सटाणा- दऱ्हाणे (ता. बागलाण) येथील सलून व्यावसायिक विजय महाले (वय २५) या युवकाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या सटाणा शहरातील १२ खासगी सावकारांवर सटाणा पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. इतर चार जण फरारी आहेत. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी ही माहिती दिली. दरम्यान, पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे सटाणा शहरासह बागलाण तालुक्यात अवैध खासगी सावकारी व्यवसाय चर्चेत आला आहे.
गेल्या १५ फेब्रुवारीस सटाणा शहरातील मुख्य महामार्गावरील एका लॉज मध्ये दऱ्हाणे येथील सलून व्यावसायिक जनार्दन महाले या सलून व्यावसायिकाने आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी जनार्दन याने खासगी सावकाराकडून घेतलेले पैसे वेळेवर परत होत नसल्याने त्यांच्याकडून वारंवार धमक्या येऊ लागल्याने आत्महत्या करत असल्याचे स्वःताच्या मोबाईल मध्ये त्यांच्याच आवाजात रेकॉर्डिंग करून ठेवले होते. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया राबवीत मोबाईलची तपासणी केली असता धक्कादायक वास्तव पोलिसांच्या हाती लागले. मोबाईल मध्ये मिळालेल्या जनार्दन यांच्या आवाजातील रेकॉर्डिंग मध्ये खासगी सावकाराकडून घेतलेल्या पैशाचा व त्या सावकारांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आढळून आला.
पोलिसांनी प्राप्त परिस्थितीच्या आधारावर संबंधितांची कसून चौकशी केली असता प्रथमदर्शनी त्यात सत्यता आढळली. त्या पुराव्यांच्या आधारावर १२ पैकी ८ खासगी सावकारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चार जण अजूनही फरार आहेत.अनधिकृत खासगी सावकारी करणे व युवकांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्या प्रकरणी १२ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे.
सटाणा शहर व बागलाण तालुक्यात खासगी सावकारांकडून मानसिक व शारीरिक छळ होत असणाऱ्या व्यक्तींनी पुढे येऊन पोलिसांत तक्रार करावी. त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील.
- बाजीराव पोवार, पोलिस निरीक्षक, सटाणा