व्यावसायिकाचे अपहरण करणाऱ्या टोळीचा शोध सुरू
esakal March 21, 2025 12:45 PM

व्यावसायिकाचे अपहरण करणाऱ्या टोळीचा शोध सुरू
नवी मुंबई, ता. २० (वार्ताहर) : पाच जणांच्या अज्ञात टोळीने कोपरखैरणे येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याचे अपहरण केले. शिवाय आक्षपार्ह व्हिडिओ तयार करून त्याच्याकडे १० लाख रुपयांची खंडणीदेखील मागितली. एपीएमसी पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात टोळीविरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे. काही संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याचेही समजते.
या प्रकरणातील तक्रारदार व्यावसायिक कोपरखैरणेमध्ये राहण्यास असून त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवले. त्यानंतर या टोळीने ४ मार्चला रात्री बेदम मारहाण करून अपहरण करून मुंबईतील डोंगरी भागात नेले. त्यानंतर त्याला तेथील एका बाथरूम मध्ये कोंडून ठेवले. रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेत त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केले. त्यानंतर या टोळीने मानेवर धारदार चाकू ठेवून त्यांच्याकडून त्याने एक लाख रुपये घेतल्याचे जबरदस्तीने वदवून घेतले. त्या बदल्यात त्याची स्कूटर तो स्वत:हून त्यांना देत असल्याचे जबरदस्तीने त्याला बोलायला लावले. त्यानंतर १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून पैसे न दिल्यास व्हिडिओ पत्नीला व कुटुंबीयांना पाठविण्याची धमकी दिली. या घटनेबाबत कुणाला सांगितल्यास पुन्हा अपहरण करण्यात येईल, अशी धमकी देऊन त्याला सोडून दिले. अखेर १९ मार्चला त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.