राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली. मात्र, ती योजना अडचणीत आली. ग्रामीण भागातील भाषेत सांगायचं तर अनेकांनी आम्हाला चुनाच लावला, असे खळबळजनक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. दरम्यान, महायुती सरकारने शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक केली असून, ही योजना गुंडाळण्याचे अप्रत्यक्ष सूतोवाच अजित पवार यांनी केले आहे.
कृषी विभागाच्या वतीने ‘दिशा कृषी उन्नती’च्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी अजित पवार बोलत होते.काही योजनांमध्ये बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे सांगताना अजित पवार म्हणाले, यासदंर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह एक बैठक घेतली आहे. त्यामध्ये काही नवीन कल्पना अंमलात आणून एक चांगला कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी देणार आहोत. आम्ही आता तुमच्या भल्याचं असेल ते करणार आहोत.
याकरिता जुन्या योजनेत काही बदल करण्यात येतील. हे बदल करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जाईल. मंत्रिमंडळ बैठकीत त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ. आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याची योजना सुरू केली. मात्र त्या योजनेत अनेकांनी आम्हाला चुनाच लावला. याचा सर्व तपशील काढला आहे.
कर्जमाफी नाहीच आणि एक रुपयात पीकविमाही नाही
विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन महायुतीने दिले होते. मात्र, गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. उलट बँकांकडून घेतलेले कर्ज मार्चअखेरपर्यंत परतफेड करा; अन्यथा व्याज सवलतही मिळणार नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. आता तर एक रुपयात पीकविमा योजनाही बंद होणार याचे सूतोवाच त्यांनी केले आहे. महायुती सरकारने केलेली ही फसवणूक असल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
मिंधे गटाच्या मेळाव्यात शेतकरी संतप्त; काळे झेंडे दाखवले
कर्जमाफी न करणाख्या महायुती सरकारविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असल्याचे आज पुन्हा दिसले. मिंधे गटाचा शेतकरी मेळावा माढा येथे आयोजित केला होता. यावेळी पर्यटनमंत्री शंभुराज देसाई व उदय सामंत आले होते. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दांडी मारली. देसाई भाषणाला उभे राहताच शेतकऱ्याने कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. काळे झेंडे दाखवत महायुती सरकारचा निषेध केला. यामुळे मेळाव्यात खळबळ उडाली.
योजनेत बीडसह अनेक ठिकाणी मोठा गैरव्यवहार
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन महायुती सरकारने 2023 मध्ये मोठा गाजावाजा करून एक रुपयात पीकविमा योजना आणली. त्यासाठी जाहिरातबाजी करण्यात आली. मात्र, योजनेत बीड जिह्यासह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.