दुपारचं पिवळं उन्ह. (थंडी गुलाबी असते म्हणून उन्ह आपलं पिवळं.) धाराशिव जिल्ह्यातील रामलिंग अरण्य (Ramalinga Forest Dharashiv). पिवळ्याधमक झाडीत सळसळ झाली. डेरेदार घावड्याच्या झाडावर आळसावलेल्या वानरांच्या टोळीतील महाळ्या वानराची तंद्री भंगली. उगाच आपल्या प्रेयसीनं 'जेवलास का? काय खाल्लं?' असं वेळी-अवेळी विचारून डोकं खाऊ नये म्हणून तिच्या केसात डोळे खुपसून उवा मारत असलेल्या तरणताठ्या हंपी वानराचा बीपी हाय झाला. चंम्पी बाळ भेदरलं. त्यानं इकडं-तिकडं काहीच न पाहता आपल्या आईच्या कुशीला आणखी घट्ट आवळलं.
महाळ्या वानरानं 'हूप.. हूप...'ची आरोळी ठोकेपर्यंत क्षणात सगळी वानरं उड्या मारून उंच फांदीवर गेली. तोच बाजूच्या बाभळीवरील निवांत बसलेला बगळ्यांचा थवा भुर्र करत आकाशात उडाला. सारंग हरणाच्या घ्राणेंद्रियानं काय ते ओळखलं आणि भरउन्हात पाणवठ्याकाठी सापडलेल्या आवडीच्या लुसलुशीत गवताला टांग मारून एकाच वेळी उंच, लांब उडी घेत शेपटीला पाय लावून धूम ठोकली. तोच इकडं मचानावर दबा धरून बसलेल्या पुणेकर (Forest Department) टीममध्ये उत्साह संचारला.
त्यांच्यातील सराईत नेमबाजानं एक डोळा बंद केला. दुसरा डोळा ताणत (मारत नव्हे) डार्ट गन सळसळीच्या दिशेनं फिरवत खटक्यावर बोट ठेवलं. ऐटीत रुबाबदार पट्टेदार वाघ झाडीतून बाहेर आला. वाघानं वाघाच्या नजरेनं इकडं पाहिलं, तिकडं पाहिलं. सावकाश पाऊल टाकत तो पाणवठ्यावर गेला. पाण्यात स्वतःच स्वतःचं प्रतिबिंब पाहून 'मचानावरून नेम लावता का? मी वाघ आहे वाघ' असं मनातल्या मनात म्हणत मिशीतल्या मिशीत हसला. तोंड बुडवलं. जीभ बाहेर काढून गटागटा पाणी प्यायला. इकडं वनविभागाच्या धुरंधर शूटरनं गनचा खटका दाबला तोच वाघानं आपलं घ्राणेंद्रिय आणि मिशी एक केली.
डार्ट सुटला. पण, वाघाला सोडाच, तो पुढं असलेल्या झाडालाही लागला नाही. वाघानं आता मचानाकडं वाघाच्या नजरेनं पाहिलं. त्याची नजर पाहून मचानावरील टीमला भर उन्हात कापरं भरलं. घामानं अंग ओलं झालंच होतं; पण आणखी काय ओलं झालं, ते त्यांनाच माहीत. ते बघून वाघ खदाखदा हसला आणि पुण्याच्या टीमला रामलिंगच्या घाटातून कात्रजचा घाट दाखवत बार्शीच्या दिशेनं चालता झाला.
चार महिन्यांपासून हा वाघ धाराशिव-सोलापूर जिल्ह्यात इकडून तिकडे, तिकडून इकडे ये-जा करतो. आता तो इथं चांगलाच रुळला. वनविभागाच्या चंद्रपूर-पुणे अशा दोन-दोन रेस्क्यू टीम आल्या. त्यांच्यावर ३० लाखांपेक्षा अधिक खर्च झाला. पहिली टीम चंद्रपूरची होती. वाघ सोडाच, त्याच्या शेपटीचा केसही त्यांच्या हाती लागला नाही. आता दुसरी टीम पुण्यावरून आली. या वाघानं डॉग स्क्वॉडलाही गोंधळून टाकलं! तो सीसीटीव्हीपुढं येतो, आपण कुठं आहे याचं स्वतःच लाइव्ह लोकेशनसह ब्रेकिंगही देतो. रील काढावी, अशी पोज देतो, डोईवरून फिरणाऱ्या ड्रोनला वाकुल्या दाखवतो. कधी लावलेल्या सापळ्यातील बोकडावर ताव मारतो, तर कधी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी बोकड सोडून देतो.
एकदा चुकून शुटरचा डार्ट बरोबर लागला. पण, काय झालं, कसं झालं? वन विभागाचं पुन्हा हसं झालं. जाळं टाकण्यापूर्वीच झोपेतून उठावं तसा तो उठला आणि "एप्रिल फुलं, एप्रिल फुलं" म्हणत निसटलाही. पुढं येडशीत जाऊन एका बिबट्याला भेटला. त्याला म्हणाला, "मी पकडला जात नाही, यात वनविभागाचं काय जातंय? उलट त्यांच्या चंद्रपूर-पुण्याच्या लोकांना इथं येऊन तुळजाभवानी, येडेश्वरीचं शासकीय खर्चानं दर्शन घेता आलं. काही तर पंढरपूरही करून आले."
त्यावर बिबट्या म्हणाला, "वाघोबा, खरं आहे तुमचं! पण काय गेलं हे तू शेतकऱ्यांना विचार? ४० जनावरांवर तू ताव मारला. तुझ्या नावाखाली मीही काहींची चव चाखली. त्यात कुणाच्या दुभत्या गायी होत्या, म्हशीही होत्या. काहींनी अडीअडचणीसाठी शेळ्या पाळल्या होत्या. त्याही तू फस्त केल्या. पण, तू का पकडला जात नाहीस, म्हणत आता त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांचं अरण्यरुदन सुरू आहे."
हे ऐकून वाघ म्हणाला, "...तर मी काय करू?" "तू काहीच करू नको" म्हणत बिबट्यानं परंड्याकडे कूच केली आणि तिथं वनविभागानं लावलेल्या पिंजर्यात स्वतःला कोंडून घेतलं. पण, वाघ कधी पकडणार, म्हणत हतबल शेतकऱ्यांचं अरण्यरुदन सुरूच आहे. दुधाची तहान ताकावर या म्हणीप्रमाणं वनविभागही बिबट्या पकडला! म्हणत स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेत आहे.