मंगेश कुलकर्णी - ‘ॲम्फी’ नोंदणीकृत म्युच्युअल फंड सल्लागार
‘म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे’, हा धोक्याचा इशारा आपण म्युच्युअल फंडाच्या प्रत्येक जाहिरातीत पाहतो. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात जोखीम आहे, म्हणूनच त्यामध्ये परतावा जास्त मिळतो हे जवळपास प्रत्येक गुंतवणूकदाराला माहित आहे. तरीही बाजार घसरतो, तेव्हा ते ‘एसआयपी’ बंद करतात आणि नुकसान करून घेतात. फेब्रुवारी महिन्यातील म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीची आकडेवारी पाहिल्यानंतर हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सध्या शेअर बाजार घसरत असल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत, अशावेळी जोखीम म्हणजे नक्की काय? हे समजून घेऊन काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.
तीन प्रकारच्या जोखमी मोठी पडझडशेअर बाजारात साधारण १० वर्षांतून एकदा मोठी पडझड होते, असे ऐतिहासिक आकडेवारीतून लक्षात येते. १९९२, २००१, २००८ आणि २०२० मध्ये शेअर बाजारात ३९ टक्के ते ६५ टक्के पडझड झाली. या पडझडीमध्ये सर्वच इक्विटी म्युच्युअल फंडाच्या ‘एनएव्ही’ कमी झाल्या. मात्र, बाजारात पुन्हा तेजी आली आणि पुढील १० वर्षांत गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा मिळाला. इतिहासात जे झाले, तेच भविष्यात घडणार आहे. त्यामुळे घाबरून न जाता गुंतवणूक सुरू ठेवली पाहिजे. उलट या काळात शक्य असेल, तर आणखी एकरकमी गुंतवणूक करावी; तसेच ‘एसआयपी’ची रक्कम वाढवण्याचा प्रयत्न करावा.
करेक्शनदेश-परदेशातील अर्थव्यवस्थेवर आपला शेअर बाजार अवलंबून असतो. अर्थव्यवस्थेत होणारे चढ-उतार, युद्ध, कंपन्यांचा नफा, निवडणुका यांसारख्या असंख्य कारणांमुळे शेअर बाजार कधीही १० ते ३० टक्के खाली येतो. दोन वर्षातून एकदा शेअर बाजारात या प्रकारचे करेक्शन होऊ शकते. २०११, २०१३, २०१६, २०१८, २०२२, २०२३ आणि २०२५ मध्ये असे करेक्शन दिसून आले. सध्या युरोपमध्ये मंदी, नोटबंदी, रशिया-युक्रेन युद्ध, इस्राईल-हमास युद्ध, ट्रम्प यांचा आयातशुल्क निर्णय अशी विविध कारणांमुळे करेक्शन होत आहे.
अशा वेळी घाबरण्यापेक्षा फंड मॅनेजर काय सांगतात, ते फंडमध्ये कोणते बदल करत आहेत, नवी गुंतवणूक करण्यासाठी कुठे संधी उपलब्ध आहे, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तर गुंतवणूकदारांना या स्थितीचा उत्तम फायदा करून घेता येईल. असे करेक्शन भविष्यातदेखील होतील; पण घाबरून न जाता गुंतवणूक चालू ठेवणेच श्रेयस्कर ठरेल.
मुदतठेवींपेक्षा कमी परतावाजेव्हा शेअर बाजार महाग असतो, एखादे लहान करेक्शन किंवा मोठी पडझड झालेली असते, त्यानंतर बाजार पुढचे तीन ते पाच वर्षे मर्यादित पातळीमध्ये चढ-उतार करतो. या काळात, काही काळासाठी बाजार वर जातो आणि पुन्हा खाली येतो. त्यामुळे, या काळात इक्विटी फंडावर मुदत ठेवींपेक्षाही कमी परतावा मिळतो. २००० ते २००४, २०१० ते २०१४, २०२१ ते २०२३ या कालावधीमध्ये हे दिसून आले आहे.
अशा वेळीदेखील गुंतवणूकदार पैसे काढून घेतात आणि नुकसान करून घेतात. कारण ‘एसआयपी’साठी हा सुवर्णकाळ असतो. काही काळानंतर कंपन्यांचे उत्पन्न वाढते आणि बाजार स्वस्त होतो. यामुळे, नव्या तेजीची सुरुवात होते आणि चांगला परतावा मिळतो. भविष्यातदेखील असा तीन ते पाच वर्षांचा काळ येईल परंतु, त्यानंतरच्या तेजीमध्ये चांगला परतावादेखील मिळेल. त्यामुळे अशा चढ-उतारांमध्ये डगमगून न जाता गुंतवणूक करत राहणेच योग्य असते.