मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आता दोन पक्ष वेगळे झाले असून अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी महायुतीमध्ये सत्तेत आहे. तर, शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात महाविकास आघाडीमध्ये आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या असून राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे. यापूर्वी, जय पवार यांच्या लग्नाच्या निमित्ताने अजित पवारांनी (Ajit pawar) काका शरद पवार यांचे आदरातिथ्य केले होते. त्यानंतर, रयत शिक्षण संस्थेच्या एका बैठकीत पुन्हा एकदा काका-पुतण्या एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. त्यावरुन, राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. त्याच, अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल (Praful patel) यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महाराष्ट्राच्या विकासासाठी पवार साहेब आणि अजित दादा एकत्र आले असतील आणि त्यातून पवार साहेबांच्या अनुभवाचा काही फायदा होत असेल तर, या दोघांच्या एकत्रित येण्यावर मला काही गैर वाटत नाही. रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्राची एक मोठी शिक्षण संस्था आहे. लाखो विद्यार्थी या शिक्षण संस्थेत शिकत आहेत. अजितदादा विश्वस्त आहेत आणि पवार साहेब हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्या शिक्षण संस्थेच्या कार्यकारणीच्या बैठकीत दोघेही जर एकत्र आलेत तर, त्यात आश्चर्याची गोष्ट नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र आणि बारामतीच्या विकासासाठी जर पवार साहेबांसारख्या अनुभवी नेत्यांशी काही संवाद झाला तर, त्यात काही चुकीचं नाही. दोघांचे दोन वेगळे पक्ष आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या विकासासाठी जर दोघे एकत्र येत असतील तर त्यात चुकीचं नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी दिली.
एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे कुठलीही खंत किंवा तक्रार केलेली नाही. कार्यक्रम संपल्यानंतर सुनील तटकरेंकडे जेवणासाठी अमित शहा, देवेंद्र फडणवीसअजित दादा, एकनाथ शिंदे, मी एकत्र होतो. तेव्हा, अशा कुठल्याही विषयावर चर्चा झालेली नाही. खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही तिथेच सगळे भेटलो, जेवण केलं. महाराष्ट्रात आमची महायुती भक्कमपणे कशी चालवायची याबद्दल आम्ही सर्वांनी शुभचिंतन केल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले. तसेच, अमित शाहांकडे एकनाथ शिंदेंनी कुठलीही खंत व्यक्त केल्याच्या बाबीचा त्यांनी नकार दिला.
अभ्यास करावा लागतो, संदर्भग्रंथ वाचावे लागतात; गुणरत्न सदावर्तेंची उदयनराजेंवर बोचरी टीका
अधिक पाहा..