अद्वैत कुर्लेकर - मुख्य कार्यकारी अधिकारी, अपोहन मॅनेजमेंट कन्सल्टंट्स
डिजिटल युगात शिक्षणाचा स्वरूप मोठ्या प्रमाणावर बदलले आहे. पारंपरिक शिक्षण पद्धतींच्या जोडीला आता ऑनलाइन प्रमाणपत्रे आणि कोर्सेस हे करिअर वाढीसाठी प्रभावी साधन ठरले आहे. व्यावसायिक आणि विद्यार्थी यांना तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळत आहे. मागील एका लेखात आपण इंटर्नशिपविषयी चर्चा केली होती, तसेच ऑनलाइन प्रमाणपत्रे आणि कोर्सेस तितकेच महत्त्वाची आहेत.
कौशल्य विकासासाठी महत्त्वाचेऑनलाइन कोर्सेसमुळे तांत्रिक कौशल्ये आणि सॉफ्ट स्किल्स सुधारण्याची संधी मिळते. वेब डेव्हलपमेंट, डेटा अॅनालिटिक्स, डिजिटल मार्केटिंग आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट यांसारख्या विविध क्षेत्रांत विद्यार्थी ऑनलाइन कोर्सेसद्वारे कौशल्य आत्मसात करू शकतात. ऑनलाइन कोर्सेसचे पर्याय प्रचंड आहेत. त्यामुळे ते निवडताना आपल्याला जे शिकायचे आहे, ज्याची आवड आहे त्याच्याशी संलग्न आहे ना याचा विचार करावा.
लवचिक आणि सोयीस्कर शिक्षण पद्धतीऑनलाइन कोर्सेस लवचिक असल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना वेळेचा आणि ठिकाणाचा अडथळा येत नाही. कामासोबत शिक्षण सुरू ठेवणाऱ्या व्यावसायिकांसाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. बरेच अभ्यासक्रम हे ॲन्सिक्रोनोअस (asynchronous) स्वरूपाचे असतात, म्हणजेच ते तुमच्या सोयीच्या वेळेला तुम्ही बघू शकता.
प्रमाणपत्रांचे महत्त्वअनेक ऑनलाइन कोर्सेस प्रमाणपत्रांसह येतात, जे करिअरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. Coursera, edX, Udemy, आणि LinkedIn Learning यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त प्रमाणपत्रे मिळतात. ही प्रमाणपत्रे सीव्हीत प्रभावीपणे समाविष्ट करता येतात. त्यामुळे नोकरीच्या संधी वाढतात. किती कोर्सेस करायचे आणि त्याची किती प्रमाणपत्रे सीव्हीमध्ये लावायची याचेही भान ठेवा. महत्त्वाचे म्हणजे इंटर्नशिपबद्दल मी लिहिले होते तेच इथेही महत्त्वाचं आहे की, या कोर्सेसबद्दल मुलाखतीत विचारलं तर नीट उत्तरं देता यायला हवीत.
अपस्कि लिंग आणि रिस्किलिंगचे साधनद्रुतगतीने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात अपस्किलिंग (सध्याच्या कौशल्यांचे सुधारणा) आणि रिस्किलिंग (नवीन कौशल्य आत्मसात करणे) हे करिअर टिकवण्यासाठी आवश्यक आहे. ऑनलाइन कोर्सेस या प्रक्रियेस गती देतात. जे तुमच्या अभ्यासक्रमात नाही परंतु आजच्या काळात महत्त्वाचे आहे ते शिकायची संधी मिळते.
आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून शिकण्याची संधीऑनलाइन कोर्सेसद्वारे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ, प्राध्यापक, आणि व्यावसायिकांकडून शिकण्याची संधी मिळते. यामुळे जागतिक दृष्टिकोन विकसित होतो.
करिअर बदलण्यासाठीजे विद्यार्थी किंवा व्यावसायिक त्यांच्या क्षेत्रात बदल करू इच्छितात, त्यांच्यासाठी ऑनलाइन कोर्सेस महत्त्वाचे ठरतात. उदाहरणार्थ, पारंपरिक क्षेत्रातील एखादा व्यावसायिक तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी डेटा सायन्स किंवा सायबरसिक्युरिटी कोर्स करू शकतो.
निष्कर्षऑनलाइन कोर्सेस आणि प्रमाणपत्रे केवळ शैक्षणिक ज्ञान देत नाहीत, तर करिअरमध्ये प्रगती साधण्यासाठी महत्त्वाचे साधन बनली आहेत. विद्यार्थी आणि व्यावसायिकांनी या संधींचा उपयोग करून आपल्या कौशल्यांमध्ये सातत्याने सुधारणा करावी. तुमच्या भविष्यातील यशासाठी ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग स्वीकारा आणि आपल्या करिअरला नवी दिशा द्या!