जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे पहलगामला जाण्यासाठी निघाले आहेत. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जातेय.
Live : विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारीबीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची आज बदली झाली आहे. त्यांच्या जागी विवेक जॉन्सन यांना बीड जिल्हाधिकारी म्हणून पदभार देण्यात आला आहे. आज हे आदेश अप्पर मुख्य सचिव व्ही राधा यांनी हे आदेश काढले आहेत.
Live : राज्यातील बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीरबाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत राज्यातील ३०५ बाजार समित्यांची आणि ६८ खाजगी बाजारांची सन २०२३-२४ या वर्षाच्या कामगिरीवर आधारित वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. या क्रमवारीनुसार राज्यातील १० बाजार समित्यांमध्ये पुणे विभागातील बारामती बाजार समितीने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
Live : पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये अवकाळी पाऊसराजगड तालुक्यातील अनेक गावांना पावसाने झोडपलं. दुपारी तीनच्या सुमारास अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. सुमारे अर्धा तास राजगड तालुक्यामधील काही गावांमध्ये बरसल्या पावसाच्या सरी कोसळल्या. पा
Live : हिंदी सक्तीच्या निर्णयाला स्थगिती; लवकरच सुधारित शासन निर्णयहिंदी भाषेला 'अनिवार्य' करण्याच्या निर्णयाला आता स्थगिती देण्यात आली आहे. हिंदी शिकणं बंधनकारक नसेल, असं स्पष्ट करत कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं की, यासंदर्भात लवकरच सुधारित शासन निर्णय (GR) जारी केला जाईल.
Live : उद्धव - राज ठाकरे एकत्र यावेत, अशी मागणी; डोंबिवलीतही लागले बॅनर्सराजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. मुंबईतील शिवसेना भवन आणि डोंबिवली पश्चिम रेल्वे स्टेशनबाहेर "दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं" असे बॅनर्स झळकले आहेत.
डोंबिवलीतील बॅनरवर लिहिलं आहे: "तुम्ही दोघे एकत्र आलात, तर तो दिवस महाराष्ट्रासाठी दिवाळी-दसरा ठरेल."
हा बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
- राज्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आणि मे महिन्यात तापमानाचा पारा वाढतच राहणार आहे.
- तापमान ४० अंश डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
- यावर्षी बहुतेक वेळा तापमान ४० अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.
- विदर्भात पुढील चार ते पाच दिवस उष्ण लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे.
- चंद्रपूरमध्ये काल राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
Jalna Live: जालन्यात तलाठी आणि ग्रामसेवकाकडून शेतकऱ्यांच्या 57 कोटी रुपयांच्या अनुदानाची अफरातफरजालना जिल्ह्यात अतिवृष्टी, ढगफुटी, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी अनुदान मंजूर करण्यात आले होते. मात्र हे अनुदान संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
Pune Live: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात डॉ. सुश्रुत घैसास यांचा जबाब पुणे पोलिसांनी नोंदवला- पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, ससून रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
- डॉ. घैसास यांची चौकशी पूर्ण झाली असून, त्यांच्यावर IPC कलम 106(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.
- ससून रुग्णालयाच्या प्रारंभिक अहवालात काही अस्पष्टता होती, त्यामुळे अधिक स्पष्टता मिळवण्यासाठी अभिप्राय मागवण्यात आला होता.
- सुधारित अहवाल आल्यानंतरच संबंधित कारवाई करण्यात आली.
Pune Live: पुण्यातील वारजे येथे जलवाहिनी फुटली- पुण्यात वारजे परिसरात जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले.
- उन्हाळ्यातील टंचाईच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर लाखो लिटर पाणी वाहून गेले.
- पाण्याची कमतरता असताना पाइपलाइन फुटल्यामुळे मौल्यवान पाणी वाया गेल्याची घटना.
Islampur Live : जमावाच्या मारहाणीत कुटुंबातील पाच जखमी: किल्ले मच्छिंद्रगडमधील प्रकार; पोलिस ठाण्यात १५ जणांवर गुन्हासांगलीमधील इस्लामपूरमध्ये किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून जमावाने विटा, लोखंडी पाइप व धारदार कात्रीने केलेल्या मारहाणीत एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले. रविवारी (ता. २०) रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी आलमशा सिकंदर शिकलगार (वय ४७, किल्लेमच्छिंद्रगड) यांनी फिर्याद दिली असून, १५ जणांवर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Beed Live : आरोपी वाल्मीक कराड आणि गॅंग ची जेलमध्ये अजूनही दहशतउपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ. एस आय टी चे प्रमुख डॉक्टर बसवराज तेली यांच्या उपस्थितीमध्ये 23 फेब्रुवारी रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांचा जबाब नोंदवला होता. वाल्मीक कराड याची 2014 पासून संपूर्ण जिल्ह्यात दहशत आहे तो सध्या जेलमध्ये असला तरी त्याच्या कार्यकर्त्याची बीड उपविभागा दहशत कायम असल्याचा जबाब बीडचे उपविभागी पोलीस अधिकारी विशंभर गोल्डे यांच्या जबाबदातून उघड झाली आहे कराड हा गुंडा असल्याचे माहिती असतानाही बीड पोलिसांकडून दोन कर्मचारी देऊन कराडला संरक्षण देत होते हे उघड झाले आहे.
Live : "उद्धव ठाकरे मुंबईतील सगळ्या लँड स्कॅमचे बादशाह"- आशिष शेलारभाजपचे नेते आणि खासदार आशिष शेलार यांनी शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना मुंबईतील लँड स्कॅमचे बादशाह म्हटलं आहे. "त्यांच्या डोक्यात सतत लँड स्कॅम सुरु असतात." असा आरोप त्यांनी केला आहे.
Nashik Live : चोरीच्या १५ दुचाकी हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील दोघे जेरबंदराज्यभर दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील दोघांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. या टोळचा सूत्रधार धनंजय अविनाश कुंदे (वय २४, रा. एकरूखे, ता. राहाता) आणि देवेंद्र राममिलन गौतम (वय २६, रा. उत्तरप्रदेश, हल्ली रा. एकरूखे, ता. राहाता) या दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या १५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
Live: कांद्याच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 44 टक्क्यांनी घटकांद्याच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 44 टक्क्यांनी घट झाल्याचं निदर्शनास आलं आहे. विदेशात जास्त निर्यातीसाठी लासलगाव बाजार समिती पाठपुरावा करणार असल्याचं म्हटलं जातंय. 7 लाख 46 हजार क्विंटल कांद्याची निर्यात कमी झाल्याचं समोर आलं आहे.
पिंपरी- चिंचवड शहरातील अनेक भागांमध्ये दूषित पाण्याचा फटकापिंपरी- चिंचवड शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना उलटी, जुलाबाने हैराण झालेत. शहरातील रावेत, मोशी, वाल्हेकरवाडी, जाधववाडी, चऱ्होली परिसरातील नागरिक जुलाब आणि उलटी ने त्रस्त झाले आहेत. दूषित पाण्यामुळे नागरिकांना अशा आजारांना सामोरे जाव लागत असल्याच सांगितलं जात आहे.
Pune Live: हॉर्न का वाजवला म्हणून पाषाण येथे पती पत्नीला 5 जणांकडून मारहाणहॉर्न का वाजवला म्हणून पाषाण सर्कल येथे दांपत्याला पाच जणांकडून मारहाण करण्यात आली तसेच धमकावण्यातही आलं. पुण्यातील चतुश्रिंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Solapur: जुळे सोलापूरमधील बस थांब्याची दुरावस्था, नागरिकांत भीतीचे वातावरणजुळे सोलापुरातील हॉटेल लोकप्रिया समोर असलेल्या बस थांब्याची मोठी दुरावस्था झाली आहे. त्याचा वापर सध्या भिक्षुक व व्यसनी लोक झोपण्यासाठी व व्यसनाची जागा म्हणून करत आहेत. बसण्यासाठीचे बाकडे गायब झाले आहेत.
सर्वत्र काटेरी झाडे वाढली आहेत. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या बस थांब्याची दुरावस्था झाली आहे. व्यसनी लोकांचा बस थांब्यातील वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
महापालिका प्रशासनाने तातडीने याठिकाणच्या बस थांब्याची स्वछता करावी ,पोलीस प्रशासनाच्या मदतीने कायमस्वरूपी व्यसनी लोकांचा बस थांब्यातील वावर बंद करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
Live : महादेव गायकवाड खून प्रकरणातील तीनही आरोपी पोलिसांच्या ताब्यातआज सकाळीच तीन पथकं आरोपींच्या शोधासाठी केले होते रवाना.
प्रमुख आरोपी असलेले रोहित शिवाजीराव थावरे, ऋषिकेश रमेशराव थावरे, कृष्णा माणिकराव थावरे (सर्व रा. आनंदगाव) यांचा समावेश.
मंगळवारी पहाटे आळंदी (पुणे) येथून तीनही आरोपी घेतले ताब्यात.
बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांची कारवाई.
Pune Live : पुणे पोलिसांनी काढली डॉ. सुश्रुत घैसास यांची सुरक्षाडॉ सुश्रुत घैसास यांची सुरक्षा पुणे पोलिसांनी काढली
घैसास यांच्यावर अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे
गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी काढली त्यांची सुरक्षा
सुरक्षेसाठी पोलिस मुख्यालय येथील एक कर्मचारी देण्यात आला होता
One Nation One Election Live Updates: एक देश एक निवडणुकीसंबंधी संयुक्त संसदीय समितीची आज बैठकएक देश एक निवडणुकीसंबंधी स्थापन संयुक्त संसदीय समितीची आज नवी दिल्लीत बैठक, कायदेतज्ञांचे जाणून घेणार विचार.
Baramati Live Updates: विद्या प्रतिष्ठानची महत्त्वपूर्ण बैठक बारामतीत; शरद पवार, सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवारांची उपस्थितीबारामतीतील नामवंत शैक्षणिक संस्था विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीस आज सुरुवात झाली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार यांची उपस्थिती होती. बैठकीदरम्यान युगेंद्र पवार यांनी सुनेत्रा पवार यांचे आशीर्वाद घेतले.
Mumbai Live: चुनाभटट्टीतून अंमलीपदार्थ विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, १० कोटींचा चरस जप्तमुंबईच्या चुनाभटटी परिसरात अंमलीपदार्थ विक्री करणाऱ्या एका परराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून, पोलिसांनी या कारवाईत सुमारे १० कोटी रुपयांचा चरस जप्त केला आहे. चुनाभटटी पोलीस ठाण्याच्या एटीसी पथकासह परिमंडळ ६ च्या विशेष पथकाने गस्त घालताना एका संशयास्पद व्यक्तीला ताब्यात घेतले. त्या व्यक्तीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ किलो ९०७ ग्रॅम वजनाचा चरस सापडला, ज्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे १ कोटी ९० लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणात पोलिसांनी रहिम माजिद शेख (३०) या आरोपीस अटक केली असून, त्याच्याविरोधात विविध अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत असून, या टोळीचे इतर सदस्य आणि पुरवठा साखळी उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Assam Live : गुवाहटीमध्ये पावसाने सखल भागात साचले पाणी, नागरिकांचा तारांबळगुवाहाटीत सततच्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स, पत्नी उषा व्हान्स आणि त्यांच्या मुलांसह, जयपूरच्या अंबर किल्ल्यावर पोहोचले.
Pune Live : लासुर्णे गावातील उड्डाणपूल रद्द करण्याची सुप्रिया सुळेंची नितीन गडकरी यांच्याकडे मागणीइंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथून जाणाऱ्या संत श्री तुकाराम महाराज पालखी महामार्गावर उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे. परंतु स्थानिकांच्या मते हे उड्डाणपूल येथे गरजेचे नसून यामुळे वाहतूकीला अडथळा येण्याची शक्यता नाही. येथील ग्रामपंचायतीने देखील उड्डाणपूलाला विरोध करणारा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल रद्द करण्यात यावा ही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी नितीन गडकरींकडे केली आहे.
Nagpur Violence : नागपूर दंगलीतील देशद्रोहाचा आरोप असलेल्या हमीद इंजिनिअरला जामीन मंजूरनागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीच्या संदर्भात नागपूर सत्र न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्वाळा दिला आहे. सोशल मीडियावर मत व्यक्त करणे देशद्रोह नव्हे, असे सांगून न्यायालायाने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेल्या मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा कार्याध्यक्ष हमीद इंजिनिअर यास सशर्त जामीन मंजूर केला आहे. यामुळे पोलिसांना मोठा धक्का बसला आहे.
Heat Waves : छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात उष्ण लाटा; तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यताछत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात उष्ण लाटांमुळे पुढचे 10 दिवस होरपळ होणार आहे. गेल्या आठवड्याभरापासून दिवसाला एक अंशाने तापमानात वाढ होत आहे. संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात सुमारे 6 दिवस तापमान वाढते राहिल्यामुळे उष्णतेने कहर केला. पुढील 10 दिवसांत पारा चढणार असेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. कमाल तापमान 44 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
Zeeshan Siddiqui Death Threat : माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकीराष्ट्रवादीचे नेते दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे पुत्र माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेलद्वारे त्यांना धमकी देण्यात आली आहे. झिशान सिद्दिकी यांचे वडील बाबा सिद्दिकी यांची मागील वर्षी हत्या करण्यात आली होती. त्यांना देखील हत्येआधी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता झिशान यांना धमकी आल्यामुळे एकच खळबळ उडालीये.
Karnataka Politics : 'त्या' १८ आमदारांचे निलंबन मागे घ्या, भाजप शिष्टमंडळाची विधानसभा अध्यक्ष खादर यांना विनंतीबंगळूर : भाजप आमदारांच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांना विधानसभेतील १८ भाजप आमदारांचे निलंबन मागे घेण्याचे आवाहन केले. विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्या नेतृत्वाखाली भाजप आमदारांचे शिष्टमंडळ आज विधानसभेच्या पहिल्या मजल्यावरील सभापतींच्या कार्यालयात गेले आणि सभापती यु. टी. खादर यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने त्यांना निलंबन मागे घेण्याची विनंती केली.
Air Force : बंगळुरात हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर हल्ला, विंग कमांडर संतप्त; कन्नड गटाने हल्ला केल्याचा आरोपबंगळूर : बंगळूरमध्ये हवाई दलाच्या (आयएएफ) अधिकाऱ्यावर दुचाकीवरून आलेल्या कन्नड भाषिकांच्या गटाने हल्ला केला आणि शिवीगाळ केली, असे पोलिसांनी सांगितले. भारतीय हवाई दलाचे (आयएएफ) स्क्वाड्रन लीडर शिलादित्य बोस त्यांच्या पत्नीसह विमानतळावर जात असताना ही घटना घडली.
Yavatmal Water Shortage : यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावांत पाणीटंचाई; पाण्यासाठी महिलांची पायपीटयवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून पाणी मिळविण्यासाठी महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
खोची : येथील गावयात्रेत मधमाश्यांच्या हल्ल्यात तीसहून अधिक जण जखमी झाले. जखमींवर खासगी तसेच सरकारी दवाखान्यात उपचार केले. उपचारानंतर जखमींना घरी पाठविले. मंदिर परिसरात मधमाश्यांच्या अचानक झालेल्या हल्ल्याने यात्रेत धावपळ उडाली. येथील जाधव, घोडके गल्लीतील ग्रामस्थ यात्रेनिमित्त नैवेद्य घेऊन मंदिराकडे गेले होते. महिला आणि बालके सोबत होती. मंदिरात नैवेद्य अर्पण करण्यासाठी मंदिराच्या पाठीमागील चिंचेच्या झाडाखाली बसले होते. यावेळी अचानक मधमाश्यांचे पोळे झाडावरून खाली पडले. खाली पडलेल्या मधमाश्यांनी अचानक हल्ला केला. त्यात रणजित घोडके, योगेश जाधव, कुमार जाधव, सचिन जाधव, गणपती जाधव, रोहन जाधव, हर्षवर्धन घोडके आदींसह महिला, लहान मुलांचा जखमीमध्ये समावेश आहे.
Jharkhand News : झारखंडमध्ये आठ नक्षलवाद्यांचा चकमकीत खात्मारांची : झारखंडमधील बोकारो येथे नक्षलवाद्यांशी सोमवारी झालेल्या चकमकीमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाचे कोब्रा पथक आणि झारखंड पोलिसांच्या पथकाने आठ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. नक्षलवादी संघटनेच्या मध्यवर्ती समितीचा सदस्य असलेला प्रयाग मांझी ऊर्फ विवेक याचाही खात्मा केला.
Ashwini Bidre Case : अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपLatest Marathi Live Updates 22 April 2025 : घसरता डॉलर आणि अमेरिका चीन व्यापार युद्धातील अनिश्चितता यामुळे सोन्याच्या भावाने आज एक लाख रुपयांचा टप्पा गाठला. सोन्याच्या दरात गेल्या पंधरा दिवसांत ११ ते ११ हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे. कोल्हापुरात सोन्याचा दर जीएसटीसह ९९ हजार ५०० ते ९९ हजार ७०० रुपयापर्यंत गेला होता. तसेच कॅथोलिक ख्रिस्ती धर्मीयांचे सर्वोच्च नेते २६६ वे पोप फ्रान्सिस (वय ८८) यांचे आज दीर्घ आजारानंतर व्हॅटिकन सिटी येथे निधन झाले. ख्रिस्ती धर्माच्या इतिहासातील ते लॅटिन अमेरिकेतील पहिले पोप होते. राज्यभरात खळबळ उडालेल्या अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी पनवेल सत्र न्यायालयाने आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप, तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्या कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना सात वर्षांची शिक्षा ठोठावली. निवृत्त पोलिस महासंचालक ओम प्रकाश यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी आणि मुलीविरुद्ध एचएसआर लेआऊट पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुलगा कार्तिकेश याने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याची आई पल्लवी व बहीण कृती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..