वित्त पुरवठा करण्यात जिल्हा अग्रेसर
अजिंक्य आजगेकर ः ८१७ कर्जप्रकरण बँकांकडून मंजूर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ८१७ नवउद्योजकांची कर्जप्रकरण मंजूर करून त्यांना वित्त पुरवठा करण्यात आला असून, लाभार्थ्यांना अनुदान (सबसिडी) मिळवून देण्यातही जिल्हा राज्यात अग्रेसर आहे, असे जिल्हा उद्योगकेंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी सातत्यपूर्ण बैठका घेऊन हे लक्ष्य साध्य केले आहे. जिल्ह्यातील सर्व बँकांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल त्यांनी सर्व बँकाचे अभिनंदन केले असून, भविष्यातदेखील जिल्हा आघाडीवर ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व केंद्र शासनाच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेत जिल्ह्यातील सर्व बँकांचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान देणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे. या सर्व योजनांचा लाभ जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतीने घ्यावा, असे आवाहन आजगेकर यांनी केले आहे. बँक ऑफ इंडियाने २२७, बँक ऑफ महाराष्ट्र १३३, विदर्भ कोकण ग्रामीण बँक १३३, कोटक महिंद्रा बँक ८०, स्टेट बँक ऑफ इंडियाने ६०, युनियन बँक ४७ अशी मंजुरी नोंदवली आहे तसेच जिल्ह्यातील इतर सर्व बँकांनी उद्दिष्टपूर्तीसाठी सहकार्य केले आहे. सार्वजनिक व खासगी बँकांनी त्यांना दिलेले उद्दिष्ट विहित वेळेत पूर्ण केल्याने चालू आर्थिक वर्षात योजनेंतर्गत जिल्ह्याची उद्दिष्टपूर्ती झालेली आहे.