मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या 18 व्या मोसमात आपल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र मुंबईने 23 मार्चच्या पराभवाचा 20 एप्रिलला वचपा काढला आहे. मुंबईने चेन्नईला आपल्या घरात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये 9 विकेट्सने लोळवलं आहे. मुंबईने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 177 धावांचं आव्हान हे 26 बॉलआधी 1 विकेटच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. मुंबईने 15.4 ओव्हरमध्ये विजयी धावांचा टप्पा पूर्ण केला. मुंबईचा हा या मोसमातील एकूण चौथा तर सलग तिसरा विजय ठरला. मुंबईला या विजयानंतर आणखी एक गूड न्यूज मिळाली आहे.
चेन्नईवर एकतर्फी विजय मिळवल्यानंतर मुंबईला तगडा फायदा झाला आहे. मुंबईने पॉइंट्स टेबलमधील आपलं स्थान सुधारलं आहे. मुंबईने पॉइंट्स टेबलमध्ये एका स्थानाची उडी घेतली आहे. मुंबईने केकेआरला मागे टाकत सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. तर मुंबईमुळे केकेआरची सातव्या स्थानी घसरण झाली आहे.
चेन्नई विरुद्ध 26 बॉलआधी विजय मिळवल्याने मुंबईच्या नेट रनरेटमध्ये कमालीची वाढ झाली आहे. मुंबईचा नेट रनरेट हा सामन्याआधी +0.239 असा होता. तो नेट रनरेट विजयानंतर +0.483 असा झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला चेन्नईची पराभवानंतर आणखी वाईट स्थिती झाली आहे. चेन्नईचा हा या मोसमातील एकूण सहावा पराभव ठरला. चेन्नई या पराभवानंतरही दहाव्याच स्थानी कायम आहे. चेन्नईचा नेट रनरेट हा -1.392 असा आहे.
दरम्यान रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे दोघे मुंबईच्या विजयाचे हिरो ठरले. मुंबईच्या गोलंदाजांनी चेन्नईला 176 धावांपर्यंतच पोहचू दिलं. त्यानंतर मुंबईकडून 177 धावांचं आव्हान हे तिघांनीच पूर्ण केलं. रायन रिकेल्टन रोहित शर्माला चांगली साथ देत अर्धशतकी सलामी भागीदारी केली. मात्र त्यानंतर रायन आऊट झाला. रायनने 19 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 3 फोरसह 24 रन्स केल्या.
पलटणमुळे केकेआरला झटका
रायन आऊट झाल्यानंतर रोहित आणि सूर्यकुमार यादव या जोडीने मुंबईला विजयापर्यंत नेलं. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 114 धावांची नाबाद भागीदारी केली. रोहितने नॉट आऊट 76 रन्स केल्या. तर सूर्यकुमार यादव 68 धावांवर नाबाद परतला.