पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. निष्पाप नागरिकांना गोळ्या झाडून त्यांच्या बायका मुलांसमोर मारलं. इतकी क्रूरता पाहून तळपायची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. या घटनेचा निषेध म्हणून क्रीडाविश्वातूनही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सचिन तेंडुलकर असो की विराट कोहली यांनी या घटनेचा निषेध केला आहे. तसेच पीडित कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीही दहशतवादी घटनेनंतर अस्वस्थ झाला असून संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्याने सोशल मीडियावर दु:ख व्यक्त करताना सांगितलं की, अशा घटना आमच्या देशाच्या समाजाला कमकुवत करतात. या कठीण काळात देशातील नागरिकांनी एकत्र राहण्याचे आवाहन देखील त्याने केलं.
मोहम्मद शमी म्हणाला की, ‘पहलगाममधील दुःखद दहशतवादी हल्ल्याने मला खूप दुःख झाले आहे. या क्रूर हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांनी आपले प्राण गमावले आणि कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या प्रकारची हिंसाचार केवळ एका व्यक्तीला लक्ष्य करत नाही तर आपल्या समाजाची जडणघडण देखील कमकुवत करते. या कठीण काळात, आपण दहशतवादाचा निषेध करण्यासाठी आणि पीडितांच्या कुटुंबियांना मनापासून संवेदना व्यक्त करण्यासाठी एकत्र आले पाहिजे. शांततेसाठी आपली वचनबद्धता राखणे महत्वाचे आहे. या दुर्घटनेने प्रभावित झालेल्या सर्वांसोबत आमच्या संवेदना आहेत आणि न्यायासाठी प्रार्थना करतो.”
या घटनेप्रकरणी विराट कोहली, सचिन तेंडुलकर, हार्दिक पांड्या यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे. विराटने इन्स्टास्टोरीत लिहिलं की, पहलगाममध्ये निष्पाप लोकांवर झालेल्या भयानक हल्ल्यामुळे मला खूप दुःख झाले आहे. पीडितांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना. या क्रूर कृत्यासाठी न्याय मिळावा आणि ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांना शांती आणि शक्ती मिळावी अशी मी प्रार्थना करतो.’ हार्दिक पांड्याही शोक व्यक्त करत म्हणाला की, पहलगाममधून येणाऱ्या बातम्यांनी मला धक्का बसला आहे. पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत.
सचिन तेंडुलकर म्हणाला की, पहलगाममध्ये निष्पाप लोकांवर झालेल्या दुःखद हल्ल्यांमुळे मला धक्का बसला आहे आणि मी खूप दुःखी आहे. पीडित कुटुंबे अकल्पनीय वेदनांमधून जात असतील. या कठीण काळात भारत आणि जग त्यांच्यासोबत उभे आहे.