Latest Marathi News Updates : विक्रोळीत भाजीच्या टेम्पोतून गोवंश तस्करी, ८०० किलो मांस जप्त
esakal April 21, 2025 03:45 AM
Vikroli : भाजीच्या टेम्पोतून गोवंश तस्करी, ८०० किलो मांस जप्त

मुंबईत विक्रोळीत भाजीच्या टेम्पोतून गो तस्करीचा प्रकार उघडकीस आलाय. जवळपास १ लाख ६० हजार रुपये किंमतीचे लहान, मोठ्या आकाराच्या गोवंश सदृश्य जनावरांचे मांस, मुंडके असं ८०० किलो वजनाचं मांस जप्त केलंय. टेम्पो चालक फरार झाला असून अधिक तपास सुरू आहे.

पैठणमध्ये बैलजोडी चोरणाऱ्या दोघांना अटक

अब्दुल्लापुर तांडा (ता.पैठण) येथुन बुधवारी ( ता.१६) शेतकऱ्या ने गोठ्यात बांधलेले एक लाख तीस हजार रुपये किंमतीचे दोन बैल अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा चोरून नेले होते.या प्रकरणी पाचोड (ता .पैठण) पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटया विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंबंधी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ग्रामीण पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून रविवारी (ता.२०) गुरे चोरणाऱ्या टोळीच्या दोघां म्होरक्यास मोठ्या शिताफिने अटक केली आहे.

Crime News : ४८ वर्षीय ट्रॅक्टर चालकाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, पुण्यातली घटना

अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार केल्याचा प्रकार मूर्टी ता. बारामती येथील शिवशेतात रविवार दुपारी १२ ते १ दरम्यान घडला. आण्णा किसन गोफणे वय ४८ रा. मोराळवाडी ता. बारामती असे बलात्कार करणाऱ्या नराधमाचे नाव असून तो ट्रॅक्टर चालक आहे. मुर्टी येथिल शिवशेतात नांगरटीचे काम सुरू होते दुपारच्या वेळी पीडित मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला ही घटना तिचा ९ वर्षाच्या भावाने पाहिली जवळच सुमारे आठशे मीटर अंतरावर नातेवाईकांच्या घरी पळत जाऊन घडलेला प्रकार सांगितला.

Pune News : डॉक्टर सुश्रुत घैसास यांची चौकशी होणार, पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. आता पुणे पोलीस डॉक्टर घैसास यांना नोटीस पाठवणार आहेत. घैसास यांची चौकशी होणार असून पुणे पोलीस जबाब नोंदवणार आहेत.

माजी पोलीस महासंचालकांची हत्या, पत्नीला चौकशीसाठी घेतलं ताब्यात

कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची हत्या करण्यात आलीय. बंगळुरूतील निवासस्थानी त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्यांच्या पत्नीवर संशय असून पोलिसांनी चौकशीसाठी पत्नीला ताब्यात घेतलंय.

DGP Om Prakash: कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची बेंगळुरूच्या एचएसआर लेआउटमध्ये हत्या

१९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची बेंगळुरूच्या एचएसआर लेआउटमध्ये हत्या करण्यात आली. घटनेचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही: बंगळुरू शहर पोलिस

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी गांधी सागर वन्यजीव अभयारण्यात दोन चित्ते सोडले

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी गांधी सागर वन्यजीव अभयारण्यात दोन चित्ते सोडले. 'प्रोजेक्ट चित्ता' अंतर्गत कुनो राष्ट्रीय उद्यानातून दोन चित्ते गांधी सागर वन्यजीव अभयारण्यात हलवण्यात आले आहेत.

Jammu Rain: रामबनमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट सुरूच

रामबनमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट सुरूच आहे. एसएसपी रामबन कुलबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूस्खलनात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

Raigad Live: वणव्याच्या कारणाने रायगडमध्ये वीज पुरवठा करणारी लाईन जळाली

रायगडमधील महाड शहरातील मुंबई गोवा महामार्गा लगत वणव्याच्या कारणाने वीज पुरवठा करणारी लाईन जळाल्याची घटना घडली आहे. महाड नगर पालिका अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. पण या वणव्यामुळे केंबुर्ली परिसरातील वीज पुरवठा प्रभावीत झाला आहे.

Konkan Live: महाराष्ट्राचा हापूस आंबा दिल्लीत पोहचणार

कोकणची ओळख असलेला हापूस आंबा आता दिल्लीत पोहचणार आहे. येत्या 30 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र हापूस आंबा महोत्सवाचे भव्य उदघाटन होणार आहे. याबाबत या महोत्सवाचे आयोजक खासदार रवींद्र वायकर यांनी माहिती दिली.

या मोहत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व अजित पवार हजर राहणार आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील सर्व खासदारांना आमंत्रित करण्यात आले आहे.

Solapur Live : रेल्वेत प्रवास करतांना खिडकीतुन दगड लागल्याने सोलापूरतील 4 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

रेल्वेत प्रवास करतांना खिडकीतुन दगड लागल्याने सोलापूरतील 4 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू ; लछण ते सोलापूर दरम्यान येताना टिकेकर वाडी जवळ दुपारी 1 वाजता अज्ञात व्यक्तीने दगड फेकल्याने घटना घडली

CM Fadnavis Live : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत '22वा मुंबई लाईव्ह एंडोस्कोपी 2025 पुरस्कार सोहळ्यात' पुरस्कारांचे वितरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे '22वा मुंबई लाईव्ह एंडोस्कोपी 2025 पुरस्कार सोहळा' येथे एमराल्ड पुरस्कारांचे वितरण केले.

Live : ठाकरे बंधू एकत्र यावेत, एकविरा देवीचं दर्शन घेऊन उपनेत्या शुभांगी पाटील यांचं साकडं

शिवसेना (ठाकरे गट)च्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही पुन्हा एकत्र यावेत, अशी प्रार्थना करत लोणावळ्यातील प्रसिद्ध एकविरा देवीच्या दर्शनाला जाऊन देवीला साकडं घातलं आहे.

Live : नाशिकमध्ये पुन्हा एकदा आगीचा प्रकार, एसटी वर्कशॉपला आग

नाशिकमध्ये पुन्हा एकदा आग लागण्याची घटना समोर आली आहे.

पेठ रोडवरील एसटी वर्कशॉपमध्ये आग लागल्याने खळबळ उडाली आहे.

वर्कशॉपमध्ये साठवलेल्या स्क्रॅप मटेरियलने पेट घेतल्याची माहिती आहे, मात्र आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले असून जवान आग विझवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले असून त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Live : दुधाचा ट्रक पलटी, दोघेजण गंभीर जखमी

धाड येथील अमर डेरीचा दूध वाहतूक करणारा ट्रक एअर ब्रेक फेल झाल्यामुळे मलकापूर रोडवरील राजूर घाटातजवळ दुधाचा ट्रक पलटी झालाय. सुदैवाने ट्रक डाव्या बाजूला पलटी झाल्यामुळे मोठी हानी टळली. ड्रायव्हर व क्लिनर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने जीवित हानी टळली आहे. पोलिसांनी तातडीने जखमींना जिल्हा सामान्य रुग्णाल्यात भरती केले आहे.

Live : . ब्रेक फेल झाल्याने डंपरचा भीषण अपघात

कल्याण पूर्व पुना लिंक रोडवर विजय नगर परिसरात डंपर चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटल्याने डंपर डिव्हायडर वर चढला. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने आज रविवार असल्याने या रस्त्यावर दुपारच्या सुमारास वर्दळ कमी होती. त्यामुळे कोणतेही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे .

Live: खराब हवामान आणि झोजिला दर्र्यावर बर्फ साचल्यामुळे श्रीनगर-सोनमार्ग-गुमरी मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद

खराब हवामान आणि झोजिला दर्र्यावर बर्फ साचल्यामुळे श्रीनगर-सोनमार्ग-गुमरी मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद

Live: अर्जुन बाबुताने पेरूमध्ये झालेल्या ISSF वर्ल्ड कपमध्ये रौप्य पदक जिंकले!

- अर्जुन बाबुताने पेरूमध्ये झालेल्या ISSF वर्ल्ड कपमध्ये रौप्य पदक जिंकले!

- अर्जुन बाबुताने २०२५ शूटिंग वर्ल्ड कपमध्ये लिमा, पेरू येथे पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.

Live: अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस चार दिवसांच्या भारत दौर्यावर मोदींची घेणार भेट

अमेरिकेचे उपराष्ट्रपती चार दिवसांच्या भारत दौर्यावर उद्या नवी दिल्लीत दाखल होणार ही त्यांची पहिली भारत यात्रा असेल.

उपराष्ट्रपती वेंस उद्या पंतप्रधान यांची भेट घेतील. ते जयपूर आणि आग्रालाही भेट देतील. दोन्ही देश आपापसातील संबंधांतील प्रगतीचा आढावा घेतील.

पार्टीने दोन्ही खासदारांना अशा टिपण्ण्यांपासून वळण्यासाठी सल्ला दिला

भारतीय जनता पार्टीने सांगितले आहे की, सर्वोच्च न्यायालय आणि भारताच्या मुख्य न्यायाधीशांबद्दल पार्टीचे खासदार निशिकांत दुबे आणि दिनेश शर्मा यांच्या टिपण्ण्यांना स्वीकारार्ह ठरवले जात नाही.

Aditi Tatkare Live: ई-पिंक रिक्षा महिलांसाठीची महत्त्वाकांक्षी योजना- तटकरे

आज आनंदाचा दिवस असून पिंक ई-रिक्षा वाटप योजना महायुती सरकारने सुरू केली आहे. नागपूर शहरातून 1100 हून अधिक पात्र अर्ज प्राप्त झालेत आहेत. महिलांना रोजगार निर्माण व्हावा याकरिता ही योजना आणली आहे. या महिलांना दहा दिवसांची ट्रेनिंग मिळणार असून आज पहिला टप्पा नागपूर उद्या पुण्यात कार्यक्रम असेल, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महिलांना पिंक ई-रिक्षांचे वाटप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महिलांना पिंक ई रिक्षा वाटप होणार आहे. महिला व बालविकास विभागामार्फत मार्फत महाराष्ट्रातील गरजू महिलाना पिंक ई रिक्षा वाटप करण्यात येणार असून या योजने अंतर्गत शासनाकडून 20 टक्के अनुदान दिले जाणार आहे. राज्यात एकूण 8 जिल्ह्यात दहा हजार पिंक ई रिक्षा वाटप केले जाणार आहे. पुणे, नाशिक, नागपूर, संभाजी नगर, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर अमरावती या आठ जिल्ह्यात वाटप केले जाणार आहे.

Nashik Live: अजित पवार गटाची नाशिकची बैठक अचानक रद्द

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची नाशिकची बैठक रद्द झाली आहे. अजित पवार आणि छगन भुजबळांच्या उपस्थितीत ही बैठक होणार होती. अजित पवारांचा दौरा रद्द झाल्याने भुजबळांनी देखिल बैठकीला न येण्याचा निर्णय घेतल्याने बैठकच रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.

Live : राज-उद्धव एकत्र आले तर आनंदच: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रताप जाधव; महायुतीवर परिणाम होणार नाही

मनसेचे नेते राज ठाकरे आणि बाळासाहेब उद्धव ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेवर शिवसेनेचे केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी राज-उद्धव एकत्र येणार असतील तर आम्हाला त्याचा आनंद असल्याचे मत व्यक्त केले आहे. "महायुती सक्षम आहे. आमचे विचार आणि काम तळागाळापर्यंत आहे. लोकांमध्ये संपर्क आहे. असे किती ही लोक एकत्र आले तर त्यांचा महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही. राज्यातील सर्व महानगर पालिकेच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणून निश्चितच जिंकू" असं ते म्हणाले.

Nagpur Live : नागपूरमध्ये देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद

नागपूर देशातील सर्वाधिक तापमान असल्याचं शहर ठरलं आहे. नागपूरचं तापमान ४४.७ अंश सेल्सिअसवर पोहचले. शनिवारी सगळ्यात अधिक तापमान नागपूरमध्ये नोंदवलं गेलं आहे.

Solapur Live : विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह सहा जणांवर गुन्हा; घर, रिक्षा घेण्यासाठी माहेरवरुन पैसे आणण्याचा तकादा

घर बांधायला व गाडी घ्यायला ८० हजार रुपये व रिक्षा घेण्यासाठी एक लाख रुपये माहेरवरून घेऊन ये म्हणून छळ केल्याची फिर्याद पद्मिनी रामदास कोळेकर (वय ३८, रा. रोहिणीनगर, भाग ३, जुळे सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिसात दिली. यामुळे पतीसह सासू-सासरे,दीर आणि नणंदेवर गुन्हा दाखक झाला आहे.

Live : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नाशिक दौरा रद्द, समीर भुजबळ यांनी दिली माहिती

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा रद्द

- हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अजित पवारांचा दौरा रद्द

- माजी खासदार समीर भुजबळ यांची माहिती

mumbai Live : अटी घालून राजकारण होतं का? उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना सवाल!

राज ठाकरेंंच्या एकत्र येण्याचा प्रस्तावाला प्रतिसाद देताना उद्धव ठाकरेंनी काही अटी घातल्या होत्या. त्यावरून उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. अटी घालून राजकारण होतं का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

Solapur Live : भरत गोगावलेंच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान दोन गटात राडा, गुन्हा दाखल

रोजगार हमी मंत्री भरत गोगावले हे सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांच्या समोरच शिवसेनेतील दोन गट एकमेकांना भिडले.यामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक मनोज शेजवाल या दोन गटात हा राडा झाला.शेवटी या दोन गटात मध्यस्थी करत मंत्री भरत गोगावले यांना हा राडा थांबवावा लागला. याप्रकरणी सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Live: मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांनी आधी योजना आखावी

मध्य रेल्वेवर नियोजित मेगाब्लॉकमुळे रविवारी काही महत्त्वाच्या मार्गांवर रेल्वेसेवा प्रभावित होणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी प्रवासाची योजना आखण्याचा सल्ला दिला आहे. या कामादरम्यान सिग्नल यंत्रणा, ट्रॅक देखभाल व विद्युत कामे केली जाणार आहेत. प्रवाशांनी वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी आणि गैरसोयीपासून बचाव करण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अॅपवर तपशील पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

छगन भुजबळांसाठी बॅनरबाजी, मंत्रिपद देण्याची मागणी

नाशिकच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर छगन भुजबळांसाठी बॅनरबाजी करण्यात आली.

Nagpur Live: नागपूरच्या भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये लागलेली आग अजूनही धुसमत

नागपूरच्या भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये शहरातील संपूर्ण कचरा साठवला जातो आणि याच कचऱ्याला काल दुपारी लागलेल्या आगीमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा असल्याने आगीने धगधगत स्वरूप घेतले असून, आगीवर नियंत्रण मिळविल्याचे जरी सांगण्यात येत असले तरी अजूनही कचऱ्यातून धूर सतत निघत आहे. रात्रभर अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व वरिष्ठ अधिकारी सतर्क झाले असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा या आगीबाबतची माहिती घेतली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.