उल्हास नदी विशेष पान
esakal April 21, 2025 03:45 AM

सुजलाम-सुफलाम उल्हास खोरे
भौगोलिक परिस्थितीमुळे वन्यजीवांचे आश्रयस्थान
कल्याण, ता. २० (बातमीदार): उल्हास नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात असली तरी नदीला सुजलाम-सुफलाम खोरे लाभले आहे. त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी केवळ शासनावर नाहीतर नदीच्या पाण्यावर तहान भागवणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचीदेखील आहे; पण भौगोलिक परिस्थितीमुळे कधीकाळी वन्यजीवांचे आश्रयस्थान असलेली उल्हास नदी अस्तित्वासाठी आर्त हाक देत आहे.
लोणावळा परिसरातून उगम पावलेली उल्हास नदी बदलापूरजवळ बारवी-मुरबाडी नद्यांना येऊन मिळते. सिद्धगड किल्ल्याच्या परिसरात बारवी नदी उगम पावते. या नदीच्या प्रवाहाबद्दल मुरबाडमधील अश्वमेध प्रतिष्ठानचे प्रमुख आणि मानद वन्यजीव संरक्षक अविनाश हरड यांनी अभ्यास केला आहे. त्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, भीमाशंकर अभयारण्यातून वाहणाऱ्या या नदीवर कल्याण- अंबरनाथ- मुरबाड या शहराची आणि औद्योगिक वसाहतींची तहान भागवण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी या नदीवर बारवी धरण आहे. मलंगगड डोंगररांगांमधून उगम पावणारी वालधुनी नदी काठावरच्या अंबरनाथ- उल्हासनगर शहराची सांडपाणी वाहून न्यायची जबाबदारी सांभाळत कल्याणजवळ उल्हासला येऊन मिळते. तिथेच थोड्या अंतरावर भातसा- काळू या मोठ्या प्रवाहाचा संगम उल्हास नदीशी होतो. यापैकी भातसा नदी कसारा घाटाच्या परिसरात उगम पावते. या नदीवरील भातसा धरण असून ते मुंबई-ठाणे शहराला पाणी पुरवते. तर हरिश्चंद्र गडाच्या परिसरातून येणारी काळू नदी आजही छोटे बंधारे वगळता मूळ स्वरूपात वाहत आहे. तर मलंगगडाच्या पश्चिम भागातून उगम पावणारी देसाई नदी मुंब्र्याजवळ उल्हास खाडीला येऊन मिळते. ठाण्याजवळ उल्हास नदी विभागली जाऊन दोन प्रवाहांत वाहते. एक प्रवाह घोडबंदर, दहिसर, वसई असा समुद्राला मिळतो तर दुसरा शिवडीमार्गे समुद्रात विलीन होते. सध्या हा प्रवाह स्थानिक भूगर्भीय हालचालींमुळे लहान झाल्याचे जलतज्ज्ञांचे मत आहे.
-------------------------------------
ज्वालामुखी उद्रेकामुळे वेगळेपण
- उल्हास खोऱ्याच्या पूर्वेला असलेली सह्याद्रीची रांग, मलंगगडाची रांग, माथेरान, माहुली या पर्वतरांगांची निर्मिती ज्वालामुखीच्या अनेक उद्रेकांमधून झालेली आहे. या प्रत्येक उद्रेकावेळी बाहेर आलेल्या लाव्हारसामध्ये निरनिराळे घटक होते. यामुळे वेगवेगळे स्तर सहज दिसतात. रौद्र भीषण कोकणकडा, भैरवगडाचा डाईक, माहुलीचे सुळके उल्हास खोऱ्याची भव्यदिव्य भूशास्त्रीय आश्चर्य आहेत.
- माहुली किल्ल्यावर आणि माथेरानमध्ये आढळणारा जांभा दगड या ज्वालामुखी उद्रेकाचे उत्तम उदाहरण आहे. काळू नदीला ज्यामुळे काळू हे नाव मिळाले, तो नदीतळाचा काळा कभिन्न कातळ हे त्यामागचे कारण आहे. सर्व परिसरात उपरत्न खजिना पसरलेला आहे. यामध्ये अमेथिस्ट, अगेट, कार्नेलियन, चालसिडोनी, जास्पर, ब्लड स्टोन, पोफायलाईट, स्टीलबाईट, स्कॉलेसाईटचा भरणा आहे.
-----------------------------------
गवताळ प्रदेश म्हणून नोंद
उल्हास खोऱ्यातील वन्यजीव संपदेबद्दल सांगताना अविनाश हरड यांनी सदाहरित, पानगळी, कांदळवने आणि गवताळ वनस्पतींचे समृद्ध परिसर आजही टिकून आहेत. यातील काही वनस्पती प्रदेशनिष्ठ आहेत, तर काही अत्यंत दुर्मिळ आहेत. जुन्या ग्रामस्थांच्या मते वाहनांचे यांत्रिकीकरण होण्याआधी चारा म्हणून चांगल्या प्रतीचे गवत राखणे, त्याचे व्यवस्थापनासाठी शासनाकडून सनद दिली जात असे. उल्हास खोऱ्यातील उत्तम गवताळ प्रदेशाची नोंद राज्यस्तरावर घेतली जात होती. आजही येथे लक्ष्मी कमळ बहरतात. या परिसरात कमळांच्या बिया (मखाणा), कमळाची मुळे यांचा समावेश आहारात होतो. या पाककृती काश्मिरी पाककृतीसारख्याच आहेत.
-------------------------------------
पाला किंवा भिंग माशांचे प्रजननाचे ठिकाण
अरबी समुद्रातून उल्हास नदीखोऱ्यात प्रजननासाठी येणाऱ्या पाला किंवा भिंग माशांची नोंद आहे. शासकीय नोंदीनुसार महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील फक्त दोनच नद्यांमध्ये हा मासा आढळतो. यापैकी सर्वात मोठे मासे उल्हास नदीत यायचे; परंतु साठच्या दशकात खाडीशेजारी चामड्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांमुळे मासे येणे बंद झाले. योगायोग म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सिंध प्रांतातून स्थलांतरित होऊन उल्हासनगरमध्ये प्रतिष्ठापित झालेल्या झुलेलाल देवतेचे वहन हाच पाला मासा आहे, असे हरड यांनी नमूद केले आहे.
--------------------------------
वनपिंगळा, रानगव्याचा वावर
- गेली शंभर वर्षे अभ्यासकांपासून अंतर राखत अज्ञातवासात असलेला वनपिंगळा हा पक्षी १९९४ साली विदर्भात दिसला. तोपर्यंत वनपिंगळा नामशेष झाला असावा, असाच समज पसरलेला होता. त्यानंतर उत्तर भारतात म्हणजे तापी नदीच्या उत्तरेला अजून काही ठिकाणी वनपिंगळ्याचे अस्तित्व होते; पण तापी नदीच्या दक्षिणेला वनपिंगळ्याची पहिली नोंद २०१४ मध्ये उल्हास नदीखोऱ्यात झाली.
- दक्षिण भारतातील ही पहिली नोंद होती. तर इथले कायम रहिवासी नसलेले ‘रानगवे’देखील उल्हास खोऱ्यात येत असतात. याचा कागदोपत्री पुरावा दीडशे वर्षांपासून शासकीय अभिलेखागारात पडून आहे; पण मुरबाडजवळ एका देवराईत असलेल्या देवाचे देऊळ रानगव्यांच्या शेणाने सारवून वार्षिक उत्सवाला सुरुवात केली जात होती, असे दाखले आजही आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.