India Politics : जातीनिहाय जनगणना करा : राहुल गांधी
esakal April 10, 2025 11:45 AM

अहमदाबाद : ‘‘संसदेत संमत झालेला वक्फ दुरुस्ती कायदा राज्यघटनाविरोधी आणि धार्मिक स्वातंत्र्यावर आघात करणारा आहे,’’ अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अहमदाबाद येथील कार्यकारिणी बैठकीत नव्या वक्फ कायद्याविरोधातील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. तसेच, जातीनिहाय जनगणनेची आक्रमक मागणी करताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींची व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जोरदार खिल्ली उडविली. अमेरिकेच्या शुल्क आकारणीमुळे गंभीर आर्थिक संकट येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

राहुल गांधींनी पक्षाच्या व्यासपीठावरून भाजप आणि संघावर आक्रमक शब्दांत तोफ डागली. राहुल गांधींनी संघाच्या ‘ऑर्गनायझर’ या नियतकालिकामधील लेखाचा हवाला देत, ख्रिश्चनांना लक्ष्य केले जाऊ शकते, हा वक्फ कायदा देशातील प्रत्येक नागरिकासाठी धोक्याचा इशारा आहे, असा दावा केला. ‘‘काँग्रेसने तेलंगणामध्ये जातगणना केली. देशात कोणाची किती भागीदारी हे कळायला हवे आणि यासाठी जातगणना आवश्यक आहे. मात्र नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जात गणना करणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. काँग्रेस पक्ष त्यांना लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जातगणना करण्यास भाग पाडेल,’’ असा इशारा राहुल गांधींनी दिला. पंतप्रधान मोदी अनुसूचित जाती-जमाती, ओबीसींबद्दल बोलतात पण त्यांना सत्तेत व प्रशासनात भागीदारी मात्र देत नाहीत, असा आरोप राहुल गांधींनी केला. ‘५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येणार नाही, ही कायद्याची भिंत मोडून काढणार,’ असेही राहुल म्हणाले.

‘आता गळाभेट का नाही?’

राहुल गांधी म्हणाले,‘‘देशातील सर्व संस्थांवर संघ व भाजपचे आक्रमण सुरू आहे. आधी सर्व जाती-जमातींचे लोक सैन्यामध्ये जात होते, अग्नीवीर योजना आणून सरकारने हा प्रकार बंद केला. सरकारी कंपन्या देशात रोजगार देत होत्या, या कंपन्या बंद करून अदानी-अंबानींना दिल्या जात आहेत. संरक्षण उद्योग, सिमेंट उद्योग, खाणी अदानी-अंबानींना दिल्या जात आहेत. देशातील ९० टक्के लोकांकडून सर्व संधी, पैसा हिरावला जात आहे. अमेरिका लादत असलेल्या शुल्कामुळे गंभीर आर्थिक संकट येणार आहे. पूर्वी मोदी अमेरिकेत जात होते, तेव्हा अध्यक्ष ट्रम्प यांच्या गळ्यात गळा घालत होते. नुकत्याच झालेल्या दौऱ्यात असे केले नाही. ट्रम्प यांनी नव्याने शुल्क लागू केले, पण मोदींच्या तोंडून एकही शब्द निघाला नाही. जनतेचे लक्ष तिकडे जाऊ नये म्हणून संसदेत नाटक केले.’’

निवडणूक आयोगावर प्रहार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयाची खिल्ली उडवताना राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर प्रहार केला. ते म्हणाले की महाराष्ट्रातील मतदार यादीबद्दल निवडणूक आयोगाला विचारून थकलो. अद्याप आयोगाने मतदारयादी दिलेली नाही.

ती क्षमता फक्त काँग्रेसमध्येच..

काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीत फरक आहे, असे राहुल यांनी सांगितले. ‘‘देशाची संपूर्ण संपत्ती दोन-तीन लोकांच्या हाती असावी, देशातील सर्व कुलगुरू संघाचे असावेत, देशात एखादीच विशिष्ट भाषा शिकवली जाईल, असे राज्यघटनेत कोठेही म्हटलेले नाही. देशाची राज्यघटना हीच काँग्रेसची विचारसरणी आहे. त्यावरच आक्रमण होत आहे. संघाला फक्त काँग्रेस पक्षच रोखू शकतो. अन्य राजकीय पक्षांमध्ये ती ताकद नाही कारण काँग्रेसकडे विचारसरणी आहे,’’ असा दावा राहुल यांनी केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.