आयपीएल 2025 स्पर्धेच्या 37 व्या सामन्यातील पहिल्या डावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची बाजू भक्कम दिसली. नाणेफेकीचा कौल जिंकल्याने आरसीबीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच पंजाब किंग्स प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. खरं तर हा सामना जिंकायचा तर पंजाब किंग्सला 200 पार धावांची गरज होती. मात्र पंजाब किंग्सची फलंदाजी ढासळली. आघाडीचे फलंदाज मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले आणि विकेट एकामागोमाग गमवत बसले. पंजाब किंग्सने 20 षटकात 6 गडी गमवून 157 धावा केल्या आणि विजयासाठी 158 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान आता आरसीबीला गाठायचं आहे. या स्पर्धेत पंजाब किंग्सने 111 धावांचं टार्गेट डिफेंड केलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सला 95 धावांवर रोखलं होतं. त्यामुळे या सामन्यात आता तशीच गोलंदाजी करावी लागणार आहे. पण सध्याचा स्कोअर पाहता हा सामना आरसीबीच्या पारड्यात झुकलेला आहे.
प्रियांश आर्यने 22 आणि प्रभसिमरन सिंग 33 यांना सावध सुरुवात करून दिली होती. मात्र त्यांना मोठी फटकेबाजी करण्यात अपयश आलं. कर्णधार श्रेयस अय्यरकडून या सामन्यात फार अपेक्षा होत्या. मात्र फक्त 6 धावा करून तंबूत परतला. जोस इंग्लिसने त्यातल्या त्यात 29 धावांची खेळी केली. पण सुयश शर्माने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. नेहल वढेरा 5, तर मार्कस स्टोयनिस 1 धाव करून तंबूत परतेला. तर तळाशी आलेल्या मार्को यानसेन आणि शशांक सिंगने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मार्को यानसेनने 20 चेंडूत 2 षटकार मारत नाबाद 25 धावा केल्या. तर शशांक सिंगने 33 चेंडूत 1 चौकार मारत नाबाद 31 धावा केल्या.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून कृणाल पांड्याने 4 षटकं टाकली आणि 25 धावा देत दोन गडी बाद केले. सुयश शर्मानेही 4 षटकात 26 धावा देत दोन गडी बाद केले. रोमारियो शेफर्डने 2 षटकं टाकली आणि 18 धावा देत 1 विकेट घेतली. कृणाल पांड्या पहिल्या डावानंतर म्हणाला की, ‘खूपच चांगला प्रयत्न. पॉवरप्लेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने सुरुवात केली, त्यामुळे आमच्यावर दबाव आला. त्या स्थानावरून त्यांना 157 धावांपर्यंत रोखणे हा एक उत्तम प्रयत्न होता. वेगवान गोलंदाजांनी गोलंदाजी करताना मला जे जाणवले, ते म्हणजे वेगवान चेंडूंचा सामना करणे खूप सोपे होते. मला या विकेटवर जाणवले की, तुम्ही जितके हळू गोलंदाजी कराल तितके फलंदाजांसाठी कठीण आहे. आपल्याला खरोखर चांगली फलंदाजी करावी लागेल. पॉवरप्ले महत्त्वाचा ठरतो. जर आपण आपल्या क्षमतेनुसार फलंदाजी केली तर आपण हे आव्हान पूर्ण करू शकतो.’