(Thackeray brothers) मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले मोठे बंधू, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याची तयारी दर्शवली आहे. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ठाकरे बंधू एकत्र आले तर उत्तम आहे, आम्ही स्वागत करू, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, प्रत्येकाने आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून जे योग्य वाटते, तो निर्णय त्यांनी घ्यावा, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तथापि, शिंदे गटाचे नेते आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी मात्र राज ठाकरे यांना ‘आपुलकीचा सल्ला’ दिला आहे. ( Yogesh Kadam’s advice to Raj Thackeray)
प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा टाळी देण्याबद्दल राज ठाकरे यांनी टिप्पणी केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अजूनही एकत्र येऊ शकतात का? असा सवाल महेश मांजरेकर यांनी केला असता, राज ठाकरे म्हणाले, ‘कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडणे किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणे, एकत्र राहणे यात फार कठीण गोष्ट वाटत नाही. विषय फक्त इच्छेचा आहे, कारण हा माझ्या एकट्याचा विषय नाही.’ याला उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि ग़ृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी ‘X’ या सोशल मीडियावर पोस्ट करून राज ठाकरे यांना आपुलकीचा सल्ला दिला आहे. जरा जपून, आपण मनापासून हात पुढे कराल आणि भविष्यात तुमचेच पाय खेचले जातील, असे त्यांनी म्हटले आहे.
‘वापरा आणि फेकून द्या’ अशी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची नीती राहिलेली आहे. स्वार्थ साधून झाला की त्यांना रक्ताची नातीसुद्धा नकोशी होतात आणि याचा प्रत्यय खुद्द राज ठाकरे यांना देखील आहे. याशिवाय, शिवसेनेचे पहिल्या फळीतले नेते नारायण राणे, मनोहर जोशी, दिवाकर रावते, लीलाधर डाके, रामदास कदम आणि एकनाथजी शिंदे यांनासुद्धा ‘गरज सरो अन वैद्य मरो’ याप्रमाणे कसे डावलले हे वेगळे सांगायला नको, असेही योगेश कदम यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – Thackeray and Thackeray : भाजपा, एसंशिंकडून राज यांच्या खांद्याचा वापर, उद्धव ठाकरेंचा आरोप