Gas Cylinder Price : घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला,इंधन उत्पादनशुल्कात वाढ
esakal April 08, 2025 11:45 AM

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ताज्या दरवाढीनंतर दिल्लीत साधारण गॅस सिलिंडरचे दर ८०३ रुपयांवरुन ८५३ रुपयांवर गेले आहेत. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कातही प्रत्येकी दोन रुपयांची वाढ करण्यात आली असली तरी त्याचा थेट फटका ग्राहकांना बसणार नसल्याचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केले आहे. 

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर लक्षणीय प्रमाणात कमी झाले आहेत, या पार्श्वभूमीवर आगामी काळात पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले जाण्याचे संकेत सरकारकडून देण्यात आले आहेत. तेल कंपन्यांकडून यावेळी उज्ज्वला योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सिलिंडरच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सिलिंडरचे दर ५०३ रुपयांवरून ५५३ रुपयांवर गेले आहेत. बदललेले दर तात्काळ प्रभावाने लागू होतील.

मुंबईत सिलिंडरचे दर ८०२.५० रुपयांवरुन ८५३.५० रुपयांवर, कोलकाता येथे ८२९ रुपयांवरुन ८७९ रुपयांवर तर चेन्नई येथे ८१८.५० रुपयांवरुन ८६८.५० रुपयांवर गेले आहेत.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर १५ टक्क्यांनी कमी झाले आहेत. ब्रेंट क्रूडचे प्रति बॅरलचे दर ६३ डॉलरच्या आसपास आहेत. सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात लिटरमागे प्रत्येकी दोन रुपयांची वाढ केली आहे. पेट्रोलवर आता १३ रुपयांचे तर डिझेलवर १० रुपयांचे उत्पादन शुल्क आकारले जाईल. वाढीव शुल्काचा फटका ग्राहकांना बसणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. तेल कंपन्यांकडून गत १५ मार्चपासून पेट्रोल—डिझेलच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते.

वाढ स्थायी स्वरुपाची नाही

घरगुती गॅस सिलेंडर दरात झालेली वाढ स्थायी स्वरुपाची नाही. या दराचा दर दोन ते तीन आठवड्यांनी आढावा घेतला जाईल. गॅस सिलेंडरवर दिल्या जाणाऱ्या अनुदानामुळे मागील काही काळात तेल कंपन्यांचे ४३ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई करण्याच्या दृष्टीने उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आल्याची माहिती पुरी यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.