Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यातील मृतांना महाराष्ट्राकडून आर्थिक मदत, अडकलेल्या पर्यटकांना विशेष विमानाने आणणार
Saam TV April 24, 2025 02:45 AM

जम्मू-काश्मिरच्या पहलगाम येथे मंगळवारी दुपारी ४ दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबारामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. या मृत पर्यटकांमध्ये ६ पर्यटक हे महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रातील या मृत पर्यटकांच्या कुटुंबीयांना सरकारने ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. याचसोबत जम्मू-काश्मीर सरकारने देखील २७ मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची मदत जाहीर केली आहे.

पहलगाम हल्ल्यातील मृतांना मदत जाहीर केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट देखील केले आहे. 'पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्या महाराष्ट्रातील एकूण ६ जणांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. तर, जखमींना ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान वापरण्यात येणार आहे आणि त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल.', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

तर, जम्मू आणि काश्मीर सरकारने दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या २७ जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे . तर जखमींना २ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. श्रीनगरमध्ये गृहमंत्री अमित शहा आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह कुटुंबियांसह विमानतळावर पाठवले जाणार आहेत. त्यानंतर त्यांना विमानाने त्यांच्या घरी नेले जाईल.

दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. बैसरन खोऱ्यात मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित होते. सर्वजण नंदनवनात आनंद घेत होते त्याचवेळी अचानक भ्याड दहशतवादी हल्ला झाला. मृतांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील पर्यटकांचा समावेश आहे. नेपाळ आणि युएईमधील प्रत्येकी एक-एक पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.