्राँग हायब्रीड आणि प्लग इन हायब्रीड असे प्रकार अाहेत. माइल्ड हायब्रीडमध्ये कमी क्षमतेची बॅटरी असते. यामुळे मायलेज वाढताे. स्ट्राँग हायब्रीड मोटारीत अधिक ऊर्जा निर्माण करणाऱ्या बॅटरीचा वापर होतो. यात बॅटरी इंजिनने जनरेट होणाऱ्या ऊर्जेतून चार्ज होते आणि पुन्हा चाकांना ऊर्जा प्रदान करीत मायलेज वाढविण्याचे काम करते. तिसऱ्या प्रकारची प्लग इन हायब्रीड मोटार असून, ती प्लग इन करीत चार्ज करण्यात येते. या मोटारीत विजेचा अधिक वापर होतो आणि मायलेजही चांगला मिळतो. हायब्रीड मोटारीत रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम असते आणि या व्यवस्थेमुळे ब्रेक लावल्यानंतर तयार होणारी ऊर्जा बॅटरीत साठविली जाते. परिणामी बॅटरीचे आयुष्य वाढते आणि मोटार चांगली कामगिरी करते.
हायब्रीड श्रेणीमाइल्ड : यात इंधन आधारित इंजिन अणि इलेक्ट्रिक मोटार असे दोन्ही असते.
माइल्ड हायब्रीड मोटार इलेक्ट्रिक ऊर्जेवर धावत नाही. या श्रेणीत इर्टिगा, सियाज, बलेनो यासारख्या मोटारींचा समावेश होतो.
स्ट्राँग किंवा फुल हायब्रीड : यात इंधन इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटार एकाचवेळी काम करते. शिवाय एकमेकापासून विलग होतानाही काम करू शकतात.
इंजिन किंवा इलेक्ट्रिक हे आपोआप सुरू होते. होंडा सिटी हायब्रीड, टोयोटा हायरायडर, ग्रँड व्हिटारा या स्ट्राँग हायब्रीड श्रेणीत मोडतात.
प्लग इन हायब्रीड : या मोटारीला इलेक्ट्रिक मोटारीप्रमाणे चार्ज करू शकता.
मोटारीत इंधन इंजिनशिवाय मोठ्या क्षमतेची बॅटरीदेखील असते. टेक्नॉलॉजी पोर्श, कायेन, व्हॉल्वो एक्स सी ९० यासारख्या आलिशान मोटारींचा उल्लेख करावा लागेल.
स्रोतांचा अनोखा वापरसामान्य मोटारीच्या तुलनेत अधिक मायलेज देतात.
पेट्रोल आणि डिझेल मोटारीच्या तुलनेत अधिक पर्यावरणपूरक.
मुख्य इंजिन बंद पडले तरी बॅटरीतून वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित होते.
अधिक ऊर्जेची गरज भासल्यास दोन्ही पॉवर स्रोतांचा वापर करूत ते सक्रिय होतात.
सध्या हायब्रीड मोटारींची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. ऑटोमोटिव्ह अॅनालिटिक्स आणि सल्लागार संस्था जाटो डायनामिक्सच्या आकडेवारीनुसार, २०२४मध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री १,१३,४४१ यूनिटवर पाेचलेली असताना २०२३मध्ये ही संख्या ९५,८५९ यूनिट होती. या काळात हायब्रीड वाहनांच्या विक्रीने उसळी घेतल्याचे दिसून येते. भारतात २०२३मध्ये ८८,५१९ यूनिट हायब्रीड मोटारींची विक्री झाली आणि २०२४ मध्ये यात विक्रमी वाढ होत ती १,०३,२५२ यूनिटवर पोचली. हायब्रीड मोटारीत अधिक मायलेज मिळण्याबरोबरच लांब पल्ल्याचा प्रवास करणेही सुलभ आहे.
शिवाय हायब्रीड मोटारीसाठी चार्जिंगसाठी वेगळा पॉइंट बसविण्याची गरज नाही. यासंदर्भात वाहन कंपनीत दोन दशकांपासून कार्यरत असणारे अभियंता धनंजय कुलकर्णी यांच्या मते, ‘‘हायब्रीड मोटार आटोकन्वर्ट तंत्राने चालते. सिग्नलजवळ वाहन थांबले की इंजिन आपोआप बंद होते आणि सुरू होताना ती इलेक्ट्रिक होते. अशा स्थितीत इंधन वाचते आणि प्रदूषणही होत नाही. शहरी भागात वाहतूक कोंडीची स्थिती पाहता एकाच जागी वाहन बराच काळ थांबून राहते. अशावेळी इंधनाचा अकारण वापर होतो; पण हायब्रीड श्रेणीत इंधनाचा बचाव होतो. वेग मंदावला की ती आपोआप इलेक्ट्रिक होते. सध्या शहरात हायब्रीड वाहनांकडे कल दिसत असला तरी ग्रामीण भागात या श्रेणीचे प्रस्थ वाढण्यास बराच वेळ लागेल. कारण तेवढी पायाभूत सुविधा असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.’’
हायब्रीड खरेदीचे कारणचांगला मायलेज : हायब्रीड मोटार पूर्णपणे एकाच इंधनावर अवलंबून नसते. त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी राहते. हायब्रीड मोटारीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे दमदार मायलेज. कमी वेग असताना इलेक्ट्रिक मोटारचा वापर होतो आणि त्यामुळे इंधन कमी लागते. साहजिकच इंधनावरचा खर्च कमी होतो.
पर्यावरणपूरक : पर्यावरणासाठी हायब्रीड मोटार उत्तम आहे. अन्य वाहनांच्या तुलनेत प्रदूषण कमी राहते. इलेक्ट्रिक माेटारीमुळे हानिकारक गॅसचे उत्सर्जन कमी राहते आणि परिसरातील हवा शुद्ध राहते. पर्यावरणाचा विचार करीत असाल तर हायब्रीड मोटार चांगला पर्याय आहे.
गोंगाट कमी : हायब्रीड मोटारीतून प्रवास करणे हा सुखद अनुभव असतो. इलेक्ट्रिक मोटारीमुळे इंजिनचा आवाज कमी राहतो. अशावेळी प्रवास शांततेत आणि आरामदायी होतो.
सभोवताली धावणाऱ्या गाड्या कर्कश आवाज करीत असल्या तरी हायब्रीड मोटार ध्वनिप्रदूषण करीत नाही.
अंशदानाचा लाभ : हायब्रीड मोटारीच्या खरेदीला चालना देण्यासाठी सरकारकडून अंशदान दिले जाते. त्यामुळे या मोटारीची किंमत आपोआपच कमी होते आणि सामान्य लोकांना खरेदी करणे सुलभ जाते. ‘फेम-२’सारख्या योजनांनुसार हायब्रीड वाहनाच्या खरेदीवर अंशदान आणि करसवलत मिळते. देखभालीचा खर्चही कमी आहे.
चांगली रीसेल व्हॅल्यू : हायब्रीड मोटारींना मागणी वाढत असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम रीसेल व्हॅल्यूवरदेखील होतो. भविष्यात तुम्हाला हायब्रीड मोटारीची विक्री करायची असेल तर त्याची चांगली किंमत मिळू शकते. ही एक प्रकारची गुंतवणूकच म्हणावी लागेल.
एकुणातच चांगला मायलेज, कमी प्रदूषण, आरामदायक प्रवास, अंशदान आणि चांगले रीसेल मूल्य यासारख्या फायद्यामुळे ग्राहक एका पर्यायावर चालणाऱ्या वाहनांवर अवलंबून राहण्यापेक्षा बहुपर्यायी हायब्रीड मोटार खरेदीचा विचार करीत आहेत.
भारतात हायब्रीड श्रेणीच्या मोटारीहायब्रीड एसयूव्ही किंवा सेदान श्रेणीतील वाहने भारतीय ग्राहकांसाठी डिझेलला चांगला पर्याय राहू शकतात. अन्य वाहनांच्या तुलनेत हायब्रीड मोटारी अधिक वास्तववादी ठरू शकतात. कारण त्यांच्या चार्जिंगसाठी वेगळी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज भासत नाही. ‘ग्रांट थॉर्नटन भारत’ सर्वेक्षणानुसार ४० टक्के नागरिक हायब्रीड वाहनांना प्राधान्य देत असताना १७ टक्के ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत असल्याचे चित्र आहे.
तसेच सुमारे ३४ टक्के ग्राहक अजूनही पेट्रोलवर धावणाऱ्या वाहनांना पसंती देतात. एकूणातच भारतात इंधन, इलेक्ट्रिक आणि हायब्रीड या तिन्ही वाहनांचा ट्रेंड कमी-जास्त प्रमाणात दिसून येतो. अर्थात तरुणाईचा कल यात सर्वात महत्त्वाचा असून, त्यानुसार वाहन कंपन्या बाजारात वाहने आणत असतात. आता तर दूचाकीतही हायब्रीड श्रेणी येत आहे. त्यामुळे हायब्रीडची बाजारपेठ अधिक बहरण्याची शक्यता आहे. २०२४ पर्यंत भारतात ३४ पेक्षा अधिक हायब्रीड श्रेणीतील विविध कंपन्यांच्या मोटार उपलब्ध असल्याची नोंद आहे. यापैकी काही वाहनांची माहिती घेऊ.
मारुती ग्रँड व्हिटारामारुती ग्रँड व्हिटारा माइल्ड आणि स्ट्राँग हायब्रीड श्रेणीत पाहावयास मिळते. यात १.५ लिटर, तीन सिलिंडर इंजिन असून, ते ९१.१८ बीएचपीची ऊर्जा आणि १२२ एनएमचा टॉर्क जनरेट करते. पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटार असे एकत्रितपणे २७.९७ किलोमीटरचा मायलेज मिळतो. यात स्टँडर्ड रूपात ई-सीव्हीटी गिअरबॉक्सचा पर्याय आहे.
टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडरटोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर मध्यम आकाराची हायब्रीड एसयूव्ही आहे. हायब्रीड श्रेणीतील हायरायडरमध्ये कंपनीने १.५ लिटर हायब्रीड इंजिन दिले असून, ते १७७ व्होल्ट लिथियम आयर्न बॅटरीपॅकच्या मदतीने ९१ बीएचपीची ऊर्जा आणि१२२ एनएमचा टॉर्क जनरेट करते. हायब्रीड हायरायडर व्हेरियंटमध्ये स्टँडर्डरूपात ई-सीव्हीटी गिअरबॉक्स मिळतो.