नवी दिल्ली : दहा वर्षे जुन्या ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ‘काँग्रेस ओव्हरसीज’चे प्रमुख सॅम पित्रोदा तसेच सुमन दुबे यांच्याविरुद्ध राउज अव्हेन्यू न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
या कारवाईवर काँग्रेसकडून सडकून टीका करण्यात आली. ‘‘ सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासह इतर लोकांविरुद्ध आरोपपत्र दाखल करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या पूर्णपणे बेकाबू झालेल्या सूडभावनेच्या आणि भयभीत करण्याच्या राजकारणाचे उदाहरण आहे. नॅशनल हेराल्डची संपत्ती जप्त करणे हा कायद्याच्या नावाखाली केलेला केंद्र सरकार पुरस्कृत गुन्हा आहे. काँग्रेस पक्ष आणि त्याचे नेतृत्व गप्प बसणार नाही,’’ अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रसिद्धी विभागाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी व्यक्त केली. ‘ईडी’ने सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अन्य आरोपींविरुद्ध मनी लाँडरिंग कायद्यातील कलम- ४४ आणि ४५ अन्वये तक्रार दाखल केली असून आरोपींनी ‘कलम-३’ चे उल्लंघन करीत मनी लाँडरिंगचा गुन्हा केल्याचा दावा केला आहे.
याप्रकरणी ‘ईडी’ने सुमारे ७५२ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. येत्या २५ एप्रिल रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. या प्रकरणी केलेली तक्रार आणि संबंधित दस्तावेजांच्या सुस्पष्ट प्रती पुढील सुनावणी आधी न्यायालयात सादर करण्याचे निर्देश ‘ईडी’ला देण्यात आले आहेत. २५ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीच्या वेळी सरकारी वकील आणि चौकशी अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. ‘यंग इंडियन लिमिटेड’, ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ आणि ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्रादरम्यान झालेल्या व्यवहारात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या निधीची दुरुपयोग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वैयक्तिक लाभासाठी वापरकाँग्रेसच्या नेत्यांनी ‘असोसिएटेड जर्नल्स’ची संपत्ती आपल्या खासगी नियंत्रणाखालील ‘यंग इंडियन’मध्ये हस्तांतरित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘यंग इंडियन’मध्ये सोनिया आणि राहुल गांधी यांचा ७६ टक्के वाटा असून त्यांनी पक्षाच्या निधीचा वैयक्तिक लाभासाठी वापर केल्याचा आरोप ‘ईडी’ने केला आहे. ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ची दोन हजार कोटींची संपत्ती ‘यंग इंडियन’च्या माध्यमातून केवळ ५० लाख रुपयांमध्ये नियंत्रणाखाली आणल्याची तक्रार भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१४ मध्ये केली होती.
या व्यवहारात सरकारी नियमांचे उल्लंघन करण्यात आले असून ९० कोटींपेक्षा अधिक रकमेची मनी लाँडरिंग झाल्याचा दावा ‘ईडी’ने केला आहे. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राचे प्रकाशन २००८ मध्ये बंद झाले होते. या वर्तमानपत्राची दिल्ली, मुंबई, लखनौ आणि अन्य शहरांमध्ये संपत्ती आहे.