ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. माजिवाडा पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. उड्डाणपुल दुरुस्तीच्या कामामुळे ठाण्यात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. माजिवाडा पूल बंद राहणार असल्यामुळे अनेक मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर वाहतूक पोलिसांनी काही पर्यायी मार्ग देखील सांगितले आहेत.
माजिवडा उड्डाणपुलावर घोडबंदर - वाहीनीवरील युटर्नपासून ते ज्युपीटर वाय जंक्शनपर्यंत मास्टीक टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामाची सुरूवात ३ मे २०२५ पासून झाली. तर हे काम २२ मे २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. हे काम रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत केले जाणार आहे. त्यासाठी वाहतूक विभागाने आता या मार्गावरील वाहतुकीत बदल केले आहेत.
पावसाळ्यापूर्वी माजिवडा उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यात या पुलावर खड्डे पडून वाहतुकीला अडथळा होऊ नये या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी येथील उड्डाणपुलावरील पृष्ठभागावरील मास्टीक हे मिलिंग मशीनद्वारे टप्याटप्याने खरडून काढण्यात येणार आहे. मास्टीक काढल्यानंतर मनुष्यबळाच्या सहाय्याने त्यावर टप्याटप्याने रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत मास्टीक करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. परंतु या कामामुळे कापुरबावडी सर्कल आणि माजिवडा उड्डाणपुलाखाली वाढणार आहे. याठिकाणी सध्या मेट्रोचे काम सुरु असल्याने वाहतुकीचा वेग आधीच मंदावला आहे. अशात आता माजिवाडा उड्डाणपुलावरील वाहतूक देखील खालून जाणार असल्याने वाहतुकीचा भार आणखी वाढणार आहे. त्यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी होणार आहे.
पर्यायी मार्ग कोणते?माजिवाडा पुलाचे काम सुरू असताना वाहतूक बंद असणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग देखील सांगितले आहेत. घोडबंदर - मुंबई वाहिनी तत्वज्ञान ब्रिज चढणी येथून पुलावरुन मुंबई अथवा नाशिकला जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना तत्वज्ञान ब्रीज चढणी येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून सर्व प्रकारची वाहने ही स्लीप रोडने कापुरबावडी सर्कल मार्गे इच्छीत स्थळी जातील.
तर भिवंडी - नाशिक वाहिनी बाळकुम फायर ब्रिगेड ब्रीज चढणी येथून पुलावरुन मुंबई अथवा नाशिकला जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना ब्रिज चढणी येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. येथून जाणाऱ्या सर्व प्रकारची वाहने ही स्लीप रोडने कापुबावडी सर्कल मार्गे इच्छीत स्थळी जाऊ शकणार आहेत.