पुणे, ता. २२ : मुंबई येथील जैन मंदिरावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ करावे, तसेच त्याच ठिकाणी पुन्हा मंदिर बांधून द्यावे यांसह विविध मागण्यांसाठी सकल जैन संघाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
विलेपार्लेमधील जैन मंदिर मुंबई महापालिकेने कारवाई करून पाडले. त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. संघाचे विजयकांत कोठारी, अचल जैन, मिलिंद फडे, महावीर कटारिया, अभय छाजेड, डॉ. कल्याण गंगवाल, प्रवीण चोरबोले, प्रवीण ओसवाल, सुजाता शहा यांच्यासह जैन बांधव आंदोलनात सहभागी झाले होते. निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना भेटून शिष्टमंडळाने निवेदन दिले. अनेक वर्षांपासून जैन धर्माच्या तीर्थस्थळावर अतिक्रमण करणे, यात्रेकरूंवर हल्ला करणे, त्यांना त्रास देणे असे प्रकार हेतुपूर्वक चालले असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.
जैनधर्मीयांच्या मागण्या
१) देशातील जैनधर्मीय तीर्थक्षेत्र आणि साधू-साध्वी निवासस्थानांना कायमस्वरूपी सुरक्षा सुनिश्चित करणारा कायदा करावा.
२) जैनधर्मीय साधू व साध्वी पदभ्रमण करताना संपूर्ण वेळ त्यांना राज्य सरकारच्या वतीने संरक्षण द्यावे.
३) जैनधर्मीयांच्या तीर्थक्षेत्रांना केंद्र सरकारतर्फे संरक्षण मिळावे.
४) जैनधर्मीय साधू-संतांवरील हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी.