किन्हवली, ता. २३ (बातमीदार)ः वाढत्या उष्णतेमुळे मानवी वस्तीमध्ये सापांचा संचार वाढला आहे. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी साप घराच्या आजूबाजूला किंवा सावलीच्या ठिकाणी येतात. पण गैरसमजातून सापांना मारण्याचे प्रकार होत असल्याने मदत घेण्याचे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.
दिवसेंदिवस तापमानात प्रचंड वाढ होत असून जंगलात लागणारे वणवे, वृक्षतोड, भूसुरुंग स्फोटांमुळे जमिनीला बसणारे हादरे, जेसीबी, पोकलन सारख्या अवजड यंत्रांद्वारे होणारे खोदकाम, ट्रॅक्टरद्वारे होणारी शेतीची उखळणी व उंदीर किंवा तत्सम भक्ष्याचा शोध अशा अनेक कारणांमुळे विषारी, बिनविषारी साप बिळातून मानवी वस्तीमध्ये संचार करू लागले आहेत. साप थंड रक्ताचे असल्याने त्यांना शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी थंड ठिकाणांची गरज असते. उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे घराभोवतालच्या परिसरात झाडा झुडपाखाली, पायऱ्यांशेजारी,पाण्याचा ओलावा असलेल्या खड्डा, झाडांच्या कुंड्या,कचरा, लाकूड किंवा गाडीखाली, दुचाकीच्या स्टेअरिंग कॅप व बुटांमध्ये अशा ठिकाणी वास्तव्य करतात. म्हणून आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.
---------------------------------------------
गैरसमजांमुळे सापांबद्दल भीती
अनेकदा सांपांविषयी अनेकांच्या मनात प्रचंड भीती असते. साप दिसल्यावर त्यांना मारण्याचा प्रयत्न होतो. पण आपल्या सभोवताली जवळपास ८० टक्के साप बिनविषारी असतात. साप उंदीर, किडे खाऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ते मदत करतात. त्यामुळे सापाला मारण्यापेक्षा सर्पमित्रांच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे प्रयत्न करावेत, असे सर्पमित्र प्रशांत शिराळ यांनी सांगितले.