Pahalgam terror attack : कुणालाही सोडणार नाही; मृतांना श्रद्धांजली अर्पण करत अमित शहांचा दहशतवाद्यांना इशारा
Sarkarnama April 24, 2025 12:45 AM
Amit Shah : कुणालाही सोडणार नाही; मृतांना श्रद्धांजली अर्पण करत अमित शहांचा दहशतवाद्यांना इशारा

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील मृतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांन श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी मृतांना जड अंतःकरणाने श्रद्धांजली वाहिल्याचं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. शिवाय भारत दहशतीसमोर झुकणार नाही. या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना सोडणार नाही, असं म्हणत त्यांनी हल्लेखोरांना इशारा दिला आहे.

Sketches of three terrorists : पहलगाममधील दहशतवाद्यांचे स्केच पोलिसांनी केले जारी

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील संशयित हल्लेखोराचे स्केच आता समोर आलं आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. एनआयएचे पथक श्रीनगरला पोहोचले आहे. तर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोनचीही मदत घेतली जात आहे. अशातच आता संशयित दहशदवाद्यांचे स्केच जारी करण्यात आलं आहे.

Pakistan on Pahalgam terror attack : दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानने फेटाळली

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण पाकिस्तानकडून देण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी भारतावरच पाकिस्तानात अशांतता पसरवल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Eknath Shinde : महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी शिंदेंचा नायडूंना फोन

काश्मिर खोऱ्यात महाराष्ट्रातील जे पर्यटक अडकले आहेत. त्यांना सुखरुप आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. शिंदेंच्या विनंतीची दखल नायडू यांनी घेतली आहे. उद्या खास विमानाने त्यांना महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे.

Pahalgam Terror Attack: मोदी-शहा यांच्या कुटुंबाला सुरक्षा सामान्यांना सुरक्षा कुठे: संजय राऊत

पहलगाम हल्लावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी-शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “अमित शाह यांचा निषेध करा, मोदींचा निषेध करा. ही नौटंकीबंद करा. मंगलप्रभात लोढा यांना लाज वाटली पाहिजे. तुम्ही लोकांचा आक्रोश बघा, तुमच्या नौटंकीमुळे लोकांचा जीव गेलाय. मोदींना सुरक्षा आहे, फडणवीस, अमित शाह यांच्या मुलाला, कुटुंबाला सुरक्षा आहे. आमच्यासारख्या सामान्यांना सुरक्षा कुठे आहे? असं शब्दात राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.

Shivsena UBT Nashik : ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाचा भाजपामध्ये प्रवेश

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नाशिकमध्ये आणखी एक धक्का बसला आहे. मनमाडचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. गेल्या तीस वर्षांपासून धात्रक हे मनमाड नगर पालिकेत नगरसेवक आहेत. दोनदा त्यांनी मनमाडचे नगराध्यक्ष होते.

Pahalgam terror attack : पहलगाम हल्ला! विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा अमित शाहांशी चर्चा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आज बुधवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली. राहुल गांधी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पहलगाम येथील भयानक दहशतवादी हल्ल्याबद्दल गृहमंत्री अमित शाह, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष तारिक कर्रा यांच्याशी बोललो. परिस्थितीची अपडेट मिळाली.

पहलगाम हल्ला, चोख प्रत्युत्तर द्या - आदित्य ठाकरे

काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची बातमी धक्कादायक आणि वेदनादायी आहे. ह्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना विनम्र श्रद्धांजली. त्यांच्या प्रियजनांप्रती सहवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकर आराम पडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अश्या भ्याड हल्ल्यांचा केवळ निषेध केला जाणार नाही तर चोख प्रत्युत्तर देऊन आपल्या सीमांचं आणि नागरिकांचं रक्षण केलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

कठोर कारवाई करा - राज ठाकरे

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, केंद्र सरकारने काश्मीरमधून ३७० कलम हटवलं. त्यानंतर सगळं जरा सुरळीत होत आहे आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे असं दिसत असताना, जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन, उद्योगधंदे कोण सुरु करेल ? त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी.... हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाहीये... आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल.

Pahalgam Terrorist Attack : दहशतवाद्यांच्या भ्याड हल्लायत आतापर्यंत 26 पर्यटकांचा मृत्यू

जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशासह जगभरात एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांचा समावेश आहे.

Pahalgam Terrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून मोदी भारतात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून ते तातडीने भारतात परतले आहेत. जम्मु काश्मिरधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर ते तातडीने भारतात आले आहेत. कालच्या हल्ल्यानंतर PM मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. यानंतर अमित शाह हे श्रीनगरला गेले असून ते आज ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या घटनास्थळाला भेट देणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.