‘त्यांना’ चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना? अमोल मिटकरींच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण, म्हणाले
Marathi April 16, 2025 06:25 PM

सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावरती भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली. सांगली शहरातील माळी गल्ली या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. जखमी झालेल्या भिडे गुरूजींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर महापालिकेकडून तात्काळ ज्या भागांमध्ये भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केला त्या भागामध्ये भटकी कुत्री पकडण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली. या घटनेमुळे सांगली-मिरज-कुपवाड या तीन शहरातील भटक्या कुत्र्यांचा विषय पुन्हा चव्हाट्यावर आला. मात्र या घटनेनंतर आमदार अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडे गुरुजी यांचं नावं न घेता त्यांच्यावर खोचकपणे टीका केली आहे.

सोशल मिडियावरती पोस्ट करत नाव न घेता त्यांना चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना? असा प्रश्न मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. तर कुत्रा चावल्याचा खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे, असं देखील अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. कुत्रा चावतो म्हणजे काय? मोघलाई लागली आहे का? असा मिश्कीलपणे प्रश्न उपस्थित करत अमोल मिटकरी यांनी टोला लगावला आहे. संभाजी भिडे यांना सोमवारी सांगलीत कुत्रा चावला होता. त्यानंतर त्यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. त्यातच आता अजित पवार यांच्या गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील एक ट्विट करत भिडे यांच नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांना चावलेला कुत्रा ‘वाघ्या’ तर नव्हता ना? जो कोणी असेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. खटला फास्टट्रॅकवर चालला पाहिजे. चावतो म्हणजे काय? मोघलाई लागली आहे का?’ असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.

भटकी कुत्री पकडण्याचे मिशन सुरू

संभाजी भिडे यांना कुत्रा चावल्यानंतर महापालिकेडून ज्या भागात ही घटना घडली त्या भागात डॉग व्हॅनच्या मदतीने तात्काळ ऑपरेशन राबत त्या भागातील भटकी कुत्री ताब्यात घेतली गेली. शिवाय ज्या ज्या भागात भटक्या कुत्र्याचा त्रास आहे तेथील भटकी कुत्री तात्काळ पकडण्यात येतात असा दावा मनपा अधिकाऱ्यांकडून केला जातोय. मात्र या घटनेनंतर महापालिकेने भटकी कुत्री पकडण्याची मोहीम राबवली तसे सर्वसामान्य नागरिकांच्यावर देखील आणि शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर ज्यावेळी भटके कुत्रे हल्ले करतात त्यावेळीही कारवाई करावी. या घटना सतत सांगलीत घडत असतात. त्यामुळे भटके कुत्र्यांचा विषय मुळापासून संपवण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत.

आठ वर्षांपूर्वी भटक्या कुत्र्यांचे सर्व्हेक्षण

सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या हद्दीत सन 2016 मध्ये मोकाट कुत्र्यांचा प्रश्न प्रकर्षाने जाणवला. त्यावेळी कुत्र्यांच्या हल्ल्यात एका बालिकेचा मृत्यू झाला होता. याची दखल घेत मनुष्य आणि कुत्रा संघर्ष टाळण्यासाठी नगरविकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक राज्यस्तरीय देखरेख समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर मोकाट कुत्र्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी 14 हजार मोकाट कुत्री आढळून आली होती. त्यामुळे आता तरी नागरिकांनी भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मुळापासून सोडवावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायात.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.