आयपीएल 2025 स्पर्धेच्या 35व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गुजरात टायटन्सच्या बाजूने लागला. कर्णधार शुबमन गिलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने 20 षटकात 8 गडी गमवून 203 धावा केल्या आणि विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं. गुजरात टायटन्सने 3 गडी गमवून हे आव्हान गाठलं. पण हे आव्हान गाठताना गुजरात टायटन्सला सुरुवातीला धक्का बसला. शुबमन गिल 7 धावांवर धावचीत झाला. त्यानंतर साई सुदर्शन आणि जोस बटलर यांच्यात 60 धावांची भागीदारी केली. मात्रा साई सुदर्शन बाद झाला. त्यानंतर विजयी धावा आणि चेंडूमधील अंतर वाढलं. एक क्षण असा होता की दिल्ली कॅपिटल्स हा सामना जिंकते. पण जोस बटलर नावाचं वादळ मैदानात घोंघावलं. जोस बटलरने गोलंदाजांना फोडून काढलं. खासकरून दिल्ली कॅपिटल्सचा हुकूमाचा एक्का असलेल्या मिचेल स्टार्कवर तुटन पडला. एका षटकात पाच चौकार मारून विजयी धावा आणि चेंडूमधील अंतर कमी केलं.
जोस बटलरने शेरफेन सुदरफोर्डसोबत शतकी भागीदारी केली. त्यांच्या भागीदारीमुळे गुजरात टायटन्सचा विजय सोपा होत गेला. जोस बटलरने 54 चेंडूत 11 चौकार आणि 4 चौकार मारत नाबाद 97 धावांची खेळी केली. खरं तर त्याचं शतक फक्त 3 धावांनी हुकलं. पण या शतकापेक्षा विजय खूपच महत्त्वाचा होता. त्याने शतक ठोकलं असतं तर विराट कोहलीच्या शतकी रेकॉर्डशी बरोबरी साधली असती. राहुल तेवतियाने 3 चेंडूत एक चौकार आणि षटकार मारत नाबाद 11 धावा केल्या.
शेवटच्या षटकात 10 धावांची गरज गुजरात टायटन्सला होती. मिचेल स्टार्क गोलंदाजीला आला आणि समोर स्ट्राईकला होता राहुल तेवतिया..पहिल्या चेंडूवर षटकार मारला आणि पाच चेंडूत चार धावा अशी स्थिती आणून ठेवली. दुसऱ्या चेंड़ूवर चौकार आला आणि गुजरात टायन्सने विजय मिळवला. गुजरात टायटन्सने पहिल्यांदा 200 हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला. गुजरात टायटन्सने या विजयासह गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे. दिल्ली कॅपिटल्सपेक्षा नेट रनरेट चांगला असल्याने गुजरात टायटन्सला पहिल्या स्थानावर स्थान मिळालं आहे. तर दिल्ली कॅपिटल्सची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा.