>> दिव्या नेरुरकर–सौदागर
स्त्री असो वा पुरुष आपलं स्वत्व जपलंच पाहिजे आणि ते तेव्हाच जपता येतं जेव्हा त्याची जाणीव होते. आदर्श आणि परफेक्ट होण्याच्या नादात स्वतमधील सकारात्मकता हरवून बसणं चुकीचंच. त्यात जर जोडीदार स्वतलाच महत्त्व देणारा असेल तर जास्तच कुतरओढ होते. आपण नाकर्ते आहोत हा स्वतबाबतचा समज वेळीच दूर करणं गरजेचं आहे.
शलाका आणि साहिलचं (दोघांची नावे बदलली आहेत) हे आठवडय़ामधलं तिसरं भांडण होतं आणि शलाका पुन्हा दुसऱयांदा समुपदेशनाला आली होती. ‘मी आता सहन नाही करू शकत मॅम साहिलला. तो दिवसेंदिवस अति बोलत चालला आहे. परवा तुम्ही सांगितलं होतं की, शक्यतो दुर्लक्ष कर आणि स्वतची कामं कर. पण आता हा माझ्या स्पेसमधेही मला अक्कल शिकवतो आहे. जसं की मला काहीच करता येत नाही. काल रात्रीही मी किचनमध्ये आवरत होते तेव्हा तो पाणी प्यायला आला. त्याने फ्रीज उघडला तेव्हा त्याला समोर त्याची पाण्याची बाटली दिसली नाही. मी ती भरून ओटय़ावर ठेवली होती. त्याला फ्रीजमधलं थंडगार पाणी प्यायची सवय आहे. त्यामुळे त्याची बॉटल लगेच फ्रीजमध्ये ठेवावी लागते. काल मी बॉटल्स भरत असताना मला लक्षात आलं नाही… आणि नेमका हा आला पाणी प्यायला. आणि…’ पुढे सांगताना तिला एकाएकी रडायलाच आलं.
‘तू अगदी युजलेस आहेस. तुझ्याकडून अपेक्षा ठेवणारा मूर्खच आणि तो मी नेहमी करतोय. घरात नुसती बसून तर असतेस. तुला फक्त काही कामं असतात. त्यात तू रोज रोज नवीन काहीतरी करून खायला घालते असंही नाही. आपली ती शेजारची बघ. नोकरी करून घरात कसं लक्ष असतं तिचं ते.’ शलाका बोलता बोलता रडत होतीच आणि ती रडताना अक्षरश केविलवाणीही दिसत होती.
‘हल्ली साहिल माझा राग राग करत असतो. त्याला इतर बायका सुपरवुमन वाटतात आणि मी गुड फॉर नथिंग. मी कितीतरी वेळा त्याच्यासमोर प्रूव्ह केलंय, पण त्याला मी केलेली कामं किंवा लग्नानंतर केलेले सॅक्रीफायझेस दिसत नाहीत.’ असं बोलताना शलाका तिच्या मनातील सल उघड करायला लागली.
शलाका आणि साहिलचा प्रेमविवाह होता. दोघंही एकाच कॉलेजात असल्यापासून एकमेकांना ओळखत होते. शलाका ही दिसायला जरी बोल्ड असली तरी स्वभावाने खूपच साधी होती आणि साहिल दिसायला आणि बोलायलाही रफ टफ. दोघेही शिक्षण पूर्ण झाल्यावर विवाहबंधनात अडकले. नंतर साहिल करिअर सांभाळण्याच्या नादात पुढे गेला तोच मुळी शलाकावर घरची जबाबदारी टाकत. मुळची भिडस्त असलेल्या शलाकानेही हे मान्य केलं आणि स्वतच्या करिअरला तिलांजली देऊन तिने सासर आणि तिचा संसार हे विश्व बनवून टाकलं.
एकीकडे शलाका घर सांभाळत होती आणि दुसरीकडे साहिल त्याच्या ऑफिसमधल्या तसंच आजूबाजूच्या बायकांशी नकळतपणे शलाकाशी तुलना करायला लागला. येताजाता तिचा अपमान करायला लागला. घरातील कामांवरून तिला धारेवर धरायला लागला. तिला कायम दूषणं द्यायला लागला. या सगळ्याचा परिणाम शलाकावर इतका गंभीर झाला की ती स्वतचा आत्मविश्वास गमावून बसली. छोटय़ामोठय़ा गोष्टी विसरायला लागली आणि महत्त्वाचं म्हणजे ‘मी खरोखरच नाकर्ती आहे का?’ हा प्रश्न ती सतत स्वतला विचारायला लागली. सुरुवातीला तिने साहिलालाही सगळं सरळपणे विचारलं तेव्हा त्याने तिचा अपमान केलाच; शिवाय खिल्लीही उडवली. त्या वेळी मात्र शलाका आतून तुटून गेली. सरतेशेवटी तिने समुपदेशनाचा मार्ग पत्करला.
ज्यावेळी शलाका पहिल्यांदा सत्राला आली तेव्हा तिची देहबोली सारं काही गमावलेल्या व्यक्तीसारखी होती. तिला फक्त स्वतचा आत्मविश्वास कमवायचा होता आणि त्यासाठी तिने स्वतमध्ये सत्रांद्वारे बदल आणायला सुरुवात केली. पण साहिल जरा काही बोलला की ही कोशात जायची. तिचा आवेश ओसरून जात असे.
‘तुला साहिलची भीती वाटते का?’ असा प्रश्न तिला शेवटी विचारला गेला आणि ती स्तब्ध झाली. ‘भीती वाटण्यापेक्षा त्याचा ताण जास्त येतो असं मी म्हणेन.’ तिने एक एक शब्दावर जोर देत म्हटलं. ‘कशाप्रकारचा ताण?’ असं विचारल्यावर ‘त्याच्या आक्रस्ताळेपणाचा.’ एवढं बोलून ती गप्प बसली. ‘त्याला जे काही सांगायचं असतं तो ते पोहोचवण्यासाठी भरपूर आरडाओरडा करत सुटतो आणि मग मलाच त्याचा सामना करावा लागतो. माझे पुढचे तीन एक दिवस डिस्टर्ब होतात. घरात लक्ष लागत नाही की कामंही होत नाहीत..’ शलाका एवढं बोलून थांबली.
तिच्या बोलण्यावरून एक लक्षात आलं की, ती प्रत्येक गोष्टीच्या व्हॅलिडेशनसाठी साहिलची मदत घेत होती आणि साहिलला तिचं हे ‘त्याच्यावर अवलंबून राहणं पसंत नव्हतं. कारण तोही तितका परिपक्व नव्हता आणि हे शलाकाला पटवून देणं महत्त्वाचं होतं. ‘एक सांग शलाका… तू जेव्हा त्याला कुठलीही मदत करायला सांगतेस तेव्हा तो तुला मदत करतो का?’ तेव्हा ती पटकन म्हणाली, ‘करतो ना! पण त्याला खूप गाइड करावं लागतं. नाहीतर तो चुका करून ठेवतो.’ मग? तूही ओरडते का त्याला? असं विचारल्यानंतर शलाका पटकन म्हणाली, ‘नाही. तो मग इतका सॉफ्ट होतो की त्याला ओरडायचं मनच नाही करत.’
‘हे त्याचं वागणं चुकीचं आहे ना?’ हे विचारल्यावर शलाका विचारात बुडाली. ‘हो. पण मी ओरडू शकणार नाही. तो माझा पिंड नाही..’ असं ती म्हणाली.
‘ठीक आहे. पण मग तुला होणाऱया त्रासाचं काय? सोसत राहणार आहेस का?’ हे विचारल्यावर ती गप्प झाली. तिच्याकडे पुढे बोलायला काहीही नव्हतं.
आजची ही केस. आजही अशा भिडस्त महिला आणि मुली आपापला संसार मूग गिळून, अपमान सहन करून करत आहेत. माझ्याकडे समुपदेशनाला येणाऱया प्रत्येक जोडप्याला मी एकच सांगत असते की, एकमेकांचा आदर कधीकधी करायचा नसतो तर तो वेळोवेळी करायलाच हवा आणि महत्त्वाचं म्हणजे नात्यात आलं की ‘अहं’ला तिलांजली देता आलीच पाहिजे. अन्यथा शलाकासारखी अवस्था होते.
दुसरी महत्त्वाची गोष्ट मला खासकरून नमूद कराविशी वाटते ती म्हणजे, मुलींनी केव्हाही आपलं स्वत्व हे जपलंच पाहिजे आणि ते तेव्हाच जपता येतं जेव्हा त्याची जाणीव होते. बऱयाच मुलींची यात गल्लत होते. आदर्श आणि परफेक्ट होण्याच्या नादात त्या स्वतच्या कमतरतेला विसरतात. त्याचा परिणाम म्हणजे स्वतच्या आणि इतरांच्याही स्वतबद्दल अपेक्षा वाढवून ठेवतात. नंतर हे जपणं कठीण झालं की ताणात जातात. त्यात जर जोडीदार स्वतलाच महत्त्व देणारा असेल तर या मुलींची जास्तच कुतरओढ होते जी शलाकाची होत होती.
आता यात मी शलाकाचं पुढे काय झालं हे सध्यातरी वाचकांच्या अनुमानावर सोडून देतेय, कारण या केसला बरेच कंगोरे आहेत आणि त्याचे उपायही वेगवेगळे आहेत. जे मला वाटतं आपल्यातल्या ‘शलाका’ने जर बोध घेऊन या परिस्थितीवर विचार केला तर नक्कीच ‘आय एम गुड फॉर एव्हरिथिंग’ हे उत्तर तिला नक्कीच सापडेल.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)