इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत पाचवेळच्या चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. त्यांना काही धक्के बसले आहेत. चेन्नईला पहिल्यांदाच सलग ५ पराभवाचांना सामोरे जावे लागले आहे.
पण असेल असले तरी सोमवारी (१४ एप्रिल) होत असलेल्या लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात मात्र चेन्नईला चांगली सुरुवात मिळाली आह. या सामन्यात चेन्नईला पहिले यश मिळवून देण्यात राहुल त्रिपाठीच्या अफलातून क्षेत्ररक्षणाचा मोठा वाटा राहिला.
या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.
त्यांनी निकोलस पूरन आणि मिचेल मार्श या तुफान फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजांची बॅट या सामन्यात तळपू दिली नाही, पण चेन्नईला लय मिळाली ती राहुल त्रिपाठीच्या झेलनंतर. झाले असे की लखनौकडून ऐडेन मार्करम आणि मिचेल मार्श यांनी डावाची सुरुवात केली होती.
पण पहिल्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर खलील अहमदविरुद्ध कव्हर-पाँइंटच्यावरून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी त्रिपाठी मागे पळत आला, त्याने मागे पळत येतानाही चेंडूवरील नजर कायम ठेवत दोन्ही हातांना मस्त झेल पकडला. त्याचा झेल पाहून समालोचकांनीही आश्चर्य व्यक्त केले.
तसेच त्याच्या झेलाचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. खरंतर गेल्या काही सामन्यात चेन्नईकडून ढिसाळ क्षेत्ररक्षण दिसले आहे. मात्र, लखनौविरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या खेळाडूंकडून क्षेत्ररक्षणात सुधारणा पाहायला मिळाली.
दरम्यान, मार्करम ६ धावांवर बाद झाल्यानंतर निकोलस पूरनलाही ८ धावांवर अंशुल कंबोजने चौथ्या षटकात पायचीत पकडले. यावेळी आधी पंचांनी नाबाद दिले होते. यावेळी धोनीही डीआरएस रिव्ह्युसाठी फार उत्सुक नव्हता, पण कंबोजचा उत्साह पाहून त्याने रिव्ह्यु घेतला. पण निर्णय योग्य ठरला.
कारण डीआरएसमध्ये पूरन बाद असल्याचे दिसले. मिचेल मार्शला ३० धावांवर रवींद्र जडेजाने त्रिफळाचीत केले, तर आयुष बडोनीलाही २२ धावांवर जडेजाच्याच गोलंदाजीवर एमएस धोनीने यष्टीचीत केले.
चेन्नई आणि लखनौ यांचा प्रत्येकी ७ वा सामना आहे. चेन्नईने पहिला सामना जिंकल्यानंतर सलग ५ सामने पराभूत झाले आहेत. तसेच लखनौने ६ पैकी ४ सामने जिंकले आहेत, त्यांनी सलग तीन विजय मिळवलेत. त्यामुळे या सामन्यात चेन्नई विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल, तर लखनौ विजयी लय कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल.