Monsoon 2025 : यंदा दणकून 'कोसळ'धार, हवामान विभागाची शुभवार्ता; अवघा महाराष्ट्र चिंब होणार
esakal April 16, 2025 12:45 PM

पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात यंदा चांगल्या पावसाचे संकेत आहेत. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीपेक्षा अधिक (१०५ टक्के) पावसाचे पूर्वानुमान भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केले. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक तफावतीची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मंगळवारी (ता. १५) मॉन्सून हंगामातील पावसाचा पहिल्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. १९७१ ते २०२० कालावधीत देशाची मॉन्सून पावसाची सरासरी ८७ सेंटिमीटर म्हणजेच ८७० मिलिमीटर आहे. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो.

मॉन्सून हंगामातील पहिल्या टप्प्याचा अंदाज वर्तविताना प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान, भारतीय महासागरातील द्वि-धृविता (इंडियन ओशन डायपोल - आयओडी) आणि उत्तर गोलार्धातील हिमाच्छादन हे घटक विचारात घेतले आहेत. यंदाच्या मॉन्सूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (३३ टक्के), सरासरीइतक्या पावसाची शक्यता ३० टक्के आहे. तर दुष्काळाची शक्यता अवघी २ टक्के असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे. तर भारताचा अति उत्तरेकडील भाग, पूर्वोत्तर राज्ये आणि तसेच तमिळनाडू राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी ते सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे. मे अखेरीस हवामानाचा विभागनिहाय सुधारित अंदाज जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी हवामान विभागाने देशात १०६ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात देशात सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक, तर महाराष्ट्रात २६ टक्के अधिक पाऊस पडला होता.

महाराष्ट्रात यंदा चांगल्या पावसाचे संकेत

यंदाच्या मॉन्सून हंगामात महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे संकेत आहेत. मॉन्सून पावसाच्या वितरणाबाबत जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच दमदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मे अखेरीस सुधारित अंदाजात मॉन्सूनचे महाराष्ट्रातील वितरण आणखी स्पष्ट होऊ शकेल.

अंदाज चार वेळा खरा ठरला

गेल्या पाच वर्षांमध्ये भारतीय हवामान खात्याने मॉन्सूनविषयी एप्रिल महिन्यात वर्तविलेला अंदाज चारवेळा खरा ठरला आहे. गेल्यावर्षी हवामान खात्याने १०६ टक्के पर्जन्यमानाचे भाकीत वर्तविले होते आणि प्रत्यक्षात १०८ टक्के पाऊस पडला होता. केंद्र सरकारच्या वसुंधरा विज्ञान मंत्रालयाने २०२२ मध्ये निश्चित केलेल्या दीर्घकालीन सरासरीनुसार ८७० मिमी पर्जन्यवृष्टी सामान्य मानली जाते. हवामान खात्याकडून मे महिन्यात मॉन्सूनविषयीची माहिती अद्ययावत करण्यात येईल.

‘एल निनो’ तटस्थ राहणार

विषुववृत्तीय प्रशांत महसागराचे तापमान सरासरीवर असून, सध्या तटस्थ स्थिती म्हणजेच ‘ला-निना’ नाही, आणि ‘एल-निनो’ नाही अशी स्थिती आहे. उत्तर गोलार्धातील युरेशियामध्ये डिसेंबर ते मार्च दरम्यानच्या कालावधीत यंदा सरासरीपेक्षा कमी हिमाच्छादन होते. बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (इंडियन ओशन डायपोल - आयओडी) सध्या तटस्थ (न्यूट्रल) स्थितीत आहे. मॉन्सून हंगामात आयओडी ही स्थिती टिकून राहण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरातील ‘ला-निना’ आणि तटस्थ स्थिती, युरेशियातील कमी हिमाच्छादन, हिंद महासागरातील धन आणि तटस्थ ‘आयओडी’ हे घटक मॉन्सूनच्या चांगल्या पावसासाठी अनुकूल मानले जातात.

विजेची मागणी वाढणार

देशाच्या अनेक भागांमध्ये भीषण उन्हाळ्याची स्थिती असून एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाच्या तडाख्याचे दिवस सर्वाधिक असतील. पारा वाढल्यामुळे विजेच्या पुरवठ्यावर दबाव येईल आणि पाण्याचा तुटवडा जाणवणार असल्याचा इशारा महापात्रा यांनी दिला. मॉन्सूनच्या मोसमात पर्जन्यवृष्टीचे दिवस कमी होत चालले असून मुसळधार पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे दुष्काळ आणि पुराची स्थिती निर्माण होत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.

मॉन्सूनची शक्यता

पावसाचे प्रमाण शक्यता

  • ९० टक्क्यांहून कम - २ टक्के

  • ९० ते ९५ टक्के - ९ टक्के

  • ९६ ते १०४ टक्के - ३० टक्के

  • १०४ ते ११० टक्के - ३३ टक्के

  • ११० टक्क्यांहून अधिक - २६ टक्के

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.