सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, यावरून मित्रांमध्ये वाद होऊन तो विकोपाला गेला. रागाच्या भरात एकाने मित्रावर चाकूने वार केले, तर दुसऱ्या मित्रांनी त्याच्या डोक्यात विटा घालून त्याला जखमी केले. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात अभिनंदन खरात आणि महेंद्र निचित (वय ३५) यांच्या तक्रारीवरून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली आहे.
कल्याण पश्चिमेतील सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या कार्यालयाच्या पाठीमागे के. के. वाइन शॉपच्या बाजूच्या गल्लीत शनिवारी (ता. ३) रात्री ही घटना घडली. अभिनंदन याच्या तक्रारीनुसार, महेंद्रने अभिनंदनचा मित्र तेजस निखारंगे याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याला पैसे दिले नाही, याचा राग आल्याने महेंद्रने तेजसवर चाकूने वार करत त्याला गंभीर जखमी केले. तसेच अभिनंदन आणि मोहन नडार (वय २५) याच्यावर तलवारीने वार करत त्यांना जखमी केले. याप्रकरणी महेंद्रविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महेंद्र याच्या तक्रारीनुसार, तो घरी जात असताना त्याच्या ओळखीच्या तेजस, अभिनंदन आणि मोहन यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यांना पैसे दिले नाही, हा राग मनात धरून तिघांनीही त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच अभिनंदन आणि मोहन यांनी तेथील विटा त्याच्या डोक्यात घालून त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी अभिनंदनविरोधात तक्रार दाखल केली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.