मोहम्मद शमी मुलगी: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. यापूर्वी शमी रोजा न पाळल्यामुळे चर्चेत होता. आता मोहम्मद शमीची घटस्फोटीत पत्नी आणि त्याच्या मुलीने धुलवड साजरी केल्याने पुन्हा एकदा तो चर्चेत आलाय. शमीच्या मुलीने आईसोबत धुळवड साजरी केली, तेव्हापासून शमीला टीकेला सामोरे जावे लागत आहे. रमजान सुरु असताना खेळवण्यात आलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीने एनर्जी ड्रिंक प्यायला. त्यावरुन वादग्रस्त वक्तव्य करणारे ‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी आता शमीच्या मुलीच्या धुळवड खेळण्यावर आक्षेप नोंदवलाय. हे शरियतच्या विरोधात असल्याचं मौलानांनी म्हटलंय.
मौलाना रझवी यांनी शनिवारी संध्याकाळी (दि.15) उशिरा जारी केला. या व्हिडीओमध्ये ते म्हणाले, शमीच्या मुलीने धुलवड साजरी करणे म्हणजे शरीयतच्या विरोधात आहे. ती लहान मुलगी आहे, तिने न समजता होली खेळली तर हरकत नाही, पण ती समजूतदार असेल आणि तरीही होली खेळत असेल तर ते शरियतच्या विरोधात मानले जाईल, असे त्यांनी सांगितले. मी यापूर्वीही शमीला सल्ला दिला होता, परंतु असे असतानाही, त्याच्या मुलीची होली खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, असंही मौलाना रझवी यांनी सांगितलं.
पुढे बोलताना मौलाना रझवी म्हणाले, “मी शमीसह कुटुंबातील सर्व सदस्यांना आवाहन केले आहे की त्यांनी आपल्या मुलांना जे शरियतमध्ये नाही ते करू देऊ नये. होली हा हिंदूंचा मोठा सण आहे, पण मुस्लिमांनी धुळवड खेळणे टाळावे. कारण जर कोणी शरीयत माहीत असूनही होळी खेळत असेल तर तो गुन्हा आहे.
याआधी मौलाना रझवी यांनी 6 मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यादरम्यान एनर्जी ड्रिंक प्यायल्याबद्दल शमीवर टीका केली होती. रोजा न ठेवल्याने शरीयतच्या दृष्टीने शमी ‘गुन्हेगार’ असल्याचं ते म्हणाले होते. क्रिकेट खेळणे वाईट नाही, पण मोहम्मद शमीने आपली धार्मिक जबाबदारी पार पाडली पाहिजे. मी शमीला शरियतच्या नियमांचे पालन करण्याचा आणि त्याच्या धर्माप्रती जबाबदार राहण्याचा सल्ला देतो, असंही मौलानांनी त्यावेळी बोलताना म्हटलं होतं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..