माझा स्वभाव…मी परखड…अजितदादांनी तंबी दिली तरी कोकाटे ठाम; म्हणाले, माझा हेतू…
GH News April 10, 2025 10:15 PM

राज्याचे कृषीमंत्री माणिक कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शेतकरी आणि कर्जमाफीबद्दल केलेल्या विधानामुळे चांगलाच वाद निर्माण झाला. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शेवटी कोकाटे यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोकाटे यांना तंबी दिल्याचंही म्हटलं जातंय. असे असतानाच आता कोकाटे यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानांबाबत भाष्य केलंय. माजा असा स्वभाव जन्मजात आहे. माझा हेतू स्वच्छ आहे, असे कोकाटे म्हणाले आहेत. ते पुण्यात पत्रकार पत्रकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.

माणिकराव कोकाटे नेमकं काय म्हणाले?

“माझा स्वभाव जन्मजात आहे, तो एका दिवसात बदलणार नाही. पण माझा हेतू स्वच्छ आहे. कोणत्याही विधानाच्या आडून काही साध्य करायचा माझा उद्देश नाही,” असे कोकाटे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच “मी परखड सत्य बोलतो. माझा स्वभाव कडक असला तरी माझा हेतू शेतकऱ्यांचे भले करण्याचा आहे. नवी पिढी शेती व्यवसायात यावी, कमी खर्चात जास्त उत्पादन काढावे, यासाठी मी काम करत आहे,” असेही कोकाटे यांनी सांगितले.

अजितदादांनी कोकाटे यांना फटकारलं

मागील काही दिवसांपासून कोकाटे यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या वक्तव्यांमुळे वादंग निर्माण झाले होते. कर्जमाफीच्या पैशांचा वापर शेतकऱ्यांनी लग्नकार्यासाठी केल्याचा दावा त्यांना केला होता. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर सडकून टीका झाली होती. या प्रकरणी अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत कोकाटे यांना फटकारल्याचं म्हटलं जातंय. “तिसऱ्यांदा चूक झाली तर मंत्रिपद धोक्यात येईल,” असा कठोर इशाराही अजितदादांनी दिल्याचं सांगितलं जातंय.

कोकाटे यांचं नवं विधान, पुन्हा वादात सापडणार?

कांद्याचे भाव पडल्यामुळे एकीकडे शेतकरी हवालदिल आहेत. असे असतानाच कोकाटे यांनी कांद्याचे बाजारभाव का पडतात, याबाबत भाष्य केलं आहे. “ एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून बाकी सगळे कांदा लावत सुटतात. कांद्याची लागवड किती करावी यालाही मर्यादा आहेय दुप्पट, तिप्पट ठीक पण पन्नास पटीने कांद्याची लागवड करायला लागले तर कांद्याचे बाजारभाव पडणारच, असं कोकाटे म्हणाले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.